Archive for ऑक्टोबर, 2020

महर्षी व्यास आणि ब्रह्मवाक्ये

ऋग्वेदात गायत्री मंत्र सुंस्कृत भाषेत लिहिला आहे.

महावाक्यांचे  मूळ हे वेद आणि उपनिषेदत आहे. त्याबद्दल संक्षिप्त स्वरूपात  माहिती देत आहे.

वेद विश्वाच्या उत्पतीचा आधीपासून ध्वनिलहरींच्या स्वरूपात  अस्थित्वात आहेत. पूर्वकालीन महान ऋषींनी सुमारे ३५०० वर्षांपूर्वी, तपश्चर्येने वेदांच्या विशिष्ट्य ध्वनिलहरीचें शब्दब्रह्मन केले.  त्याला ‘अनंता  वै वेदा’ असे म्हंटले गेले. ‘विद’ पासून वेद हा शब्द प्रचलित झाला , त्याचा अर्थ, विश्वाचे ज्ञान प्राप्त करणे. विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राचे  शब्दब्रह्मन केले, राजा अघोराने रुद्राचे शब्दब्रह्मन केले. पुढे काही शतके ज्ञानी ऋषीनी त्यांच्या शिष्याना वेदांचे पाठांतरातुन ज्ञान दिले.वेदांचे प्रस्तुतीकरण भजने,पठण व लिखाणात होते.शेकडो वर्षे हि परंपरा चालत होती .

 संस्कृत भाषा ही वेदांची निर्मिती आहे.

महर्षी व्यासांबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे.

हिंदुधर्मशाश्त्रानुसार, महर्षी व्यासच्या आधी २८ व्यास होते . महर्षी व्यासाचा जन्म त्रेता युगात [साधारण २३००-२५०० वर्षांपूर्वी ] झाला असे मानले जाते. व्यास चिरंजीवी होते कारण ते त्रेता युगात जन्मले,संपूर्ण  द्वापारयुग अनुभवले व काली युगाच्या सुरवातीच्या काळापर्यंत जीवित  होते. त्यांचे वडीलांचे नाव पराशर ऋषी व आईचे नाव सत्यवतीदेवी होते.

 महर्षी व्यासांचा जन्म उत्तर प्रदेशातील कालपी  येथे झाला.तेथे त्याच्या नावे कालपी मंदिर आहे. पराशरऋषी हे  उत्तम जोशिष्यशास्त्र जाणत. पराशरस्मृती नावाचे वैदिक संग्रहाचा ग्रंथ आहेत. ते ग्रंथआजचे समाज व्यवस्थेवर अभ्यास करणारे सवशोधक  नेहमीच वापरतात .  

महर्षी व्यासांनी  लहानपणी आई वडीलां समोर जंगलात अखंड तपश्चर्या करण्याची इच्छा व्यक्त केली. पुराणातील कथेनुसार महर्षी व्यासांचे गुरु वासुदेव,तसेच धर्मशाश्त्राचे  शिक्षण त्यांनी गुरु सनाका व गुरु सदानंद यांचे कडून घेतले.

निरनिराळ्या शाश्त्रांत पारंगत होऊन पुढे महर्षी व्यासांनी  हिंदू धर्म दिशा देणारेअसे  लिखाण केले. वेदांचे सविस्तर व  बांधेसुद विवेचन केले. श्रुतींचा अर्थ सर्वसामान्यांना कळेल असे ५५५ ब्रह्मसूत्रे , १८ पुराणे व महाभारतासारखे [५वा वेद ] ग्रंथ  विवेचन केले. महर्षी व्यास हे स्वतः महाभारतांतील एक महत्वाचे पात्र आहेत.  विदुर, पांडू आणि धृतराष्ट्र ह्याचे पितामहा महर्षी व्यास होते.

 सगळे ग्रंथ श्री. गणेशाला  विनंती करून त्याच्या कडून लिहून घेतले.

