वेदला कविता, गाणी, श्लोक अगदी पटापट पाठ होत. आजी आजोबा त्याला रोज नवीन नवीन गाणी, श्लोक शिकवीत आणि वेद ती पटकन पाठ करून म्हणून दाखवत असे. आजूबाजूला रहाणारे शेजारी, नातेवाईक सगळे वेदचे कौतुक करत असत.
वेदच्या इमारतीत एक आजोबांचे मित्र रहात होते. त्यांना सर्वजण तात्या म्हणत असत. अतिशय कंजूष अशी तात्यांची ख्याती होती सोसायटी मध्ये. त्यांचा नातू अंबर, वेदचा चांगला मित्र होता. वेद त्यांच्याकडे नेहमी खेळायला जात असे. अंबरच्या घरी गेला की तात्या वेदला नेहमी कविता, गाणी म्हणायला लावत आणि चॉकलेट किंवा बक्षीस कबूल करत. पण गाणं म्हणून झालं की नुसती शाबासकी देऊन बोळवण करत. वेदला या गोष्टीचा खूप राग येत असे.
त्या दिवशी पुन्हा असेच घडले. आता मात्र वेद फार चिडला. पण तात्यांना कसे काय बोलणार? वेद विचार करत घरी आला.
नेहमी प्रमाणे रात्री आजोबांजवळ झोपायला गेला. आजोबांनी त्याला त्या रात्री अकबर बिरबलाची नवीन गोष्ट सांगितली. त्यामध्ये बिरबलाने कंजूष माणसाची कशी जिरवली हे सांगितले होते. वेदच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मनातल्या मनात विचार करत हसत वेद झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी अंबर कडे खेळायला गेला असताना तात्या आजोबांनी त्याला हाक मारली
“वेद, एक कविता म्हणून दाखव तुला बक्षिस देतो”
वेदने एक छानशी कविता त्यांना ऐकवली. वेदने बक्षीस मागितले.
“अरे वेद, मी तुला फक्त खूष करण्यासाठी म्हटले होते बक्षीस देतो म्हणून. छान म्हटलीस कविता”, तात्या म्हणाले.
“आजोबा आज संध्याकाळी आमच्या घरी या. आमच्या आज घरी वडापावचा बेतआहे. तुम्हाला खूष करतो”, जाता जाता वेद तात्या आजोबांना म्हटला.
“नक्की येतो बाळा”, तात्या म्हणाले.
संध्याकाळी तात्या वेदच्या घरी पोहचले. मस्त खमंग वास येत होता स्वयंपाक घरातून. खरेतर वेदच्या घरात कोणीच नव्हते आणि आईने वेदसाठी तळून ठेवले होते. म्हणून वेदने अंबर आणि तात्यांना घरी बोलावले होते. तात्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. वडापाव कधी येतो याची वाट बघत होते.
“अरे बाळा घरी कोणीच नाही का? ते वडापावचे काय झाले?”, तात्या वेदला म्हणाले
“अहो, आजोबा आज घरी कोणीच नाही, मी तुम्हाला असेच खूष करण्यासाठी बोलावले होते”, वेद हसत म्हणाला #मा_आ_वि #बिरबल #अकबर
मुलांनो तुम्ही आपल्या आईबाबा,आजीआजोबांकडून अकबर बिरबलाच्या गोष्टी नेहमीच ऐकल्या असतील किंवा टीव्हीवर, युट्युब सुद्धा खूप वेळा पाहिल्या असतील. अश्याच काही अकबर बिरबलाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत, पण नव्या स्वरुपात!!
आपल्या गोष्टींमध्ये आहे वेद आणि त्याचे आईबाबा, आजीआजोबा, त्याचे मित्र, शाळा आणि अनेक गमतीजमती.
बाबांनी त्याला मागच्या महिन्यात वचन दिले होते अम्युझमेंट पार्क मध्ये जाण्याचे परीक्षा संपल्यावर. वेदची परीक्षा कालच संपली होती, शेवटचा पेपर पण सुद्धा चांगला गेला होता. त्यामुळे वेदची स्वारी फार खुशीत होती. सगळे ठरल्याप्रमाणे आज बाबांना सुट्टी घेतली होती आणि पार्कसाठी ऑनलाईन तिकिटे पण काढून झाली होती. वेदने तर आधीच पार्कची वेबसाइट बघून तिकडे काय काय करायचे ते ठरवून ठेवले होते.
सकाळ झाली, अलार्म वाजला आणि वेद सगळ्यांच्या आधी तयार उठला तयार होण्यासाठी, धावत बाथरूम मध्ये गेला. घाईगडबडीत बाथरूम मध्ये शिरताना त्याचा पाय घसरला आणि जोरात खाली पडला. आई बाबा धावले वेदचा आवाज ऐकून.
वेद बाथरूम मध्ये आडवा पडला होता अन त्याच्या पायाला पण चांगलेच लागले होते. बाबांनी वेदला उचलले आणि बेडवर आणून ठेवले. पायाला काय झाले याचे वेदला भान नव्हते. आता पार्कला कसे जाणार या विचारानेच वेद रडत होता.
