Archive for ऑगस्ट, 2020

स एषा गणेशविद्या

देवनागरी लिपीलाच गणेशविद्या असेही म्हणतात.

गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.

यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.

या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.

५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !

भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.

गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हित रूपाला देवनागरी लिपी म्हणतात.

या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !

महर्षी व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !

गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.

त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.

श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !

गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !

कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपी यातील साम्य दाखवून दिले आहे !

ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..

सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.

कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.

शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.

रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.

डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.

सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.

देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!

ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !

देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.

कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.

ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.

दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.

झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.

घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.

मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.

मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.

वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.

कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे.

मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.

कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.

लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.

देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !

लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.

लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.

भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.

ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.

अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.

देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.

अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.

१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.

जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.

थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !

देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.

देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.

घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !

ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !

आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.

जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !

बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.

जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल. निवेदक :- प्रा. अनिल गोरे.

सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;

सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.

सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;

आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;

आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;

आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.

आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ

आजीव सदस्य : अक्षर मानव

सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.

निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!

हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती !
अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )

वी–पत्ता [email protected]

प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब | जन्म व कर्म गुणसुत्रे

प्रश्न

प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब यात काही फरक आहे का? असेल तर काय?

थोडक्यात उत्तर

प्रारब्ध आणि प्राक्तन ह्या संज्ञा आहेत ज्या कर्मफळाच्या अवस्था दर्शवतात. दैव आणि नशिब हे भावना वाचक उद्गार आहेत जे मनाच्या अवस्था दर्शवतात. #मा_आ_वि #हिंदू #गूढ_ज्ञान #ज्ञान

मोठे उत्तर

जसे मानवी गुणसुत्र हे दोन प्रथिन मालिकांच्या धाग्याप्रमाणे एकमेकांत गुंतले आहे, तसे कर्म व जन्म हे एकमेकांसोबत अतिशय शास्त्रीय सफाईने गुंतले आहे.

त्यात दोन मुख्य संज्ञा लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • निरुपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ लगेच परिणाम दाखवत नाही व ते विलम्बाने भविष्यात येतात.
  • सोपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ अवतीर्ण होऊ लागले आहे किंवा वर्तमान कालात घडत आहे.

आता याच्या जोडीला चार उपसंज्ञा लक्षात घेऊ या.

  1. संचित कर्मफळ: एका आत्मन च्या ब्रह्मापासुन वेगळे झाल्यानंतर सर्व कर्मफलांचा एकुण आशय किंवा साठा.
  2. क्रियमाण कर्मफळ: जे आत्म्याने प्रकृती सोबत केलेल्या दररोजच्या कर्मातुन जन्म घेते. यातील काही कर्म ताबडतोब फळ देऊन संपते. उरलेले कर्मफळ संचितात जमा होते.
  3. प्रारब्ध कर्मफळ: हे त्या संचितापैकीत असे कर्मफळ आहे, जे त्या आत्म्याच्या वर्तमान शरीरावर परिणाम करते किंवा करणार असते, जवळच्या भविष्यात, म्हणजेच वर्तमान देहाचा लय किंवा मृत्यु होण्या आधी.
  4. प्राक्तन कर्मफळ: हे त्या संचितापैकी असे कर्म आहे जे त्या आत्म्याच्या पुढल्या म्हणजेच भविष्यातील शरीरावर परिणाम करणार आहे. म्हणजेच त्याआत्म्याला पुन्हा शरीर धारण करायला हे कर्म कारणीभुत आहे.

आता या संज्ञा कशा चालतात ते बघू

एक आत्मन पहिले नवे शरीर घेतो तेव्हा संचित (प्राक्तन + प्रारब्ध) कर्मफ्ळ “शुन्य” घेऊन जन्मतो.

त्या शरीराने प्रकृती सोबतच्या केलेल्या कर्मापोटी क्रियमाण कर्म (लगेच फळ देणारी) भोगतो तसेच संचित कर्मफळे म्हणजेच “निरुपक्रम” कर्मफळे स्वतःवर जोडुन घेतो. त्याच्या नुसार दुसरे नवे शरीर धारण करतो.

आता हे दुसरे नवे शरीर ही संचितापैकी काही प्राक्तन कर्मफळे घेउन जन्म घेते झाले आहे.

या दुसऱ्या नव्या शरीरात आत्मन क्रियमाण कर्म करुन व त्याचे फळ लगेच भोगुन राहतो. त्यावेळेस प्राक्तनातील काही कर्म “सोपक्रम” अवस्थेस पोहोचतात व प्रारब्ध म्हणुन समोर येतात. तो आत्मा ती भोगुन संपवतो, तसेच क्रियमाण कर्म भोगतो. न भोगलेली नविन कर्मफळे संचितात जोडली जातात.

त्यातील काही प्राक्तन म्हणुन पुन्हा सोबत घेऊन तोआत्मान पुढला जन्म व तिसरे नवीन शरीर धारण करतो आणि हे जन्म कर्म चक्र चालु राहते.

आता पुढल्या दोन शब्दांकडे वळु

या सर्व चक्रा मध्ये आत्म्याला शरीर धारण केल्याच्या आनंदात मी पणा येतो व त्यामुळे त्याचे पुर्व जन्म स्मृतीत राहात नाही. त्यामुळे संचित (प्रारब्ध व प्राक्तन) कर्मफळे याची जाण नसते.