अंकोर वाट, कंबोडिया येथील १००० वर्षपूर्वीच्या भव्य मंदिरातील कोरीवकाम. महर्षी व्यास आणि गणेशा कडून लिखाण करून घेताना.

महर्षी व्यास आणि आदी शंकराचार्यांची भेटअचानक गंगेकिनारी झाली. त्या दोघांत  ब्रह्मसूत्रे व अद्वैत वेदांत विषयावर चर्चा झाली. महर्षी व्यास आदी शंकराचार्याच्या ब्रह्मसूत्रांच्या आकलनावर बेहद खुश झाले व त्यांनी  हे ज्ञान सर्व  भारतात पसरविण्यास शंकराचार्यांना विनंती  केली. अश्या रीतीने आदी शंकराचार्यांना स्पुर्ती मिळाली व त्या उद्देशाने त्यांनी भारतात प्रवास केला.धर्मशाश्त्रानुसार महर्षी व्यास हे विष्णूचा अवतार आहेत. .

महर्षी व्यासांची  प्रखर तपश्चर्या, तेजस्वी बुद्धिमत्ता व हिंदू धर्माला दिशा दाखविणाचे महान कार्य , या कारणास्तव ते गुरूंचे  गुरु ठरले आहेत.  हिंदू कॅलेंडर प्रमाणे, आषाढ महिन्यातील पूर्णिमा  व्यासपूर्णिमा तसेच गुरुपूर्णिमा साजरी केली जाते. धर्मशाश्त्र असे सांगते कि त्या दिवशी महर्षी व्यासाचा जन्म झाला व त्यांनी वेद लिखाण पूर्ण करून घेतले.

हिंदू धर्माचा ग्रंथ भागवत गीता नसून वेदआहेत.

महर्षी  व्यासांचे अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व बद्दल माहिती , वेद आणि  उपनिषद ह्यांचा उगम कोठून व कसा झाला ह्याची थोडक्यात माहिती पाहिली.

त्यानंतर ४ ब्रम्ह्यवाक्यांची माहिती घेऊ. 

वेदांत ह्या शब्दांत वेद+अंत असे २ शब्द सामावलेले आहेत.

म्हणजेच वेदांचे सार आणि तात्पर्य तीच उपनिषेद होत. साधारण २००-३०० उपनिषेद ,असून त्यातील १० महत्वाची म्हणून  मानली जातात.

ती अशी.

[१] ऐतरेय [२] ईशावास [३] तैतरीय [४] मैत्रायणी [५] कठो [६] किनो [७] चांडोग्य [८] मुण्डक [९] मंडोक्य [१०] बृहधारण्या

उपनिषेदाने भारतीय हिंदू संस्कृतीच्या विकासाचा मजबूत पाया उभारला.

अद्वैतउपनिषदात ४ महावाक्याचे विवेचन केले आहे.  ती वाक्ये व त्यांचे थोडक्यात विवेचन खालीलप्रमाणे आहे.

 [१] प्रज्ञानम् ब्रह्म |  [ ऐतरेय उपनिषेद,३.३ ऋगवेद ] 

ब्रह्म हे परिपूर्ण असून विश्वात सर्व ठिकाणी वास्तव करत आहे. त्याचे अस्थित्व सदाच  ते ब्रह्माण्डापासुन  ते लहानात लहान जिवाणूत वास्तव करते,ते सर्व ठिकाणी असल्याने साहजिकच प्रत्येक मानवात वास करते.

रामकृष्ण परमहंस यांचा गुरुमंत्र ” जीव तेथे शिव”.

[२]अयम् आत्मा ब्रह्म | [मांडूक्य उपनिषद, १.२ अथर्ववेद ]

आत्मा हा परमात्माचा अंश आहे कि ज्याचे अस्थित्व मानवाच्या  ज्ञानाच्या व विचारांच्या पलीकडे , विश्वातील अथांग आकाशात  तो  पसरलेला  आहे. परमात्मा हा चेतना शक्तीचे उगमस्थान असून त्याला काळ-वेळाचे,बाह्य विषयांचे कोठलेही बंधन नाही. आत्मा आणि परमात्मा जोडण्याची कोठलीही क्रिया नसून सर्वाथाने दोघेही एकाच आहेत. परमात्मा उच्चत्तम ज्ञानाने पूर्वत्व असून,आत्मा त्याचा अविभाज्य अंग आहे.

 [3] तत् त्वम् असि | [चांडोग्य उपनिषद,६.८. ७ सामवेद ]

उड्डालाक [पिता व गुरु] आणि श्वेतकेतु [पुत्र व शिष्य] यांच्यामध्ये झालेल्या  संवादाचे वर्णन आहे. श्वेतकेतु १२ वर्षे आध्यत्मिक शिक्षण घेऊन घरी परततो. त्याचे पिता त्याला विचारतात ” पुत्र तुला एवढा गर्व का? तो हे शिकलास का?शिक्षण म्हणजे जे न ऐकलेले ऐकणे,माहित नसल्याचे ज्ञान होणे ,तसेच विवेकी ज्ञान सतत वाढविणे.” ” ते कसे?”श्वेतकेतु प्रश्न विचारतो. “जसा प्राण्याचा हंडा हा मातीपासून बनविला जातो,माती ही मूळ आहे.त्याचे वेगळे प्रकार व नवे असतील पण शेवटी ती माती आहे. सोन्याचे विविध अलंकार बनतात व त्याला विविध नावे असतात, पण मूळ सोनेच आहे. ज्याला मूळ विषयाचे ज्ञान आहे, त्याला त्याचा विविध परिणामांचे ज्ञान प्राप्त होते, कारण मूळ स्वरूप आणि परिणाम ह्या विविध नसून एकच आहेत ” उड्डालाक पुढे सांगतात ” तुला जर परमात्म्याचे ज्ञान प्राप्त झाले तर सर्वे विश्वाचे ज्ञान प्रताप होईल”. त्यापुढे उड्डालाक अतिशय सोप्या भाषेत शब्दांची फोड करतात ” तत् म्हणजे परमात्मा त्वम म्हणजे आत्मा जो जीवात स्थानापन्न आहे तो, असी म्हणजे दोघांतली समानता होय. तात्पर्य आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे.”

[४]अहम् ब्रह्म अस्मि | [ब्रहदारण्यक  उपनिषद ,१. ४. १० यजुर्वेद ]

अहम् = मी, स्वतःबद्दल असलेला अभिमान किंवा अहंकार.

           मी कोणीच नाही हे  स्वतःला पटवून द्यायलाही अभिमानाची गरज असतेच.

ब्रह्म= सर्वशक्तिमान,सर्वज्ञानी ,सर्वव्याप्ती , शक्ती की जी सर्व ब्रह्मांडच असते इतकेच नव्हे तर ईश्वर सुद्धा निर्मिती करते.

अस्मि= मीपणाचा भाव, अस्तित्वाची जाणीव व ती टिकवणाचा संकल्प. सर्वप्रथम प्रत्येकाला स्वतःच्या अस्थिवताची जाणीव

          दृढतेने  असणे आवश्यक आहे. स्वतःला कोठल्याही दृष्टीने,कारणाने ,इतरांच्या मतानुसार, तुच्छ ,हीन व कमी लेखता 

          काम नये. हि एक आत्मघातकी वृत्ती आहे व आपल्या अस्थित्वाविषयी द्वेष निर्माण करते.

          प्रत्येक व्यक्तित सर्व काही करण्याची दैवी शक्ति विद्यमान असते. सर्वजण शक्तिमान ब्रह्माचे अंश आहोत.

