Posts Tagged ‘बिरबल कथा’

बिरबल कथा | कंजूष माणूस

बिरबल कथा | कंजूष माणूस
कंजूस माणूस

चित्र संदर्भ: कंजूस माणूस
चित्र संदर्भ: टेलिंग लाईज्

वेदला कविता, गाणी, श्लोक अगदी पटापट पाठ होत. आजी आजोबा त्याला रोज नवीन नवीन गाणी, श्लोक शिकवीत आणि वेद ती पटकन पाठ करून म्हणून दाखवत असे. आजूबाजूला रहाणारे शेजारी, नातेवाईक सगळे वेदचे कौतुक करत असत.

वेदच्या इमारतीत एक आजोबांचे मित्र रहात होते. त्यांना सर्वजण तात्या म्हणत असत. अतिशय कंजूष अशी तात्यांची ख्याती होती सोसायटी मध्ये. त्यांचा नातू अंबर, वेदचा चांगला मित्र होता. वेद त्यांच्याकडे नेहमी खेळायला जात असे. अंबरच्या घरी गेला की तात्या वेदला नेहमी कविता, गाणी म्हणायला लावत आणि चॉकलेट किंवा बक्षीस कबूल करत. पण गाणं म्हणून झालं की नुसती शाबासकी देऊन बोळवण करत. वेदला या गोष्टीचा खूप राग येत असे.

त्या दिवशी पुन्हा असेच घडले. आता मात्र वेद फार चिडला. पण तात्यांना कसे काय बोलणार? वेद विचार करत घरी आला.

नेहमी प्रमाणे रात्री आजोबांजवळ झोपायला गेला. आजोबांनी त्याला त्या रात्री अकबर बिरबलाची नवीन गोष्ट सांगितली. त्यामध्ये बिरबलाने कंजूष माणसाची कशी जिरवली हे सांगितले होते. वेदच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मनातल्या मनात विचार करत हसत वेद झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी अंबर कडे खेळायला गेला असताना तात्या आजोबांनी त्याला हाक मारली

“वेद, एक कविता म्हणून दाखव तुला बक्षिस देतो”

वेदने एक छानशी कविता त्यांना ऐकवली. वेदने बक्षीस मागितले.

“अरे वेद, मी तुला फक्त खूष करण्यासाठी म्हटले होते बक्षीस देतो म्हणून. छान म्हटलीस कविता”, तात्या म्हणाले.

“आजोबा आज संध्याकाळी आमच्या घरी या. आमच्या आज घरी वडापावचा बेतआहे. तुम्हाला खूष करतो”, जाता जाता वेद तात्या आजोबांना म्हटला.

“नक्की येतो बाळा”, तात्या म्हणाले.

संध्याकाळी तात्या वेदच्या घरी पोहचले. मस्त खमंग वास येत होता स्वयंपाक घरातून. खरेतर वेदच्या घरात कोणीच नव्हते आणि आईने वेदसाठी तळून ठेवले होते. म्हणून वेदने अंबर आणि तात्यांना घरी बोलावले होते. तात्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. वडापाव कधी येतो याची वाट बघत होते.

“अरे बाळा घरी कोणीच नाही का? ते वडापावचे काय झाले?”, तात्या वेदला म्हणाले

“अहो, आजोबा आज घरी कोणीच नाही, मी तुम्हाला असेच खूष करण्यासाठी बोलावले होते”, वेद हसत म्हणाला #मा_आ_वि #बिरबल #अकबर

तात्यांना जे समजायचे समजले आणि त्यांनी पुन्हा कधी वेदला खोटे वचन दिले नाही.

तात्पर्य: कधीही खोटे बोलू नये आणि कुणाला दुखवू नये!

बिरबल कथा | जे होते ते चांगल्या साठी

मुलांनो तुम्ही आपल्या आईबाबा,आजीआजोबांकडून अकबर बिरबलाच्या गोष्टी नेहमीच ऐकल्या असतील किंवा टीव्हीवर, युट्युब सुद्धा खूप वेळा पाहिल्या असतील. अश्याच काही अकबर बिरबलाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत, पण नव्या स्वरुपात!!

आपल्या गोष्टींमध्ये आहे वेद आणि त्याचे आईबाबा, आजीआजोबा, त्याचे मित्र, शाळा आणि अनेक गमतीजमती.

चला तर मग तयार आहात ना वेदला भेटायला??

@amolpandav

बिरबल कथा | जे होते ते चांगल्यासाठी

वेद आजच्या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता.

बाबांनी त्याला मागच्या महिन्यात वचन दिले होते अम्युझमेंट पार्क मध्ये जाण्याचे परीक्षा संपल्यावर. वेदची परीक्षा कालच संपली होती, शेवटचा पेपर पण सुद्धा चांगला गेला होता. त्यामुळे वेदची स्वारी फार खुशीत होती. सगळे ठरल्याप्रमाणे आज बाबांना सुट्टी घेतली होती आणि पार्कसाठी ऑनलाईन तिकिटे पण काढून झाली होती. वेदने तर आधीच पार्कची वेबसाइट बघून तिकडे काय काय करायचे ते ठरवून ठेवले होते.

सकाळ झाली, अलार्म वाजला आणि वेद सगळ्यांच्या आधी तयार उठला तयार होण्यासाठी, धावत बाथरूम मध्ये गेला. घाईगडबडीत बाथरूम मध्ये शिरताना त्याचा पाय घसरला आणि जोरात खाली पडला. आई बाबा धावले वेदचा आवाज ऐकून.

वेद बाथरूम मध्ये आडवा पडला होता अन त्याच्या पायाला पण चांगलेच लागले होते. बाबांनी वेदला उचलले आणि बेडवर आणून ठेवले. पायाला काय झाले याचे वेदला भान नव्हते. आता पार्कला कसे जाणार या विचारानेच वेद रडत होता.

आई बाबा त्याची खूप समजूत घालत होते, पण वेद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला आज कसेही करून पार्क मध्ये जायचेच होते.

“अरे बाळा, आपण तुझा पाय बारा झाल्यावर जाऊ, काळजी करू नकोस, जे होते ते चांगल्यासाठीच होते”. बाबा

हे ऐकून वेदला काही दिवसापूर्वी आजी आणि त्याने वाचलेली अकबर बिरबलाची गोष्ट आठवली. त्यामध्ये अकबराने बिरबलाला छोटयाश्या गोष्टीसाठी तुरुंगात टाकले होते. तेव्हा सुद्धा बिरबल अकबराला असेच काहीसे म्हंणाला होता. “महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते!”

“मग बाबा मला असे का म्हणाले? माझा पाय मुरगळला यात काय चांगले झाले?” वेदला प्रश्न पडला. रडत रडत आणि विचार करत वेद झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी बाबा बातम्या बघत होते आणि त्यामध्ये पार्क मधल्या दुर्घटनेची बातमी आली होती. अम्युझमेंट पार्कमध्ये एक मोठी राईड कोसळली होती. सुदैवाने कोणाला जास्त दुखापत झाली नव्हती.

पण बातमी ऐकताना त्याच्या मनात विचार आला कि जर काल मी पार्क मध्ये गेलो असतो तर कदाचित मी पण अपघातात सापडलो असतो. बरेच झाले काल माझा पाय दुखावला आणि आम्ही घरी होतो.

“जे होते ते चांगल्यासाठीच होते !!!” वेदला बाबांचे कालचे शब्द आठवले

काही वेळेला काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात त्यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही तरी धीर सोडू नका. #मा_आ_वि #बिरबल #अकबर