त्यामुळे अपेक्षा असताना (जी करणे हेच दुःखाचे कारण सांगितले आहे) फळ मिळाले नाही तर ती अपेक्षा भंगाची भावना “दैव” (समोर असलेले पण भोगता नाही आले असे फळ) म्हणतो.

त्याच प्रमाणे प्रारब्धाच्या परिणामामुळे अपेक्षा नसताना (जे पुर्वीच्या कर्माचे फळ आहे) ते फळ (भोग) वाट्यास आले तर त्याला “नशिब” म्हणतो.

दैव आणि नशिब हे बोली भाषेच्या बदलामुळे आलटुन पालटुन ही वापरले जातात.

मला वेगवेगळ्या पुस्तकातुन वाचुन समजलेला हा सारांश आहे. शास्त्रीय की अजुन काही आहे यावर मला वाद करणे अपेक्षित नाही.

@विभासा

फुलपाखरू

अशीच एक मस्त हवेशीर दुपार
पांढरे ढग अन् निळे आकाश समोर
येईल मग हळुच एक फुलपाखरू
पंखांची नाजूक हालचाल करत

इवलेसे हे पंख नितळ काळे
वर हलकेच शिंपडले ठिपके पिवळे
वाऱ्यावर तरंगत सुप्त दडली ओढ जोपासते
पाना पानावर कळी कळीवर टिपून बघते

कसं कळतं त्या चिमुकल्या जीवा
कुठे आहे मधाचा मेवा
कसा राहतो लक्षात त्याच्या
या इमारतीचा तोच मजला बारा

पाऊस पडतो कडक उन पडते
कामाचे फोन चालतात तास तास
पण तो एक क्षण मात्र येतो
मुक्या जीवाची जीवनाची क्षणभंगुरता

हलकेच मनः पटलावर रेखाटून जातो
नसेन उद्या मी जरी
तरी ही संपणार नाही
आहे आनंद एवढा त्या क्षणात

@विभासा

निर्गुण सगुण

निर्गुण सगुण प्रणवाकृती | एक असे हा गणपती |
रक्षावया भक्तांप्रती | अष्टस्थानी प्रगटला || १ ||

मयूर क्षेत्री उद्धरिला कमलासुर | सिद्ध टेकी हरिने तप केले घोर |
बल्लाळाचा केला उद्धार | पालीक्षेत्री प्रगटोनी || २ ||

महड क्षेत्री विनायक | प्रगटोनिया भक्त पालक |
दुष्ट दानव वधोनी सकळीक | मुनि द्विजासी रक्षीले || ३ ||

विधीने तप करिता स्थाव-भुवनी | तेथे प्रगटला चिंतामणी |
भ्रांती गेली निरसोनी | स्वसामर्थ्यासी लाधला || ४ ||

लेण्याद्री दिव्य पर्वती | पार्वत्यात्मज झाला श्री गणपती |
दानव मर्दोनि पापमति | रक्षण केले नगजेचे || ५ ||

ओझर क्षेत्री विघ्नहर | प्रगट झाला सर्वेश्वर |
भक्तांची संकटे केली दूर | समुळ विघ्ने वारोंनी || ६ ||

रांजणगावी श्री गणपती | प्रगट झाली श्री ब्रह्ममूर्ती |
आश्वासुनी सुरांप्रति | स्थापिले स्वपदी सर्वाते || ७ ||

शब्द रचना श्री गणेशोत्सव लोकमान्य आळी ठाणे येथून घेतली आहे

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने

श्री गणेशोत्सव, लोकमान्य आळी, ठाणे येथे गेली १०१ वर्षे हा १० दिवसांचा आरत्यांचा सोहळा चालू आहे.

यावर्षी कोविद-१९ विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष तेथे जाऊन आरती करणे हे मला शक्य नाही तरी त्या आरत्या खाली मांडून ठेवत आहे.

गणपती बाप्पा मोरया !!

लोकमान्य टिळकांची आरती

भारत भूमी मध्ये प्रसिद्ध महाराष्ट्र
स्वराज्य साम्राज्याचे गतआदिक्षेत्र ।
नवरत्नांचा सागर प्रसिद्ध सर्वत्र
तेथे अवतरले श्री गंगाधर पुत्र।। १ ।।

जयदेव जयदेव जय जय बलवंता
कृपा कराया दीनांवरी केव्हा येता ।। ध्रु ।।
जय देव जय देव

हिंदभूमीचा हा सौभाग्य तिलक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ।
राष्ट्र सुत्रधारी लोकनायक
भारतमातेचा हा अनंत सेवक ।। २ ।।

उठा बंधुनो सोडाआळस कर्मकरा
स्वदेशभक्ती मार्गे त्यांची कास धरा ।
बाळदास होऊनी त्यांचा मार्ग धरा
सुराज्य प्राप्ती करून त्यांना शांत करा ।। ३ ।।

आरती शब्द श्री गणेशोत्सव लोकमान्य आळी, ठाणे येथून घेतले आहेत
गणपती समोर दर वर्षी १० दिवस ही टिळकांची आरती गेली असंख्य वर्षे गायली जाते. हा सार्वजनिक गणोशोत्सव १०१ वर्षे अविरत चालू आहे

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|

ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे

स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|

कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति

साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी

स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

एकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहि

शब्द माझी मराठी येथून घेतले आहेत

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

आरती शब्द भक्ति गाणे येथून घेतले आहेत

सत्राणे उड्डाणे

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ ध्रु० ॥

दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

उत्कट साधुनि शिळा

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय एव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ ध्रु० ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनिया अला ॥ जय० ॥ २ ॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले आयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥

अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥

सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत