Archive for सप्टेंबर, 2020

काय म्हणता, खा णी? खाण्यावरच्या म्हणी

प्रश्न विचारणार मराठी माणूस खाण्यावरच्या म्हणी #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी
खाण्यावरच्या म्हणी

चित्र संदर्भ: बूक माय शो, चित्रपट: हेरा फेरी
चित्र संदर्भ: पंगत मराठी जेवण

तर मंडळी, दोन गोष्टी आपल्या लई म्हणजे लई आवडत्या बघा! मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती (शुद्ध मराठीत- खा दा डी). दोन लाडक्या गोष्टी एकत्र आणाव्या असा विचार आला. खाणं आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांवरच्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार आठवायला सुरुवात केली. पण कसलं काय, मनात मांडे आणि पदरात धोंडे! कामांच्या व्यापातून वेळ मिळेना.

चार तरी म्हणी लेकाला सांगता येतात का पाहूया म्हणून त्याला विचारलं. पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट. म्हणतो कसा, “आई, तू लिही आणि मला वाचून दाखव. एखादी राहिली तर मी सांगतोच.” म्हटलं वा! हे म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा! हा आपला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार. शेवटी मीच सुरु केलं. तसंही म्हणतात ना, सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी ! बघू तरी किती आठवतात…

म्हणी व त्यात येणारे शब्द जसे खायचे जिन्नस, करायच्या कृती, आणि विशेष शब्द, #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी
म्हणी व शब्द
  • अचाट खाणे, मसणात जाणे
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळी
  • असतील शिते, तर जमतील भुते
  • आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते
  • चवलीची (२ आणे) कोंबडी आणि पावलीचा (४ आणे) मसाला
  • आधी पोटोबा, मग विठोबा
  • आधी शिदोरी, मग जेजुरी
  • आपल्याच पोळीवर तूप ओढणे
  • आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे
  • आवळा देऊन कोहळा काढणे
  • ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
  • एकादशी दुप्पट खाशी
  • एखाद्याचा खिमा करणे
  • कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच
  • कानामागून आली आणि तिखट झाली
  • कामापुरता मामा, ताकापुरती आजी
  • कोल्हा काकडीला राजी
  • कोल्ह्याला द्राक्षे आंबट
  • कोंड्याचा मांडा करणे
  • खांडोळी करणे
  • खाई त्याला खवखवे
  • खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
  • खाऊ जाणे तोच पचवू जाणे
  • खाऊन माजावे, टाकून माजू नये
  • खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे
  • खायला काळ आणि भुईला भार
  • गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली
  • गाढवाला गुळाची चव काय
  • गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य
  • घरात नाही दाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा
  • घरोघरी मातीच्या चुली
  • जिलबीसारखा सरळ माणूस
  • ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी
  • ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी
  • ज्याचे खावे, त्याचे भरावे
  • डोक्यावर मिऱ्या वाटणे
  • तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणीक करून आला
  • तळे राखील तो पाणी चाखील
  • ताकापुरते रामायण
  • ताकाला जाऊन भांडे लपवणे
  • ताकास तूर लागू न देणे
  • तिखटमीठ लावून सांगणे
  • तेल गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं
  • दात आहेत पण चणे नाहीत
  • दुधाने पोळल्यावर ताक फुंकून प्यावे
  • धनगर बसला जेवाया, ताकाबरोबर शेवया
  • धन्याला धातूर, चोराला मलिदा
  • नाकाने कांदे सोलणे
  • नाकाला मिरच्या झोंबणे
  • नावडतीचे मीठ अळणी
  • पडत्या फळाची आज्ञा
  • पाणी पाजणे
  • पी हळद आणि हो गोरी
  • पेराल ते उगवेल
  • बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी
  • बोलाची कढी आणि बोलाचाच भात
  • भांड्याला भांडं लागणे
  • मनात मांडे, पदरात धोंडे
  • मला ना तुला, खीर घाल कुत्र्याला
  • मुंगी होऊन साखर खाणे
  • मूग गिळून गप्प बसणे
  • लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
  • वड्याचं तेल वांग्यावर
  • शितावरून भाताची परीक्षा
  • शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड
  • सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी
  • साखरेचं खाणार त्याला देव देणार
  • देखला वडा उपास मोडा (नवीन जोडली आहे)

अबब, आपण मराठी माणसं अजून काय काय खातो बघा…

अपमान गिळतो, मार खातो, बोलणी खातो, शिव्या खातो, शेण खातो, पड खातो, वेळ खातो, हार खातो, खार खातो, पैसा खातो, अक्षरं खातो… #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी

आज फार डोकं खाल्लं का तुमचं

बर तुम्हाला येणाऱ्या म्हणी यात नसतील तर जरूर खाली कमेन्ट मध्ये लिहा .. नक्की जोडून ठेवीन

लेखक: अज्ञात (WhatsApp वरून)

मनसंवाद | प्रस्तावना

मनाचे श्लोक याद्वारे मनाशी संवाद
मन संवाद

आपण ज्या युगात आज जगत आहोत, त्यात येणाऱ्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी जर आपल्याला कशाची आवश्यकता असेल तर ती खंबीर मनाची आणि मन संवादाची. आपल्या या अत्यंत चंचल अशा मनावर संस्कार घडवून त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आणि कणखर बनवून आपल्या तसेच पुढील पिढीला सक्षम बनवण्यासाठी श्रीसमर्थ रामदासांनी २०५ मनाचे श्लोक रचले आहेत.

हे मनाचे श्लोक दुसऱ्यांना उद्देशून सांगावयाचें नसून स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहेत. #मा_आ_वि, #मनाचे_श्लोक

हे लक्षात घेऊन आणि त्याचा अर्थ समजून जेव्हा वाचतो तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. समर्थांनी या सुंदर अशा मनाच्या श्लोकांतून भिरभिरणाऱ्या मनाला वरचेवर जागेवर आणण्यासाठी राम नाम हा सर्वार्थाने एकच उपाय असे सांगितले आहे.

जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःसोबत भय, भ्रम आणि संशय घेऊन जन्माला येतो आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण बनते. आपण कमवलेले नावलौकिक, संपत्ती तसेच आपल्या अंगी असलेले कर्तृत्व, बुद्धिमता, सौंदर्य ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मानतो किंवा आपण कमावलेल्या आहेत असा आपल्याला भ्रम असतो. कधी कधी तर ह्या गोष्टींचा गर्व होतो, जो आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो. हे सर्व माझे आहे या भ्रमातून मग भय निर्माण होते. भर्तृहरि यांनी नीती शतकं मध्ये सांगितले आहे:

भोग रोगभयं कुले च्यूतिभयं वित्ते नृपालाद् भयं
माने दैन्यभयं बले रिपुभर्य रूपे जरायाः भयम्
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद् भयं
सर्व वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम्

भर्तृहरि, नीति शतक

प्रत्येक गोष्टीला कशाचे तरी भय असते, जसे श्रीमंताला संपत्ती नाशाचे, बुद्धिवानाला आपल्यापेक्षा विद्वांनांसमोर हरण्याचे, सुंदर स्त्रीला वृद्धत्वाचे. मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात पण यातले काहीच आपले नसते. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा कर्ताकरविता असतो तो फक्त राम, आपण फक्त निमित्तमात्र असतो.

याचे मला सुचलेले उदाहरण: न्यूटनने सफरचंद पडतांना पाहिले तेव्हा त्याला कळले की गुरुत्वाकर्षण या पृथ्वीच्या शक्तीमुळे ते घडते परंतु यापूर्वी सफरचंद झाडावरून पडत नव्हते का हो? परंतु या घटनेमागचे कारण समजावण्याची दृष्टी होती न्यूटनकडे. ही दृष्टी त्याला कोणी दिली? तर भगवंताने. त्या रामानेच. तो स्वतः माणसांना सिलेक्ट करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम करवून घेत असतो.

आपलं मन, भय आणि भ्रम यांच्यापाठोपाठ आपल्याला घेऊन जातं ते संशय या अजून एका प्रवृत्तीकडे. आणि मनात एकदा कोणत्याही गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी संशय भरला की मग वाट चुकतेच विचारांची. हे जे भय, भ्रम आणि संशय यांच्यात गुरफटलेलं आपलं मन आहे त्याला योग्य दिशा देणारे असे हे समर्थ रामदासांनी रचलेले मनाचे श्लोक. ह्या २०५ श्लोकांमधून त्यांनी मनासोबत संवाद साधला आहे.

आपण पहिल्या दहा श्लोकांचा थोड्या-थोड्या टप्प्याने अर्थ पाहणार आहोत.
(क्रमशः)

रामरक्षा

रामरक्षा

रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु “स्वानुभव” ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

– रामरक्षा स्तोत्र

हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. (पूर्ण रामरक्षा येथे मांडली आहे किंवा विकिपीडियावर ही सापडेल)

घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा,
कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,
प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा,
रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा,
पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा…

कुठल्याही संकटात असाल,
फारच निगेटिव वाटतंय,
आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,
रडायला येतंय,
एकटं वाटतंय,

रामरक्षा म्हणा…

कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणार नाहीत..आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण विज्ञानवर असेल तोच रामरक्षेवर ठेवा.

मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही.

पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.

तुम्हाला रामरक्षा म्हणून काही अनुभव आला आहे का?

प्रत्येकाला अनुभव येईलच असे नाही आणि आला तरी तो पूर्ण जाणवेल असे नाही. पण जेव्हा अनुभव येतो आणि जाणवतो तो आंतरिक शक्ति देऊन जातो. असा अनुभव खाली कमेन्ट मध्ये नक्की लिहा

।। श्रीराम जय राम जय जय राम।।

@सौ मानसी निखिलेश गोडबोले

चंद्राची कोर

चंद्राची कोर

हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते

शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर

दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर

@विभासा

आयुष्याची शाळा

प्रश्न: शिक्षण म्हणजे काय?
शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, जी माणसाच्या जन्मापासून सुरू होते, ती अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते.खरंतर जन्मापासून म्हणजे आईच्या उदरात असताना पासूनच बर का. आईच्या उदरात जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हापासून आई जे अन्नसेवन करते त्यावर तो वाढायला लागतो. तिचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती, तिची मनस्थिती, तिचं वागणं, बोलणं, विचार करणं ह्या सगळ्याचे नकळतपणे त्याच्यावर संस्कार होत असतात.