          महर्षी व्यास, महर्षी आदिशंकराचार्य यांनी महावाक्यांची सुरेख फोड करून ती कथन  केली आहे.

तात्पर्य : मानव हा स्वयं प्रभूं आहे. मानवाने आपल्या व्यक्तित्वाला महत्व दिले पाहिजे, आत्मनिर्भरतेवर विश्वास ठेवला पाहिजे.

“जुना धर्म म्हणत असे की ज्याचा धर्मावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो कि ज्याचा स्वःतावर विश्वास नाही तो नास्तिक.” स्वामी विवेकानंद

लेखन: राजेंद्र धर्माधिकारी , २३ ऑक्टोबर २०२०

मन संवाद | ३, ४ श्लोक

मनाचे श्लोक ३

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

जगात जे जे चांगलं आहे ते राम तत्त्व आहे
संकल्प चांगला विचार चांगला तर आयुष्य चांगलं

आपण रात्री झोपतो तेव्हा ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी carry केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विचारापासून नवीन दिवसाला सुरुवात होते असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा कुठच्याही प्रहरी वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
रात्री झोपताना राम नाम घेतले तर दिवसा आपसूकच रामनामाने सुरुवात होईल.

‘पुढे वैखरी राम आधी वदावा’
म्हणजे काय?
तर वैखरी म्हणजे जिभेचे टोक,
ह्या जिभेच्या टोकावर सतत जर राम नाम म्हणजेच राम तत्त्व म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगले विचार, चांगली भाषा असेल तर प्रत्येक आचरण हे कायम सदाचरणच होईल.

मनाचे श्लोक ४

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे |
मना धर्मता नीति सोडू नको हो |
मना अंतरी सार विचार राहो || ४ ||

आता याचा अर्थ बघताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
एक बाजू राम आहे
तर दुसरी बाजू रावण,
संकल्प म्हणजे राम
विकल्प म्हणजे रावण,
सद्बुद्धी म्हणजे राम
कुबुद्धी म्हणजे रावण.

आजूबाजूला जेव्हा कोणतीही घटना घडते, चांगली अथवा वाईट
त्याचा पहिला आघात हा मनावर होतो. त्यामुळे त्या मनाला स्थिर करा.

अशांत मन काय करते,
वाईट विचार करते, त्यामुळे कर्म देखील वाईट होते.
परंतू मन शांत असेल तर चांगला विचार करेल आणि कृतीदेखील योग्य म्हणजे चांगलीच होईल.

मनामध्ये पापबुद्धी जागृत होऊ नये, त्याने ethics सोडून म्हणजे नीतिमत्ता सोडून वागू नये आणि सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावा हे मनाला सतत सांगावे.
आणि आपल्या अंतरात राम-तत्त्वानेसारासार विचार करावा.

बिरबल कथा | कंजूष माणूस

बिरबल कथा | कंजूष माणूस
कंजूस माणूस

चित्र संदर्भ: कंजूस माणूस
चित्र संदर्भ: टेलिंग लाईज्

वेदला कविता, गाणी, श्लोक अगदी पटापट पाठ होत. आजी आजोबा त्याला रोज नवीन नवीन गाणी, श्लोक शिकवीत आणि वेद ती पटकन पाठ करून म्हणून दाखवत असे. आजूबाजूला रहाणारे शेजारी, नातेवाईक सगळे वेदचे कौतुक करत असत.

वेदच्या इमारतीत एक आजोबांचे मित्र रहात होते. त्यांना सर्वजण तात्या म्हणत असत. अतिशय कंजूष अशी तात्यांची ख्याती होती सोसायटी मध्ये. त्यांचा नातू अंबर, वेदचा चांगला मित्र होता. वेद त्यांच्याकडे नेहमी खेळायला जात असे. अंबरच्या घरी गेला की तात्या वेदला नेहमी कविता, गाणी म्हणायला लावत आणि चॉकलेट किंवा बक्षीस कबूल करत. पण गाणं म्हणून झालं की नुसती शाबासकी देऊन बोळवण करत. वेदला या गोष्टीचा खूप राग येत असे.