आई बाबा त्याची खूप समजूत घालत होते, पण वेद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला आज कसेही करून पार्क मध्ये जायचेच होते.
“अरे बाळा, आपण तुझा पाय बारा झाल्यावर जाऊ, काळजी करू नकोस, जे होते ते चांगल्यासाठीच होते”. बाबा
हे ऐकून वेदला काही दिवसापूर्वी आजी आणि त्याने वाचलेली अकबर बिरबलाची गोष्ट आठवली. त्यामध्ये अकबराने बिरबलाला छोटयाश्या गोष्टीसाठी तुरुंगात टाकले होते. तेव्हा सुद्धा बिरबल अकबराला असेच काहीसे म्हंणाला होता. “महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते!”
“मग बाबा मला असे का म्हणाले? माझा पाय मुरगळला यात काय चांगले झाले?” वेदला प्रश्न पडला. रडत रडत आणि विचार करत वेद झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी बाबा बातम्या बघत होते आणि त्यामध्ये पार्क मधल्या दुर्घटनेची बातमी आली होती. अम्युझमेंट पार्कमध्ये एक मोठी राईड कोसळली होती. सुदैवाने कोणाला जास्त दुखापत झाली नव्हती.
पण बातमी ऐकताना त्याच्या मनात विचार आला कि जर काल मी पार्क मध्ये गेलो असतो तर कदाचित मी पण अपघातात सापडलो असतो. बरेच झाले काल माझा पाय दुखावला आणि आम्ही घरी होतो.
“जे होते ते चांगल्यासाठीच होते !!!” वेदला बाबांचे कालचे शब्द आठवले
काही वेळेला काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात त्यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही तरी धीर सोडू नका. #मा_आ_वि #बिरबल #अकबर
सुरेख मेसेज, का कुणास ठाऊक, पण व. पु. यांचाच असावा असे वाटते. थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर? दिवसांखेरी, ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या मस्त लागलेल्या दह्याचा?
मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं … नाही का ? दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य, नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसंच set राहिलं, तर त्यातली गोडी निघून जाईल. सपक होईल. …. वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून, तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत, तर कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून ! मला ना, ह्या ताकाचा … हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठचाही अतिरेक झाला, तर आयुष्य पांचटच होतं ! हरेक दिवसाच्या पदार्थ क्रियेची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी, रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं ! ‘उद्याचं’ दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या उबदार क्षणांनी,परत नव्यानं दही विरजायचं. #मा_आ_वि #दही #आयुष्य
सकाळी सकाळी चहापाणी आवरून जोशी काकू आपल्या तिसऱ्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीत खुर्ची टाकून बसल्या होत्या. सकाळची वेळ असून देखील बाहेर चांगले कडाक्याचे ऊन पडलेले होते. सोसायटीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. फेरीवाले रस्त्यावरून जाता जाता संपूर्ण बिल्डिंगला ऐकू जाईल अशा आवाजात मोठमोठ्याने ओरडून आपल्या मालाची जाहिरात करीत होते. सोसायटीच्या आवारात काही लहान मुले खेळत होती. माळी झाडांना पाणी देत होता. जोशी काकू बाल्कनीत बसल्या बसल्या बाहेरच्या सर्व हालचाली बघत होत्या. अधून-मधून खाली खेळणाऱ्या मुलांना आवाज करू नका असा दम देत होत्या.
वॉचमन नेहमी प्रमाणे गेट उघडा ठेऊन पाणी बघण्यासाठी गेला. गेट उघडाच असल्यामुळे एक मास्क विकणारी बाई सोसायटीच्या आवारात शिरली. एका हातात मास्कने भरलेली पिशवी आणि दुसऱ्या हाताने कटीवर बसलेल्या तान्ह्या मुलाला सांभाळीत जोरजोरात आवाज देऊ लागली.
“मास्क घ्या मास्क …”
जोशी काकूंनी तिला बघितले आणि हाक मारली.
“ये मास्कवाले…वरती ये”
मास्क विकणारी बाई मान वळवून इकडे तिकडे बघू लागली.
“अगं…इकडं इकडं…वरती ये”
मास्कवालीने आवाजाच्या दिशेने वर पाहिले. कडाक्याच्या उन्हामुळे ती घामाघूम झाली होती. कपाळावरून घाम ओघळत होता. वरती मान केल्यामुळे घामाचा थेंब तिच्या डोळ्यात गेला. तिने पटकन मान खाली केली आणि खालच्या मानेनेच उत्तर दिले.
“येते येते…बाईसाहेब”
बिल्डिंगला लिफ्टची सोय नव्हती, त्यामुळे ती मास्कवाली जिना चढून तिसऱ्या माळ्यावर गेली. हातामध्ये मास्कने गच्चं भरलेली पिशवी आणि कटीवर असलेल्या मुलाच्या वजनामुळे तिला धाप लागली. जरासं सावरल्यावर तिने दारावरची बेल वाजवली. जोशी काकूंच्या मुलाने दरवाजा उघडला आणि त्या मास्कवालीला पाहताक्षणी तिचे ऐकून न घेताच “नही चाहिये” असे म्हणुन दरवाजा बंद करून घेतला.