पुढे जसजसे बाहेरच्या जगात आपण जातो अनुवंशिकतेने आलेले स्वभावगुण, आईची शिकवण, गुरूंकडून लाभलेले शालेय शिक्षण, व्यवहारज्ञान, सामाजिक बांधिलकीची जाणीव, देशाविषयी प्रेम, एक सुजाण नागरिक म्हणून असलेली जबाबदारी हे हळूहळू आपण आत्मसात करत जातो. शिकत जातो. 

त्याचप्रमाणे कुटुंबाचा एक घटक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता आणि कोणत्याही कामाविषयी कमीपणा न वाटून घेता, संसाराची जबाबदारी पार पाडायला शिकतो. 
हे सर्व आपण आपल्या आईवडिलांकडून आणि घरातील इतर वडीलधाऱ्यांकडून शिकत असतो,कसं वागावं हे जसं समजणं गरजेचं आहे, त्याच प्रमाणे कसं वागू नये हे देखील समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. 

आपल्याला येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवातून आपण शिकत असतो. कधीकधी अपयश येतं, ते तर खूप काही शिकवून जातं, कधी मानसिक तणाव तर कधी शारीरिक दुखणे, ह्यातूनही बाहेर पडता आलं पाहिजे.

कधी आर्थिक संकट येतं, त्यातही खचून नाही गेलं पाहिजे.हे सगळे प्रसंग खूप काही देउन जातात. त्यातलं चांगलं ते घ्यावं. (आर्थिक संकट खूप लोकांचे खरे चेहरे दाखवून जातात बर का!)  ह्या सर्व घडामोडींना तोंड देण्यासाठी गरज असते ती मनाच्या खंबीरपणाची. त्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे देवावर असलेली श्रद्धा. 

या परमेश्वराच्या चरणी सतत मूल होऊन राहावं. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानावेत, आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवापाशी कृतज्ञता राखावी, कारण तो ‘ सर्वदा कर्ता ‘ आहे आणि ही भावना एकदा मनात घट्ट रुजली की अहंकार जडत नाही.मग तो रूप, शिक्षण, पैसा, बुद्धी कशाचाही असो.

हीच तर खरी आयुष्य नावाची शाळा, जिथे माणूस सतत शिकत असतो आणि शिकताशिकता घडत असतो.

@Mrs. Manasi Nikhilesh Godbole. (Ku. Bharati Bhaskar Sathe)

रविवार सकाळ

काल दिवस भर पाऊस पडून गेल्याने ही रविवार सकाळ,
नुकतीच आंघोळ होऊन स्वच्छ झालेली,
रात्रभर धुक्याची हलकी चादर पांघरून पडलेली झाडे,
त्या चिंब भिजून गेलेल्या रस्त्यावरुन
गार गार वाऱ्याचा कानाला आणि अंगाला स्पर्श घेत
एखादे सुरेख गाणे गुणगुणत शीळ घालीत
मनसोक्त सायकल चालवण्याचा
सुखद अनुभव घेण्याची सकाळ

… हा अनुभव कसा सोडून चालेल
चला तर मग आमच्या या रम्य सायकल सफरीवर

घरून निघाल्यावर

ठिकाण आहे मंडई तळे आजूबाजूला आहे केवळ घनदाट झाडी
मोकळे रस्ते शहरापासून फार दूर नाही पण शांत वातावरण

दुतर्फा घनदाट झाडी, आखून ठेवलेले रस्ते, वर निळे आकाश
आणि अदबीने चालवणारे गाडीवाले

सायकलवाले मध्ये आले म्हणून त्यांना काही भोंगा वाजवून घाबरवत नाहीत
हलकेच गाडी बाजूने नेतील

अश्या रविवारी सकाळी लांबवर पळणारी मंडळी ही या ठिकाणी येतात
व कदाचित सायकली चालवणाऱ्यांचे थवे ही जाताना दिसतील

एकंदरीत मंडई तळ्यावर जाण्याचा रस्ता सायकल चालवण्यासाठी खूप रम्य आहे

सोबत आहेत सायकलस्वार नीता आणि तपस्विनी आणि जितेंद्र उर्फ जेके

रस्ता आहे १३-१४ किमी पण अशी गार हवेशीर सकाळ गर्द झाडी
निळे आकाश अनुभवत किती किलोमीटर गेले हे कळत नाही
तरी मंडई तळ्यावर पोहोचले की काय मांडून ठेवले आहे? कशासाठी केला हा अट्टहास?

मंडई तळ्यावर पोहोचल्यावर

चहु बाजूने नटलेल्या हिरव्यागार झाडांच्या अनुभवाने, तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांनी,
त्यांना हलकेच बाजूला सारून डोकावून बघणाऱ्या सूर्य किरणांनी
खुले आकाश व निळे पाणी पाहून
सारे श्रम क्षणार्धात नाहीसे होतात

आता एक तरी solo pic बनता है ना !!
बनता है तो मेरा भी निकलो
या उत्साही वातावरणाची कमाल काही औरच आहे
मग थकलेलली सायकलवाली मंडळी उड्या मारायला ही कमी करत नाही
स्वचित्र (सेल्फी) काढल्या शिवाय पाय निघत नाही
या आठवणी हीच या सफरीची खरी कमाई