त्या दिवशी पुन्हा असेच घडले. आता मात्र वेद फार चिडला. पण तात्यांना कसे काय बोलणार? वेद विचार करत घरी आला.

नेहमी प्रमाणे रात्री आजोबांजवळ झोपायला गेला. आजोबांनी त्याला त्या रात्री अकबर बिरबलाची नवीन गोष्ट सांगितली. त्यामध्ये बिरबलाने कंजूष माणसाची कशी जिरवली हे सांगितले होते. वेदच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मनातल्या मनात विचार करत हसत वेद झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी अंबर कडे खेळायला गेला असताना तात्या आजोबांनी त्याला हाक मारली

“वेद, एक कविता म्हणून दाखव तुला बक्षिस देतो”

वेदने एक छानशी कविता त्यांना ऐकवली. वेदने बक्षीस मागितले.

“अरे वेद, मी तुला फक्त खूष करण्यासाठी म्हटले होते बक्षीस देतो म्हणून. छान म्हटलीस कविता”, तात्या म्हणाले.

“आजोबा आज संध्याकाळी आमच्या घरी या. आमच्या आज घरी वडापावचा बेतआहे. तुम्हाला खूष करतो”, जाता जाता वेद तात्या आजोबांना म्हटला.

“नक्की येतो बाळा”, तात्या म्हणाले.

संध्याकाळी तात्या वेदच्या घरी पोहचले. मस्त खमंग वास येत होता स्वयंपाक घरातून. खरेतर वेदच्या घरात कोणीच नव्हते आणि आईने वेदसाठी तळून ठेवले होते. म्हणून वेदने अंबर आणि तात्यांना घरी बोलावले होते. तात्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. वडापाव कधी येतो याची वाट बघत होते.

“अरे बाळा घरी कोणीच नाही का? ते वडापावचे काय झाले?”, तात्या वेदला म्हणाले

“अहो, आजोबा आज घरी कोणीच नाही, मी तुम्हाला असेच खूष करण्यासाठी बोलावले होते”, वेद हसत म्हणाला #मा_आ_वि #बिरबल #अकबर

तात्यांना जे समजायचे समजले आणि त्यांनी पुन्हा कधी वेदला खोटे वचन दिले नाही.

तात्पर्य: कधीही खोटे बोलू नये आणि कुणाला दुखवू नये!

पालकत्व

पालकत्व

आई-बाबा होणे हे एक वेळ सोपे आहे मुलांचे पालक होणे हे तितकेच कठीण आणि आव्हानात्मक आहे. #मा_आ_वि #पालकत्व #नाते #मैत्री

चांगले पालक होण्यासाठी कोणतीही शाळा नाही, नियमावली नाही, कोणीही आदर्श नाही, कारण प्रत्येक पालक आणि त्यांचे मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. बाळाच्या जन्मापासूनच आई-वडील उत्तम पालक होण्याचा प्रयत्न सुरू करतात. घरातल्या वडीलधाऱ्यांचा अनुभव, आपल्या वयाच्या मित्र-मैत्रिणींचे अनुभव, इंटरनेटवर उपलब्ध माहिती यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. एवढी सगळी तयारी करून प्रत्यक्ष मुलाचा स्वभाव, विचार करणे, त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत याचा अंदाज घेत घेत तेही मुलांकडून शिकत शिकत त्यांना चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी झटत असतात आणि आपली भूमिका निभावत असतात.

आई-वडील किंवा पालक म्हणून काय करणे अपेक्षित आहे हो?