ती मास्कवालीबाई बिचारी रडकुंडीलाच आली. असा पटकन तोंडावर दरवाजा बंद केलेला बघून तिला फार वाईट वाटले. ती फार दुखावली. परंतु नाईलाजाने तिने परत बेल वाजविली. परत मुलाने दरवाजा उघडला आणि तिच्यावर डाफरला.
“अरे नही चाहिये बोला ना”
“पण दादा बाईसाहेबांनी हाक मारून वर बोलावलंय”, त्या मास्कवालीने दरवाजा बंद करायच्या आत सांगून टाकले.
“ठीक आहे…थांब जरा” असे बोलून त्याने दारातूनच विचारले, “आई, तू कोणाला बोलावलं आहेस का?’
“हो हो…आले थांब”, जोशी काकूंनी बाल्कनीतून होकार दिला.
“कशाला कोणाला बोलावतेस? तुला माहित आहे ना सध्याची काय परिस्थिती आहे”, मुलगा त्यांच्यावर जवळजवळ रागवलाच.
“अरे मास्कवाली आहे ती…म्हटले घेते एखादा”, काकू दारात येत म्हणाल्या
“अगं तुला मास्क पाहिजे तर मला सांगायचं ना, आमच्या ऑफिस मध्ये कित्येक पडलेत, आणला असता मी तुझ्यासाठी तिथून”
“अरे तसं नाही, पण म्हटले दारापर्यंत आलीच आहे तर घेते एखादा”.
“ठीक आहे… घे मग”, असे बोलून मुलगा घरात निघून गेला.
“हां, बोल… कसे दिले मास्क?”, पिशवीतील एक मास्क उचलीत काकूंनी विचारले.
“वीस रुपये”
“वीस रुपये? बापरे !! काय मस्करी करतेस कि काय? इतके महाग असतात होय मास्क?”
“नाही नाही, वीस रुपये खूप जास्त आहेत. काहीतरी कमी कर”
“नाही बाईसाहेब, वीस रुपये बरोबर आहे”
“काय नाही? वीस रुपये खूप जास्त आहेत. पंधरा लाव”
“नाही बाईसाहेब, पंधराला नाही परवडत, दिवसभर फिरल्यावर दहा पंधरा रुपये मिळतात कसेतरी”
“नाही नाही, वीस रुपये नाही देणार”
“नका बाईसाहेब असं नका करू…बरं अठरा द्या”
“अगं आई मी तुला सांगितलं ना नको घेऊ म्हणून”, मुलगा बेडरूम मधून बाहेर येत म्हणाला.
“ठीक आहे घ्या पंधराला”, मास्कवाली नाईलाजाने म्हणाली.
“मी तर तुला आधीच म्हटले होते, पण तुम्हा लोकांना किटकिट केल्या शिवाय होत नाही, बरं दे एक चांगला काढून”, जोशी काकूंनी इलॅस्टिक आणि शिलाई जोरजोरात खेचून बघितलेला मास्क परत तिच्या पिशवीत टाकीत म्हटले.
मास्कवालीने कटीवरच्या मुलाला सांभाळीत दुसऱ्या हाताने पिशवीतून एक नवा मास्क काढून दिला. जोशी काकूंनी त्याची पण शिलाई आणि इलॅस्टिक तपासून पाहिली.
“चांगला आहे बाईसाहेब, अजून पर्यंत कोणाची काही तक्रार नाही आली”, मास्कवालीने आपल्या मालाची हम्मी दिली.
“ठीक आहे, ठीक आहे. सगळे धंद्यावाले असेच बोलतात. हे घे पैसे आणि पाच रुपये परत दे”, काकूंचा मुलगा तिला वीस रुपयांची नोट देत म्हणाला.
“दादा, पाच रुपये सुट्टे नाहीत. तुमच्या हातची बोहनी आहे”, मास्कवालीने दिलगिरी व्यक्त केली.
“हे तुमच्या लोकांचे नाटकंच असतात, पैसे सुट्टे नाहीत, मग दोन वस्तू घ्या नाहीतर बाकीचे पैसे सोडा”
“दादा असं नका बोलू, खरंच नाही हो सुट्टे”
“ठीक आहे मग सुट्टे झाल्यावर ये”, असे बोलून मुलाने काकूंच्या हातून मास्क घेऊन पिशवीत टाकला आणि वीस रुपयांची नोट परत घेतली.
मास्कवाली स्तब्ध झाली. तिला काय बोलावे हे कळेना. ती त्या मायलेकांकडे बघतच राहिली.
“आई तू असं कुणाला पण नको बोलवत जाऊस. लोकडाऊनचा फायदा घेऊन ह्या लोकांनी लूट माजवली आहे”, मुलगा काकुंवर रागावला.
“दादा मी कुणी चोर भामटी नाहीये, लोकडाऊन मुळे नवऱ्याची नोकरी गेली म्हणून घर चालवण्यासाठी नाईलाजाने हा धंदा करतेय”, मास्कवालीने आपली व्यथा मांडली.
त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून समोरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू अनिल चव्हाणच्या बायकोने दरवाजा उघडला. मास्कवाली जवळ येऊन विचारले,
“कसे दिले मास्क?”
“वीस रुपयाला एक”
“वीस रुपये? खूप महाग आहे. दुकानात पंधरा रुपयाला आहे. काही कमी कर”
“अगं मला पण अगोदर वीसच म्हणाली होती. भाव केल्यावर पंधराला द्यायला तयार झाली. पण पैसे सुट्टे नाही म्हणून नाही घेतला”, जोशी काकूंनी मधेच बोलून आपली हुशारी दाखवली.
“काय गं, मग माझ्याकडून का वीस मागतेस? मी पण पंधराच देईल”, अनिलच्या बायकोने पण संधीचा फायदा घेतला. अनिल चव्हाण दारात उभा राहून सर्व ऐकत होता. तो पुढे येऊन त्याच्या बायकोला म्हणाला,
“काय मिळेल तुला पाच रुपये वाचवून? काय होईल त्याने?”
“अहो पण भाव तर करायलाच पाहिजे ना, मागितली ती किंमत देऊन कसं चालेल?”
“तुझं म्हणणं मला पटत, पण कुठे भाव करायचा आणि कुठे नाही हे तुला समजायला पाहिजे, त्या बाईकडे बघ, एका हातात इतकी जड पिशवी, दुसऱ्या हातात लहान बाळ आणि ती पाच रुपयांसाठी तीन माळे चढून आली आहे. त्याचा तरी विचार कर…असे कितीच रुपये आपण रोज व्यर्थ खर्च करतो, कधी त्याचा विचार केलास का? मी एक सफाई कामगार आहे. रोज दारू पिल्या शिवाय नाल्यात गटारात उतरू शकत नाही. दारूवर रोज शंभर दीडशे रुपये खर्च होतात.आणि इतक्या घाणीत काम केल्यामुळे मला कधी ही काही ही होऊ शकते. समज मला काही झाले आणि तुझ्यावर अशी वेळ आली तर?”
अनिलचे असे बोलणे ऐकून त्याची बायको काहीच बोलली नाही. तिला त्याचे म्हणणे पटले. पण जोशी काकूंना त्याचा फार राग आला. त्या पटकन म्हणाल्या,
“अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे कि नाही? असे अभद्र बोलणे तुम्हाला शोभते का?”
“आई तू चल घरात, अशा लोकांच्या तोंडी नको लागायला”, असे बोलून काकूंच्या मुलाने दरवाजा बंद करून घेतला.
“ओ ताई, केवढ्याला आहे ते मास्क वीस रुपयाला ना? द्या दहा, हे घ्या दोनशे रुपये”, अनिलने दोनशे रुपयांची नोट काढून दिली.
“दहा? आणि एवढ्या मास्कच काय करणार?” अनिलच्या बायकोने आश्चर्याने विचारले.
“माझ्या मित्रांना वाटणार…रोज दारू सिगरेट शेअर करतो, आज मास्क करू”
मास्कवालीने दोनशे रुपये घेतले, मास्कच्या पिशवीला आणि आपल्या कपाळी लावले. दहा मास्क काढून अनिलला दिले आणि त्याचे आभार मानले. मास्कची पिशवी उचलून पायऱ्या उतरू लागली. तशी अनिलने तिला हाक मारली,
“ओ ताई, काही पाणी बिनी देऊ का?”
पाण्याचं नाव ऐकून ती बाई थांबली, तिचा गळा सुकला होता, तिला खरोखर पाण्याची गरज होती. उतरलेल्या दोन पायऱ्या परत चढून ती वरती आली. अनिलने तिला बसायला चटई दिली. मास्कवालीने पिशवी आणि बाळाला खाली ठेवले आणि चटईवर बसली. अनिल घरात गेला. त्याचा भरलेला टिफिन एका थाळीत टाकून घेऊन आला. मास्कवालीच्या समोर थाळी ठेऊन म्हणाला,
“घे ताई, भावाच्या घरची चटणी मिरची गोड मानून घे”
अनिलची माणुसकी बघून मास्कवालीचे डोळे भरून आले. तिने डोळ्यांना पदर लावला. तिचे रडणे बघून अनिलच्या बायकोचे देखील डोळे भरून आले. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान वाटला. मास्कवालीचे रडणे बघून अनिल पुढे येऊन म्हणाला,
“ये ताई, रडायला काय झालं? मी तर माझं कर्तव्यच केलं. खा ते… आणि हो भावोजींना जो पर्यंत नोकरी नाही लागत तो पर्यंत काही लागलं तर हक्काने या भावाच्या घरी ये”
मास्कवालीने मानेने होकार दिला. आणि अनिलच्या माणुसकीला सलाम केला.
अनिश सरळ नाक, उंच सडपातळ आणि काटक शरीर, गोरा रंग, काळे डोळे, तल्लख बुद्धी वर्गात नेहमी पहिला, ९ वीत शाळेत जाणारा हुशार विद्यार्थी. अनिशाचे बाबा यांत्रिकी अभियंता. विमानाची इंजिन बनवणाऱ्या कंपनीत कामाला. रात्री उशिरा बसून flight simulation गेम खेळणे हा त्यांचा आवडता छंद.