जोडीदारासोबत या रम्य वातावरणात काही क्षण निवांत घालवून पुनः परतीची वाट धरली
मागे वळून पाहिल्याशिवाय सायकलीला वेग धरता येत नाही

परतीचा प्रवास

आता वाहनांची रहदारी वाढली आहे
या जोरात जाणाऱ्या वाहनांनी वाहत्या रस्त्यावर ही सायकलवाली मंडळी आली
तरी मोठ्या गाड्या काळजी पूर्वक आपापली वाट धरून जातात

आता उन्ह जाणवू लागतात तसेच मगाशी जे पक्षी किलबिल करत होते तसेच काहीसे पोटात “काव काव” होत असल्याचे जाणवते
मग आपोआप वेग वाढतो, उताराचा रस्ता आपला मित्र आहे असे वाटू लागते
चला चला कोण पुढे चालतो तो
शहर दिसू लागते तसे निळे आकाश आणि हिरवी झाडे मागे राहू लागती
वेग मंदावला असला तरी चेहऱ्यावर तजेला आणि मनात भरपूर समाधान साठवलेले असते

भेटूया रम्य मंडई तळ्यावर पुनः केव्हा तरी

मंडई तळ्याचा मार्ग

@विभासा

गीता सार

प्रत्येक हिंदूला “श्रीमद् भगवतगीते”च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.

ॐ . कुणी कुणाला सांगितली..???
उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

ॐ . कधी सांगितली ???
उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
उ.- रविवार च्या दिवशी…

ॐ. कोणत्या तिथि ला ???
उ.- एकादशी

ॐ. कुठे सांगितली…???
उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर…

ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..???
उ.- ४५ मिनीटे..

ॐ. का सांगितली…???
उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

ॐ. किती अध्याय आहेत?
उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

ॐ. किती श्लोक आहेत?
उ.- ७०० श्लोक

ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???
उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
उ.- भगवान सूर्यदेवला..

ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
उ.- उपनिषदां मध्ये..

ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे…

ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे…???
उ.- गीतोपनिषद

ॐ. गीतेचे सार काय आहे.. ???
उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
अर्जुना ने- ८५
धृतराष्ट्र ने- १
संजय ने- ४०
एकूण = ७००

एक हिंदू या नात्याने आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी भगवतगीता वाचावी.

collected by — Mrs. Aparnaa Paranjape

कोविड-१९: शोध आणि बोध

पुढील शतकाचा नारा "एक जग ,एक स्वास्थ्य ,एक भविष्य"

 नमस्कार,  लहानपणी ऐकलेल्या एक छोट्या गोष्टीची सत्यता आता कित्येक दशकानंतर पटते.

आजीबाईंना शिवण कामाची भारी आवड.   ते करताना त्यांना खूप आनंद वाटे . रोज त्या स्वतःच्या झोपडीत तासंतास शिवण काम करीत. एके   दिवशी आजीबाईंची शिवणकामाची सुई झोपडीत हरवली. आजीबाई बेचैन झाल्या! सुई शोधीत शोधीत त्या एका प्रकाशाने झगमगलेल्या मार्केट जवळ आल्या व तिथे सुई शोधू लागल्या. एकाने विचारले,”आजीबाई काय शोधताय?” त्या म्हणाल्या, माझी झोपडीत हरवलेली सुई शोधतेय. गृहस्थ त्यांना   म्हणाले,” झोपडीत हरवलेली सुई तर झोपडीतच मिळेल”. आजीने उत्तर दिले, “इथे प्रकाश भरपूर आहे म्हणून इथे शोधतिये”.

तात्पर्य:  आनंदाचे वास्तविक स्वरूप कोठेअसते ह्याचे ज्ञान होणेआवश्यक.

आनंद आणि सुख हे मानवी जीवनाचे अत्यंत महत्वाचे अंग आहेत. आयुष्यात सर्व खटपट त्यासाठीच असते. गेल्या ३०-४० वर्षात जीवन अति गतिमान झाले आहे. सुखसोयी वाढतच आहेत. इंटरनेट आणि डिजिटल टेकनॉलॉजिने   जग अचंबित झाले. जीवन जगण्याची रीत झपाट्याने बदलत गेली आहे.

जीवन जगण्याच्या रीतींबरोबर मानवाचे ज्ञानेंद्रियरूपी ५ घोडे उधळू लागले आहेत. बाहेरील आकर्षणाने, आपला वेग तुफान करीत तसेच आपल्या परिघाच्या बाहेर दौडत निघाले आहेत. आनंद आणि सुखाची व्याख्या नवीन तंत्रज्ञानासारखी बदलू लागली आहे. अर्थात काही बदल हे अपेक्षीत आहेत.  मनाचे लगाम ताणले जाऊन व त्याची ज्ञानेंद्रियावरील पकड ढिली होऊ लागली आहे.अति ताणाने लगाम क्षीण होऊन निकामी होत चालले आहेत . बुद्धीची मनावरील पकड सुद्धा क्षीण होऊ लागली आहे किंबहुना बुद्धीने चुकीची दिशा दाखवल्याने ज्ञानेंद्रिय रुपी घोडे चुकीच्या दिशेने दौडू लागले आहेत. बुद्धीची सज्ञान [वास्तविक आणि चिरकालीन टिकणारे  ज्ञान ] व अज्ञान [ चुकीचे,भ्रमातून निर्माण झालेले व पोकळ ज्ञान] ह्यातील फरक तपासण्यासाठी वापरण्यात येणारी कसोटीची तीव्रता कमी होत चाललीआहे. निरनिराळ्या माध्यमातून मिळणाऱ्या  काहीवेळा अज्ञानाच्या महापुराने सज्ञान झोकाळून  जात आहे. त्याचा बुद्धीवर परिणाम होऊन ती चक्रावून जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे जीवात्मा व बुद्धी यातील दुवा कमी होतोय. जीवत्माचे श्रेष्ठत्व जवळ जवळ नाहीसे होत आहे. तो शांतपणे सर्व घटनांकडे  पाहत आहे. अविचारातून प्रेरणा व त्यातून सतत विचार व नंतर वासना असे चक्रात मानवी जीवन अडकत आहे. वासनेचे रूपांतर कर्मात वअकर्माने निसर्गाचे  पतन होऊ लागले आहे. त्यावर उपाय शोधायला वेळ कोणाला?