तर मुलांचे शारीरिक, मानसिक भावनिक संरक्षण संवर्धन आणि वाढ यावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अचानक येणाऱ्या संकटांसाठी आणि समृद्ध भविष्यासाठी तरतूद हे सर्वच ह्यात येते. पण तेवढेच पुरेसे नसतं. त्या त्या वयात किंवा वाढीच्या टप्प्यावर म्हणजे अर्भक शिशु बाल्य बालक विद्यार्थी पौगंडावस्थेतून मग तारुण्य या सगळ्या वाळणांवर पालकांची भूमिका ही बदलती असली पाहिजे. त्या त्या अवस्थेच्या गरजा ओळखून त्यांनी वागले पाहिजे.

अगदी सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये मुलांचं मन इंद्रिय मेंदू हे प्रचंड संस्कारक्षम असतात. आजूबाजूला घडणाऱ्या लहानसहान गोष्टी ते अचूक टिपत असतात, त्यातूनच ते खूप काही नकळत शिकत असतात. घरच्या मोठ्या माणसांचे एकमेकांशी वागणे बोलणे ते पाहतात तेव्हा घरात जे वातावरण त्यांना मिळते त्यावर त्यांच्या जडणघडणीचा पाया रचला जातो. एकाच घरात मुलगा-मुलगी यात भेद न करणे, लाडका-दोडका ही वागणूक न देणे, मुलगा आहे म्हणून विशेष वागणूक न देणे, मुलगा असला तरी घर कामात प्रवृत्त करणे, घरातील महिलांना मग ती घरीच असो किंवा कमावणारी, तिला आदराने, सारखे पणाने, सन्मानाने वागवणे या सर्व गोष्टी घरातल्या इतर मंडळींनी पाळल्या तर ते मूलही आपोआपच शिकेल तसं वागायला. कारण ते वयच आहे तसं, मुलं प्रचंड निरीक्षण करून आणि बारकाईने आपल्या गोष्टी न्याहाळत असतात. तेव्हा पर्यायाने आपली जबाबदारी वाढते. आपली प्रत्येक कृती त्यांच्या मनावर संस्कार घडवत असते. चांगलं वागणं, नीट बोलणं, पावित्र्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, स्नेह, बुद्धीचा योग्य वापर असे एक ना अनेक सद्गुण वाढीस लागण्यासाठी आधी पालकांनी तसे वर्तन केले पाहिजे. या सगळ्यातून एक चांगली व्यक्ती तर घडेलच पण त्याच बरोबर समाजाच्या प्रति जागरूकता, पर्यावरणाविषयी प्रेम आणि देशासाठी प्रचंड अभिमान हेदेखील त्यांच्या मनात रूजले पाहिजे.

पैशांची, वस्तूंची आणि मुख्य म्हणजे माणसांची किंमत कळली पाहिजे. कधी मुलांच्या हातून एखादी चूक घडली तरी प्रेमापोटी विसरून जावं, पण कटाक्षाने ती चूक परत होणार नाही यावर लक्ष द्यावं आणि तशी समज देखील द्यावी. एका टप्प्यावर आई-वडील हे मुलांचे जणू मित्र होतात, त्यांच्यात वेगळेच नाते निर्माण होते. ह्या आदरयुक्त मैत्रीत थोडा धाक आणि काही लिमिट मात्र हवेत. या काळात नातं मैत्रीचं असावं, पण पालकांचे वागणे पारदर्शी असावं. त्यामुळे मुलं आपोआप शहाणी होतात. मुलांच्या चुकीची जाणीव करून द्यायचा आणि त्यांच्या चांगल्या कामाबद्दल शाबासकी द्यायचा हा काळ. मुलांना आई-वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे असा हा काळ आणि मग ह्या आदरयुक्त प्रेमातून मुलं आपल्या पालकांना आदर्श मानून लागतात.

हळूहळू उच्च शिक्षणाचे महत्त्व, योग्य करिअरची निवड, त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी, धडपड करण्याची तयारी, अपयश पचवण्याचे धैर्य आणि फायनल गोल साध्य करण्याचे बळ यातूनच नवी पिढी घडते. सुजाण पालक नक्कीच सुजाण नागरिक घडवतात.