प्रसंग १
अनिश शाळेत हुशार व खेळात पुढे आहे, जोरात धावणे यामुळे सर्वांना चांगला माहिती आहे. २५ जणांच्या वर्गातील १५ मुलींमधे अनिश वर्गात शिरला की एक प्रकारचे प्रफुल्लित वातावरण तयार होई. सगळ्याच जणी तो आपल्याकडे बघतोय का हे नजरेच्या कोपऱ्यातून चोरटा द्रुष्टीक्षेप टाकून पाहत. पण जेव्हा अनिशला वर्गात चौफेर नजर टाकून आपल्या जागेवर बसे तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याचे धाडस एकीलाही जमत नसे, त्यामुळे अनिश नेहमीप्रमाणे सायकल वरून शाळेत आल्यावर सरळ येऊन आपल्या जागेवर बस असे. काही दिवसानी, त्याला जाणवू लागले की दुसर्या बाकावर बसणाऱ्या कोमलची त्याच्यावर रेंगाळणारी व त्याने पहिले की हळूच दूर जाणारी नजर. ही गोष्ट त्याला विचारात पाडत असे.
प्रसंग २
नेहमी प्रमाणे अनिश बाबासोबत रात्री उशिरा flight simulation खेळत होता. विमानात landing gear चे काम कसे चालते ही तंत्र बाबा दाखवत होते.
“अरे, हे बघ, एक नजर टाकून विमानाचा वेग बघायचा, आणि पटकन त्याच वेळी दुसर्या कोपऱ्यातून उंची पाहायची, आणि हा असा gear टाकायचा, एकदम भारी वाटते ना!” बाबा अनिशला सांगत होते.
अनिशला क्षणार्धात कोमलची डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला पहाणारी नजर आठवली आणि त्याला “भारी वाटले” ही भावना अचानकपणे कोमलच्या त्या नेत्र कटाक्षाला फिट्ट बसली.
प्रसंग ३
दुसर्या दिवशी अनिश शाळेत आला. वर्गात त्याच्या जागेवर नेहमी सारखा बसायला तो उभा असताना त्याची नजर चौफेर गेली आणि अपेक्षेप्रमाणे कोमलची नजर त्याला न्याहाळत होती. रात्रीचा “भारी वाटते” हे वाक्य कानात गुंजले. आज तिने नजर फिरवायच्या आत अनिशने कोमलच्या नजरेला आपल्या नजरेत कैद केले. नंतरचा दोन अडीच सेकंदाचा काळ अनिश व कोमल युगापेक्षा मोठा वाटला.
प्रसंग ४
आज रात्री नेहमी प्रमाणे flight simulation करायला अनिश बाबाची आतुरतेने वाट बघत होता. बाबाला कामावर उशीर झाला. अनिशला काही landing gear चे तंत्र नीट माहिती नव्हते. त्याने बाबाना येई पर्यंत flight simulation मध्ये विमान उडवत चालवले.
“बाबा अजून मला landing नीट करता येत नाही काय करू” बाबा घरी आल्यावर त्यांना विचारले.
“अरे त्यात काय आहे, हे बघ, हा वेग कमी करत उंची हळूहळू कमी केली आणि एक नजर इकडे एक नजर तिकडे पटकन landing gear टाकायचा” बाबानी सफाईने अनिशचे विमान उतरवले.
“जो पर्यंत जमात नाही तो पर्यंत कर, नजर इकडे आणि तिकडे, मग तुला ही भारी वाटेल” बाबा उठून जेवायला गेले.
प्रसंग ५
आज अनिश शाळेत नेहमी पेक्षा लवकर पोहोचला होता. आपल्या जागेवर बसून काहीतरी वाचल्याचे करत होता. शाळेची बस आली आणि मुले मुली वर्गात येऊ लागले. दारातून आत येताना अनिश त्याच्या जागेवर बसलेला पाहून कोमल चमकली. त्याच क्षणी अनिशने तिला आपल्या नजरेच्या बंधात खिळवले आणि हळूच वर्गाच्या दुसर्या दाराकडे नजर टाकली. वर्ग संपल्यावर अनिश मागच्या दारातून बाहेर पडला व उभा राहिला. त्याला उठताना पाहून कोमल ही जागेवरून उठली आणि मागच्या दाराकडून बाहेर गेली.
“तू मला असे का बघतेस?” अनिश
“काही नाही, तुला बघितले की माझा दिवस चांगला जातो.” कोमल
“ते तर तू मला केव्हा ही बघू शकतेस” अनिश
“पण तेव्हा तू बघत नसतोस ना. सगळ्या वर्गा समोर तू माझ्या नजरेला नजर दिलीस ना, की फार भारी वाटते” कोमल
“अजून केव्हा भारी वाटते?” अनिश तिला ही भारी वाटते या भावनेने उत्साही झाला
“चल आता मला भूक लागली आहे, नंतर भेटू तेव्हा सांगते” कोमल तिच्या बाकापाशी जाऊन डबा खाऊ लागली.
प्रसंग ६
बस नेहमीच्या वेळी सुटली, कोमल बसने न जाता, शाळेत थांबली होती. अनिश शोधत वर्ग मागे आला. कोमलला तिथे पाहून त्याला काही वेगळे वाटू लागले. कोमल आता त्याच्या नजरेला नजर द्यायला काहीशी कचरत होती. अनिश तिच्या जवळ येऊन उभा राहिला.
“आज बस का सोडलीस”
“असेच”
“तू का मागे राहिलास?”
“आज सायकल नाही आणली, चालत जाईन, म्हणून उभा होतो. पण तू बस मध्ये चढताना दिसली नाहीस.”
“तुला काय ठाऊक मी इकडे आहे?” कोमलच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. तिने एक पाऊल अनिशकडे टाकले.
“मग तू कोठे जाणार होतीस?” अनिशला आपली कानशील गरम झाल्याचा भास झाला.
कोमल काही न बोलता अनिशच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्यात व अनिश मध्ये काही इंच अंतर उरले होते.
दोघांच्या ही शरीराला थोडा कंप सुटला, कोमलने नजर उचलून अनिशकडे पहिले. अनिशचा श्वास तिला चेहर्यावर जाणवला.
अनिशला काय होते आहे नक्की कळत नव्हते, भारी वाटतंय की भीती वाटते. एकच क्षण गेला असेल. “जो पर्यंत जमत नाही तो पर्यंत प्रयत्न कर, जमले की तुला भारी वाटेल” हे वाक्य कानी पडले. अनिशने कोमलला हळूच स्पर्श केला.
“कोण आहे तिकडे” मागून आवाज आला, कोणी तरी शाळेचे वर्ग बंद करायला आले होते.
दोघंही आवाजाने दचकले, कोमलला समोरून शाळेची रखवाली करणारे मामा येताना दिसले. आता दोघांची भीतीने गाळण उडली होती. रखवाली करणारे मामा तिथे आले अनिशला त्यांनी सहज ओळखले
“काय अनिश घरी जायला उशीर का करतोय?”
“अं , काही नाही मामा, कोमलची अभ्यासाची वही सापडत नाही म्हणून ती बघतो आहोत, हो ना कोमल?”
“हो ना, मामा, तुम्हाला दिसली वर्ग बंद करताना तर पहा बरं”
कशी तरी वेळ टाळून गेली
प्रसंग ७
कोमल घरी बसने आली नाही म्हणून तिच्या वडीलांनी कोमलला धारेवर धरले. कोमल ओक्साबोक्शी रडून अनिश सोबत असल्याचे बोलून गेली. दुसर्या दिवशी कोमलचे बाबा पोलीस घेऊन शाळेत आले. अनिश पुरता घाबरून गेला. पोलीसानी रखवालदार मामा व शाळेतील वर्ग शिक्षक यांना थोडी विचारपूस केली. कोमलच्या वडीलांच्या आग्रहामुळे जबानी सूचना देऊन घटना रद्द केली.
प्रसंग ८
शाळेत जाणे अनिशला अवघड वाटू लागले, अनिशचे वर्गात अभ्यासात लक्ष लागे ना. पहिला येणार मुलगा या छोट्या घटने मुळे मोडतो की काय यामुळे अनिशचे आई-बाबा काळजीत पडले. बाबानी अनिशला विचारले. अनिश भरल्या आवाजात म्हणाला “बाबा काय भारी आहे आणि काय नाही यातील फरक नाही रे कळला मला. मग आणि ते समोर आल्यावर कसे वागावे ह्यात मी गडबडलो” आता ९ वीत शाळा बदल करून आता दुसरी शाळा घेणे त्यांना क्रम प्राप्त झाले.
प्रतिक
प्रतिक कुरळे केस, बोलक चेहरा, वर्ण गव्हाळ, पिंगट डोळे, स्वभाव शांत, थोडासा अबोल पण विषय मिळला तर गप्पा खूप मारेल कारण माहिती खूप. ९ वीत शिकणारा मुलगा, वर्गात पहिल्या पाचात नंबर असे. प्रतिकचे बाबा बँकेत कामाला. रात्री झोपायच्या आधी चालायला जाणे व दोघांना गप्पा मारायला आवडे.
प्रसंग १
वर्गात शिक्षकानी प्रश्न विचारला की सर्वात आधी उत्तर द्यायला तयार आणि कोणालाही प्रश्न पडला तर शिक्षक सांगण्या आधी त्या प्रश्नावर मुद्दे मांडणार मुलगा म्हणून प्रतिक सर्वांना माहिती आहे. कोणताही विषय असो त्यावर विचार मांडणे व चर्चा करणे ही प्रतिकची सहज प्रवृत्ती होती. प्रतिक वर्गात आला की सर्व मूला-मुलीना एक प्रकारचा आनंद होई. शिक्षकांना कदाचित काही वेळ अति बोलतो असेही वाटे. वर्गात सर्वांशी मिळून वागणे, काम असेल तर मोचके बोलणे आणि कोणाला प्रश्न असेल तर खूप चर्चा करणे हा प्रतिकच नैमित्तिक दिनक्रम असे.