अश्या परिस्थितीत ध्यान करणे हाच उत्तम मार्ग आहे. ध्यानाने मन शांत होते व बुद्धीला चालना मिळून चांगले विचार सुचतात, जसे अंधार दूर करावयाचा  असल्यास प्रकाश येणे गरजेचे असते तसे.

आता निसर्गाचे कार्य बघू. सूर्य प्रकाश व उष्णता देतो.पवनशक्तीला वेग देतो .  समुद्राच्या  पाण्याचे बाष्पीभवन  करून ते वाऱ्या तर्फे दुर दुर नेतो. पृथ्वीवर पर्ज्यन्य वृष्टी  करवतो. भूतलावरील सर्व जन जीवन साठी अन्न व पाण्याची व्यवस्था करतो. पृथीवरील माती, पाणी तसेच कीटकांमुळे वनस्पती जगतात. कीटक व पक्षांमुळे त्या सर्वीकडे  पसरतात. भूदल हिरवेगार होते व मानवास जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू पुरवतात. किती श्रेष्ठ व सुंदरआहे हा निसर्ग! त्याची सगळी  धडपड पृथ्वीवर शांत व सुमंगल वातावरण निर्माण करण्यासाठी. तेही कुठलीही  अपेक्षा न ठेवता निसर्गाचे   अखंड कार्य चालू असते. आंब्याचे वृक्ष मधुर आंबे देते,  हिरव्यागार  मोहक पानांमुळे छानसावली मिळते. आंब्याचे झाड कधी आंबे  खाते? किंवा आंबे  कोणी खाल्ले ह्याची चौकशी करते? नाही.  निसर्गात कुठलाही  स्वार्थ नाही.  फक्त परमार्थ व श्रेष्ठव दिसते.

गाईच्या दुधात, मातेच्या दूधापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जवळ जवळ तिप्पट असते. ह्याला कारण, गाईच्या बछड्याची वाढ बाळापेक्षा झपाट्याने होते. दुधात हवे असलेले प्रथिने त्या गरजेनुसार असतात. आधुनिक  शास्त्र  हे सांगू शकते . पण ते असे का होते ह्याचे उत्तर शास्त्रात नाही . निसर्गतील अनेक गूढ आधुनिक शास्त्र  सांगू शकत नाही.तेथे शास्त्र कमी पडते. निसर्गाची श्रेष्ठता व महानतेचे दर्शन होते.

हजारो वर्षांपूर्वी ऋषी, महर्षीच्या तपश्चर्येने  निसर्गाच्या माध्यमातुन ध्वनिलहरी तपस्वी पर्यंत पोहोचल्या व त्यातून वेदांत, उपनिषद  सारखे अमूल्य ज्ञान भारतीयांना मिळाले. वेद, भारतीय जीवन पद्धतीच्या, संस्कृतीचे  अविभाज्य घटक बनले. आपल्या पूर्वजांची निसर्गावर  असलेल्या प्रचंड श्रद्धेमुळे शक्य झाले.

कालांतराने निर्सगाचे श्रेष्ठतव कमी होऊ लागले,श्रद्धा घटली व निसर्गाकडे  पाहण्याचा मानवाचा दृष्टिकोन बदलला. मानव त्याकडे उपयुक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्यात  येणारी वस्तू समजू लागला. योगी  विचार कमी होऊन भोगी विचार बळावले.

 चुकीच्या प्रेरणेने अविचार  व नंतर स्वार्थी वासना उत्पन्न झाली.संपत्ती व व्यक्ती स्वातंत्र ह्याला आनंद व सुख असे अज्ञानानी नाव प्रचलित पडले. संपत्तीचा साठा करण्याच्या मागे बुद्धी व शक्ती खर्च होऊ लागली. प्रचंड जंगलतोड,अमर्याद खनिज तेलाचे उत्पादन ,अमर्याद पाण्याचा वापरामुळे निसर्गाचा तोल ढळू लागला. समाजातील विशिष्ट वर्गाने भोगवाद अमर्याद वाढवून,श्रीमंत व गरीब ह्यातील दरी आणखी वाढली. हवेतील  व पाण्यातील  प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले.मातीची रया जाऊ लागली ,वाळवंटाचा पसारा वाढू लागला.  वनस्पती ,प्राणी,पक्षी,जीव,जंतू नष्ट  होऊ लागले. पण त्याची  फिकीर कोणाला? मानव तर पृथ्वीचा ,निसर्गाचा पूर्ण ताबा घेण्याच्या  जय्यत तयारीस लागला. एवढेच नव्हे तर निसर्गाला गुलाम बनविण्याची स्वप्ने बघू लागला. त्याच्या वासना आणि कृत्त्य थांबवायचे तरी कोणी? कसा बदल घडवून आणायचा?