प्रसंग २
नेहमी प्रमाणे प्रतिक जेवून रात्री बाबासोबत चालायला उतरला होता. प्रतिकचा आवडता विषय बायोलॉजी व त्यावरून रात्री आजूबाजूला येणारे रातकिडयाचे आवाज, कधी पाऊस पडला असेल तर बेडूक ओरडतानाचे आवाज यावर प्रतिक व बाबाच्या गप्पा रंगत.
“तो ऐक आवाज आला का” प्रतिक
“नाही” बाबा
“नीट ऐक, मध्ये थांबून परत आवाज करतोय” प्रतिक
“ह आता आला” बाबा
“हा आवाज male frog चा आहे, ते त्याच्या female ला आकर्षित करायला असा आवाज करतात” प्रतिक
“तुला रे काय ठाऊक” बाबा
“अरे बाबा, ही खूप साधी गोष्ट आहे पाऊस पडून पाणी जमले की बेडूकांचा mating season येतो. काही काही बेडकांच्या जमातीत बेडूक मादी meting झाल्यावर नर बेडकाला खाऊन टाकते. कारण तिला अंडी देऊन तिथे बसून राहावे लागते मग तिला खायला दुसरे काही नाही मिळत” प्रतिक
“अरे हे तर भयंकर आहे” बाबा
“तीच तर गंमत आहे, तरी पण तो बेडूक mating call देतो.” प्रतिक
प्रसंग ३
वर्गात विषय कोणता ही असो त्यावर गप्पा मारणे व वेगवेगळे अर्थ काढणे ही नेहमीची चर्चा प्रतिक व चित्रा करीत. आजचा विषय होता city planning in Asia. या दोघांनी कंबोडियाची राजधानी फ़्नोम पेन्ह येथे सार्वजनिक सोई कशा आहेत यावर चर्चा केली. शाळे तर्फे गट बनवून नव्या युगातील शहर विकास उपक्रम यावर वाद विवाद आणि चर्चा करण्याची नाव नोंदणी केली. यात वेळ कसं गेला हे कळले नाही. तयारी करायला वेळ मिळावा म्हणून प्रतिक शाळेची बस सोडून चित्रा सोबत मागे थांबला. विषय दोघांच्या आवडीचा होता. पाण्याचे प्रश्न, पाऊस पडून येणारा पूर,या पासून वाचण्यासाठी जमिनी खाली जलन्निस्सारण रचना कशी बनवावी यावर विचार करून दोघ उशिरा घरी गेले.
प्रसंग ४
प्रतिक उशिरा घरी आल्यामुळे जेवायला उशीर झाला होता. त्यामुळे प्रतिक व बाबाना रात्री चालायला उतरायला नेहमी पेक्षा उशीर झाला होता.
आज काही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे बेडकांचे आवाज सोबतीला नव्हते. व रात्रीचे दिवे वाटेवर जागोजागी लागले होते. जिथे दिवे नाहीत तिथे वाटेवर अंधार होता. प्रतिक अजून ही जलन्निसारण उपक्रम वर विचार करत होता. त्यामुळे अजून गप्पा सुरू झाल्या नव्हत्या.
चलता चलता वाटेच्या बाजूला असलेल्या बाकावर दोन व्यक्ति बसलेल्या दिसल्या. प्रतिक व बाबा त्यांच्या बाजूने गेले. तरी त्या दोघांना काही जाणवले नाही.
“तू बघितलेस?”
“काय?”
“ते काय करत होते?”
“नाही, कोण?”
“अरे कोण काय? त्या बाकावर बसलेले ते दोघे?”
प्रतिकने मागे वळून पहिले, त्याला अंधारात नीट दिसले नाही. एक मुलगा व बाजूला एक मुलगी बसलेले दिसले
“नाही, नीट दिसत नाही ते, काय करतायत?”
“अरे बघ आपण परत जाऊ तेव्हा”
“बरं, तू काय विचार करतोयस?”
गप्पा सुरू झाल्या प्रतिक पाण्याचे प्रश्न कसे असतात यावर बोलू लागला. परतीच्या मार्गावर बाबानी त्याला हळूच जाणीव करून दिली की ते दोघे अजून आहेत.
“अरे ही नक्की काय करतायत?” प्रतिकने आश्चर्य व्यक्त करीत विचारले. कारण त्याला दिसले की ती मुलगी, मुलांचा हात हातात घेऊन चक्क nail cutter घेऊन नख कापत होती. ते ही या अंधारात.
“हे बघ परवा तू मला नर बेडकाला खाणाऱ्या मादी बेडकीबद्दल सांगितले ना. माणसाचे ही बरेचसे तसेच आहे. या दोन व्यक्ती बद्दल आता तेच होत आहे, फक्त हे थोडे मानवी प्रकाराने आहे. पण mating call हा योग्य वेळी द्यावा ही गोष्ट नीट समजून घेतली तर काही चूक होणार नाही.”