निसर्ग सर्व गोष्टींवर  बारीक नजर ठेवून आपल्या गुणधर्मानुसार शांत  तसाच  गंभीर होता . पृथ्वीवर चाललेले  अधःपतन हे सज्ञानाने दूर होईल अशा आशेवर होता. शेवटी आपलीच लेकरे, ती काळानुसार शिकतील .  आपण त्यांना ज्ञानाचे डोस पाजण्याची आवश्यकता नाही ह्या विचारावर विश्वास ठेवणारा होता .

परंतु भोगवाद वाढतच चालला तो इतका वाढला की झालेली हानी कधीही न भरून येण्याइतकी. हे असेच चालू राहिले तर सर्व मनुष्य ,प्राणी, पक्षी वै. यांचा विनाश अटळ हे निश्चित.

विश्वाचा अंश असलेल्या निसर्गानीआतामात्र पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी थोडा वेगळा विचार करून  तो अंमलात आणण्यास सुरवात केली. फक्त वनस्पती,मनुष्य ,प्राणी, पक्षी वै.यांचा विनाश टाळण्यासाठी.

हळू हळू पृथ्वीचं तापमान वाढू लागले, काही ठिकाणी वादळे,तर कोठे भूकंप व  सुनामीच्या लाटा  समुद्र किनाऱ्यावर थडकू लागल्या. ऋतूंचे चक्र बदलू लागले,अवेळी पाऊस,हिमहृष्टी  होऊ लागली. समुद्राची पातळी वाढली  व जलचर प्राणी ,मासे तसेच जिवाणू ,कोरल्स कमी होऊ लागले.हिमशिखरे बर्फ़ न साठल्याने दिसेनाशी होऊ लागली.जमिनीवरील पावसाचे प्रमाण घटले, नद्या कोरड्या पडू लागल्या, जंगले ओसाड पडू लागली.शेतीचे उत्पादन कमी झाले .स्वाईन फ्लू ,बर्ड फ्लू , इबोला  सारखे विषाणूंचा मुक्तपणे संचार होऊन सर्वांचे स्वास्थ्य बिघडू लागले. ह्याचा परिणाम म्हणजे मानवला आर्थिक, शारीरिक,मानसिक तडाखे सहन करावे. काहींचे जीव गेले तर काहींचे संसार उध्वस्त झाले.निसर्गाचे प्रहार जबरी होते पण त्यामागे मुख्य उद्देश हा झालेल्या चुका सुधारुन,त्यातून काही शिकून जीवनातील सज्ञानतेत भर घालावी, निर्सगाबद्दलआत्मीयता,प्रेम दाखवावे,असा असावा.

कोणाच्या खाण्यापिण्याचा रूढी बद्दल मत व्यक्त करू नये असे आपली संस्कृती सांगते. पण चीनमधील श्रीमंतांच्या आचरट चोचले पुरविण्याच्या व  राक्षसी भक्षण करण्याच्या प्रवृत्तीने सगळ्या जगाचे लक्षण वेधले गेले. कारण अश्या भोगवादी वृत्तीने कोविड-१९ नावाच्या विषाणूने जंगली जनावराच्या शरीरातून माणसाच्या शरीरात प्रवेश केला. बाहेरील जगात मृतावस्तेत असलेला ह्या विषाणू शरीरात घुसून  सर्व रोगप्रतिकारक पेशींवर मात करत, त्याच्या  RNA जिन्सच्या साहाय्याने मानवी रक्त पेशींचे अन्न [प्रोटिएन्स] शोषून त्या नाश करूलागला. काही दिवसातच  कोविड-१९ मनुष्याला मरणाच्या दाढेत नेऊ  लागला.

 कोविड-१९बाधित आलेल्यांच्या संपर्कात तो  झपाट्याने पसरला. चीनच्या सीमा पार करून सर्व  जगभर, १८०देशात  पसरला. वर्ण ,लिंग ,वयाच्या कोठल्याही मर्यादा त्याला रोखू शकल्या नाही. जगभर कोविड-१९ ने  धुमाकूळ घातला व न भूतो न भविष्यती अशी बिकट परिस्थिती निर्माण केली. लाखो जणांचे प्राण गेले,लाखो त्याचे शिकार बनले ,जगातील व्यवहार पूर्णपणे थंडावले,घरात बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आरोग्य सेवा अत्यंत अपुरी पडू लागली, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिची आवश्यकता  आधी कधीच भासली नाही. प्रत्येकाच्या  मानसिक,आर्थिक, चिंता वाढल्या.जे रोज काम धंदा करून सन्मानाने प्रपंच चालवीत, त्या लोकांवर भीक मागायची वेळआली. बऱ्याच सेवाभावी संस्था पुठे सरसावल्या. वैद्यकीय क्षेत्रातील व पोलीस दलातील जनांनी आपले  प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले  व जनतेकडून  वाहवा मिळवली.

 कोविड-१९आजाराने जगातील सर्व देशांचे किती आर्थिक नुकसान  झाले?किती नोकऱ्या गेल्या? किती मदत कार्यासाठी खर्च झाला ?त्याचा हिशोबच नाही. कोविड-१९  चे वॅक्सीन केव्हा उपलब्ध होणार ह्यावर आत्ता तरी उत्तर नाही.  हा विषाणू जगातून केव्हा कायमचा नाहीसा करावयासाठी त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ  अहोरात्र झटत आहेत. सायन्स कोविड-१९  वर निश्चित मात  करेल.

अणुयुद्धापेक्षा  विषाणू आजाराच्या युद्धाची शक्यता बिल गेट्स यांनी ५ वर्षांपूर्वी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून मांडली होती. ती आज सत्य म्हणून समोर येत आहे.

कोविड-१९ ने  जगाला  खूप काही शिकविले,प्रदूषण विरहित निसर्गाचे काही प्रमाणात खरे दर्शन घडविले. नद्यांचे स्वच्छ पाणी खळखळ वाहताना अनुभवले .प्राणी, पक्षी आपल्या कक्षेबाहेर भ्रमण करताना आढळले. सर्वाना घरीबसून काहीतरी आवडीचे,वेगळे करण्याची संधी मिळाली . बुद्धीला व मनाला आनंदाची  व्याख्या तपासण्याची संधी मिळाली. ज्ञानेन्द्रियरूपी घोडयाना  थोड्याप्रमाणात का होईना आत्म निरीक्षण करण्याची संधी मिळाली.

करोना तांडवपासून बऱ्याच गोष्टींचा बोध होऊ शकतो,तो असा

वैयक्तिक पातळीवर:

  1. कोविड-१९पूर्णपणे नाहीसा होणार नाही तर ह्या ना त्या रुपाने परत येणार ह्याची मानसिक तयारी ठेवणे आवश्यक होणार आहे. मास्क,सानेट्झर्सचा वापर, सामाजिक योग्यअंतर ठेवणे व शक्य तितके संपर्क कमी करण्यावर भर देणे  ह्यांचे कठोर पालन करावे लागणारआहे.  जीवन पद्धतीत हा मोठा बदलावं आहे. विशेषतः वयस्कर व लहान मुले ह्यांची विशेष काळजी घावी लागणार आहे.
  2. काहींना कोविड-१९ लागण झाली नाही ,तर  काही जण करोना बाधित झाले पण लवकर बरे झाले, त्यातले काही जणांना अतिकाळजी विभागात  ठेवावे लागले तर काही जणांचे प्राण गेले.असे का? ह्याचे उत्तर प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीत आहे .ती २ प्रकारे असते . innate[जन्मापासुन असलेली ] आणि adaptive [जन्मानंतर वाढलेली].भरपूर व्यायाम , योगासने ,चालणे, सायकलिंग ,योग्य आहार याने तिची वाढ होऊ शकते. डॉक्टर कोशी ह्याच्या मते जगातील बरेच जणांची रोगप्रतिकारक शक्तीची मोठया प्रमाणात घट झालेली आहे व ती वाढवणे अत्यंत  गरजेचे आहे. मानसिक तणाव,अतिखानपान,चुकीचे खाद्य , व्यायाम न करणे , वेळेवर न झोपणे, प्रदूषण, हि त्याची करणे आहेत.
  3. कोविड-१९ बद्दल माहिती अधिकृत सुत्रांकडूनच मिळवावी उदा.गव्हर्मेंट वेबसाईट , तसेच प्रसिद्ध टीव्ही  चॅनेल्स.शक्यतो  त्याचा नोंदी  करून ठेवा [मोबाइलला नंबर्स वैगरे]. त्याचा आपणास किंवा इतरांना उपयोग होऊ  शकेल .फेक न्यूज वर अजिबात विश्वास ठेऊ नका. आजारा बद्दल माहिती मिळणवण्यासाठी जास्त वेळ टीव्ही बघण्यात घालवू नये.
  4. ह्या संकट समयी समाजाला आपल्या कडून जेवढी जमेल  तेवढी मदतीची अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या अनुभव, कलांचा येथे जरूर  उपयोग होऊ शकतो. स्वामी विवेकानंद च्या मतानुसार “दरिद्रीनारायण सेवा हीच ईश्वर सेवा होय”.

सिंगापुर येथून

  1. सिंगापुर  हा देश ५५ लाख वस्तीचे एक बेट. येथील सामाजिक,आर्थिक  व स्वास्थ्य व्यवस्था शिस्तबद्ध असल्याने , कोविड-१९   प्रसार आटोक्यात आणण्यास सरकार ने पूर्ण लॉक डाउन राबवला आहे, सर्वे आंतराष्ट्रीय ये जा बंद ठेवली आहे, त्या मुळे यश मिळत आहे.
  2. येथील कायदे कडक व अमंलबजावणी तत्परतेने होते  व कोविड-१९ आटोक्यात आणण्यासाठी मास्कचा वापर ,शरीराचे तापमान मोजणे, सामाजिक अंतर ठेवणे, घरून काम करणे,शाळेचे वर्ग इंटरनेटच्या माध्यमातून घेणे,फक्त गरजेसाठीच घराबाहेर पडणे अश्याने व्यवहार सुरु  आहेत. बसेस,रेल्वेत शुकशुकाटआहे.
  3. बऱ्याच सामाजिक संस्था मदत कार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सरकारने सर्वाना मास्क आणि सानिटीझरचे वाटप केले.

भारताविषयी

  1. कोविड-१९ वर मात करण्यासाठी भारताच्या केंद्रीय सरकार, राज्यसरकार ,सर्व भारतीय नागरिक, विशेषता वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे,पोलीस दले ,सेवाभावीसंथा, मीडिया चे काम अतिशय वाखाणण्यासारखे आहे. भारताची खरी ताकद दिसून आली. सर्वाना माझा सलाम.भारताने  कोविड-१९ वर मात  करण्यासाठी उचललेल्या पावलावर सर्व जगाकडून आदरपूर्वक दखल  घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
  2. पुढील काळात कोविड-१९सारख्या विषाणूची निर्मिती करून काही देश बायलॉजिकल वॉरफेर +शस्त्र वापरून युद्ध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने  जागरूक राहणे आवश्यक आहे. बायोटेक सायन्स हा   संरक्षण विभागाचा एक घटक असावा व ते  तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात पैसे  बाजूला ठेवावेत.
  3. जगात सर्वात जास्त लसी ह्या  [निरनिराळ्या] भारतात बनविल्या जातात.भारतीय कंपनी ह्या क्षेत्रात अग्रेसर म्हणून समझल्या जातात. कोविड-१९साठी भारतीय कंपन्यांकडून काही विशेष कामगिरीची अपेक्षा जगाकडून आहे. भारताने अशा आजारावर लस निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा म्हणजे सर्वाना लस माफक किंमतीत मिळू शकेल.
  4. आयुष मंत्रायलयातर्फे भारतीय आयुषचे फायदे आणि रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढविता येईल ह्या विषयावर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात सरपंच, नगरसेवकापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांचा क्रियाशील सहभाग असावा. कोविड-१९  अनुभवाने मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होऊ शकेल. तसेच भविष्यात अशा आजाराला सामना करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक प्रशिक्षण सर्व सामन्यासाठी देण्याची व्यवस्था करावी.

आंतरराष्ट्रीय

  1. इंटरनॅशनल समिती टॉक्सओनॉमी हि विषाणूं या विषयावर काम करते, त्यांच्या आवाहलाप्रमाणे जगात ५४५० प्रकारचे विषाणू आहेत कि जे माणसांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यावर मात करावयासाठी जागतिक पातळीवर  प्रयत्न होणे आवश्यक आहे.
  2. कोविड-१९ उगम व त्यामागची कारणे शोधून त्यावर कायमचा उपाय होणे अत्यंत गरजेचे आहे. काही जागतिक पातळीवर कायदे येऊन त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी म्हणजे भविष्य काळात असा प्रचंड उत्पात सहन करावा लागणार नाही. जंगली जनावरांची देवाण घेवाण व त्याचे मांस  खाण्यावर  जगभर पूर्णतः बंदी घालावी. विरॊलॉजिस्टच्या मते जंगली जनावारा मुळे ७५०००० प्रकारचे विषाणू पसरू शकतात  कि ज्यामुळे करोना सारखा आजार भविष्यात परत डोके वर काढू  शकतो .
  3. WHO  तसेच  UNICEF व  इतर स्वास्थ  क्षेत्रात काम करणाऱ्या कोविड-१९  सारखा आजार भविष्यात रोखण्यासाठी दमदार पावले उचलणे आवश्यक आहे .जगातील नावाजलेल्या संशोधन संस्था, विद्यापीठे, सेवाभावी संस्था ह्यांच्या सहकार्याने एकत्र व पूरक असे काम होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय  संस्कृतीत सात्विक आहाराचे महत्व, हात जोडून नमस्कार तसेच मृत्यू नंतर अग्नी देणे ह्या मागे किती खोल व गर्भित अर्थ आहे हे लक्षात येते. 

जागतिक स्तरावर निसर्गाला उच्चस्तम  स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ती एक भोगवस्तू नसून निसर्गाच्या अस्तित्वामुळे मानव जीवित आहे.निसर्गाचे  आपल्यावर अनंत  उपकार आहेत व त्याच्याच सावलीखाली मानवाची  भरभराट होऊ शकेल हे नक्की.

महर्षी पतंजलींनी ५००० वर्ष पूर्वी खालील प्रमाणे सूत्र सांगितले आहे ते असे. 

संतोषाद् अनुत्तमः सुखलाभः

साधनापाद ,सूत्र ४२

संतोषशाने सुख लाभते व त्यापेक्षा उत्तम सुख नाही.  संतोष म्हणजे मन नेहेमी प्रसन्न व आनंदी राखणे. महत्वाकांक्षा   असेल तर सुखाला  तिलांजली द्यावी लागेल कारण तिला अंत नसतो  तसेच  ती पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट भोगावे लागतात, त्यातच सुख मानावे लागेल.

कोविड-१९  पासून सर्व जगाची लवकरात लवकर मुक्तता होवो व सर्वाना भयमुक्त वातावरणात प्रत्येकाचे  जीवनातं उत्कर्ष  होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुढील शतकाचा नारा ” एक जग ,एक स्वास्थ्य ,एक भविष्य “

राजेंद्र धर्माधिकारी

 

राजेंद्र धर्माधिकारी ,सिंगापुर