प्रतिक क्षणभर या विचारात मग्न झाला व हसला काहीसा आणि परत गप्पा मारू लागला
प्रसंग ५
इकडे city planning ची स्पर्धा जवळ आली होती. प्रतिक व चित्रा रोज उशिरा थांबून तयारी करत होते. करताना नवीन जमिनी खालच्या नालीचा नकाशा तयार झाल्याच्या उत्साहात प्रतिकने चित्राला एकदम आनंदाने मिठी मारली, चित्राला तेवढाच आनंद झाला होता की हा नकाशा आपल्याला स्पर्धेत नाव मिळवून देईल. तिने ही मिठी स्वीकारली. त्या अवस्थेत प्रतिक चित्राच्या कानात कुजबुजला
“हा काही mating call नाही … चल सोड आता”
दोघांनी हसून आपापले हात मागे घेतले व नकाशा गुंडाळून इतर तयारीला लागले
प्रसंग ६
स्पर्धा चांगली झाली प्रतिक व चित्राच्या नकाशाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या प्रकारच्या स्पर्धेत त्यांच्या शाळेला मिळालेले ही पहिले पारितोषिक होते त्यामुळे शाळेने खूप कौतुक केले.
प्रसंग ७
आज रात्री गप्पा सुरू करायच्या आधी प्रतिक बाबाना म्हणाला तुम्ही त्या मानवी mating call ची उपमा दिल्या मुळे मला काय कुठे योग्य ही जाणीव किती सहज उमगली. आता mating call वर शंका नाहीच, तर यावर विचार आणि चर्चा करायला मी आणि माझे मित्र-मैत्रिणी सज्ज आहोत.
खरेतर पुणेरी पाट्या या सदराखाली मोडणारा पण “McDonald विशेष” म्हणुन वेगळा वाटतो.
पुण्यातील धंदेवाला मराठी, मानवी मनाच्या, विशेष करुन ग्राहक समुदायाच्या मानसिकतेचा ठाव घेउन, नको इतके उघडपणे अापल्या अनुभवजन्य चातुर्याचे जाहीर प्रदर्शन कसे करु शकतो याचे अतिशयोक्ती अलंकृत विवरण.
पुणेरी (McDonald) मॅकडोनाल्ड 1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल. 2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये) 3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. 4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे. 5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. 6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. 7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज) 8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५) 9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत. 10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत. 11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत. 12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी. 13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत. 14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही. 15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये) 16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत) 17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत. 18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
खालिल लेख मला माझ्या भावाकडुन अाला. मी रजनीकांतचा खुप मोठा चाहता नाही, पण एक मराठी भाषिक असल्याकारणाने, रजनीकांत (शिवाजी राव गायकवाड) यांच्या प्रसिद्धीचे वादळ, मराठी मनावर कसा परिणाम करते अाहे याचे सुंदर वर्णन करणारा हा लेख मला खुप जवळचा वाटला.
हा लेख सुरुवातीला रजनीकांत (रजनी) यांच्या पडद्यावरच्या अभिनेत्याचे जनसामान्याच्या मनातील प्रतिमेचे सुंदर चित्रण करुन मग, मुख्य मुद्याकडे वळतो. मराठी चित्रपटांचा उंचावणारा दर्जा, सामान्य मराठी माणसाचे चित्रपटाकडे अौदासीन्य अाणि यातुन मराठी चित्रपटाला अाकर्षक व झगमगीत करण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न पुढील संभाषणातुन अतिशय प्रंजळपणे व्यक्त होते. रजनीच्या व्यक्तीचित्राची उंची दाखवताना लेखकाले वापरलेली Phantom च्या Old Jungle Saying’s ची लकब या लेखात अतिशय चपखलपणे बसली अाहे. संपुर्ण लेखभर New Rajni Sayings पेरताना “इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड”, “घोड्यावर रागवून मारलेला पंच”, “(+ / -) वेव्जच्या टक्कर”, “परतीचा पाऊस”, “आईन्स्टाईन सोबतची अार्ग्युमेंट” इत्यादी कल्पना चोखंदळपणे वापरताना एकंदरीत लेखकाचा बहुश्रुततेतुन अालेला अनुभव दिसतो अाहे.
हा लेख वाचताना, तुम्हाला माझ्या वरील विवरणाचा प्रत्यय नक्की येइल.
टीप: खालिल लेख माझा नाही.
रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!
काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.
“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”
“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो” “नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला”
“ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?” “ष्टोरी तुमी म्हनाल ती”
“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?” “गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”
“डिरेक्टर कोण आहे?” “शंकर”
“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?” “न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”
“बरं” “आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”
“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही” “आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?
“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?” “आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”
“कमाल झाली तुमची..” “तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”
“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?” “काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना, पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”
“आणि पेमेंटचं काय?” “पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी”
“नशीब माझं. पण किती देणार?” “मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब”
“रोजचे साडेबारा लाख फक्त?” “लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब”
एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)
फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला.(…आणि हवामान खात्याच्या मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)
मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)
मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल…
…की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)
त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.
(वरील माहिती आमच्या मते शंभर टक्के खरी आहे. जिज्ञासूंनी खुद्द रजनीदेवाला मेल करून खात्री करून घ्यावी. त्याचा ईमेल आयडी- [email protected])