तेव्हा नव-पालकांनो – सजग राहा, सतर्क राहा.
नवीन पिढीसमोर सोशल मीडिया, इंटरनेट ऍक्सॅसिबिलिटी, फ्रीडम, following, followers अशी खूप प्रलोभनं आहेत. खूप लहान वयात गरजेपेक्षा जास्त पुढे जाऊन वागणारी ही पिढी आहे. शारीरिक आकर्षण, व्यसनांची चटक, चुकीची संगत, करियर इंसेक्युरिटी, अपयश पचवण्याची क्षमता कदाचित नसणे असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आहेत. या सगळ्यातून सावरण्यासाठी भावनिक मैत्रीपूर्ण नाते संबंध असावेत. फॅमिली लाईफ, फ्रेंड सर्कल असावे, नात्यांचे मोल जाणलेच पाहिजे, प्रत्येकातलं चांगलं घेता आलं पाहिजे, आनंदी-सुखी जीवन जगता आलं पाहिजे, चारित्र्य जपून नीतिमत्तांचं काटेकोर पालन करून समृद्ध होता पाहिजे.

यासाठी पालक निर्व्यसनी, निर्लोभी, निष्कलंक असावेत. तरच निकोप संतती निपजली जाईल. #मा_आ_वि #पालकत्व #नाते

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ॥

सुभाषित

वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलाचे लाड करावे. पुढची दहा वर्षे तिला/त्याला (शिस्त लागावी म्हणून) मारावे (शाब्दिक चालेल, चाबकाने फोडायची गरज नाही). मुल सोळा वर्षांचे झाल्यावर (म्हणजे वयात आल्यावर, कर्तासवरता झाल्यावर, बापाचं पायताण मुलाला यायला लागल्यावर व. व.) त्यांच्याशी मैत्री करावी (त्याला बरोबरीने वागवावे)

बिरबल कथा | जे होते ते चांगल्या साठी

मुलांनो तुम्ही आपल्या आईबाबा,आजीआजोबांकडून अकबर बिरबलाच्या गोष्टी नेहमीच ऐकल्या असतील किंवा टीव्हीवर, युट्युब सुद्धा खूप वेळा पाहिल्या असतील. अश्याच काही अकबर बिरबलाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत, पण नव्या स्वरुपात!!

आपल्या गोष्टींमध्ये आहे वेद आणि त्याचे आईबाबा, आजीआजोबा, त्याचे मित्र, शाळा आणि अनेक गमतीजमती.

चला तर मग तयार आहात ना वेदला भेटायला??

@amolpandav

बिरबल कथा | जे होते ते चांगल्यासाठी

वेद आजच्या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता.

बाबांनी त्याला मागच्या महिन्यात वचन दिले होते अम्युझमेंट पार्क मध्ये जाण्याचे परीक्षा संपल्यावर. वेदची परीक्षा कालच संपली होती, शेवटचा पेपर पण सुद्धा चांगला गेला होता. त्यामुळे वेदची स्वारी फार खुशीत होती. सगळे ठरल्याप्रमाणे आज बाबांना सुट्टी घेतली होती आणि पार्कसाठी ऑनलाईन तिकिटे पण काढून झाली होती. वेदने तर आधीच पार्कची वेबसाइट बघून तिकडे काय काय करायचे ते ठरवून ठेवले होते.

सकाळ झाली, अलार्म वाजला आणि वेद सगळ्यांच्या आधी तयार उठला तयार होण्यासाठी, धावत बाथरूम मध्ये गेला. घाईगडबडीत बाथरूम मध्ये शिरताना त्याचा पाय घसरला आणि जोरात खाली पडला. आई बाबा धावले वेदचा आवाज ऐकून.

वेद बाथरूम मध्ये आडवा पडला होता अन त्याच्या पायाला पण चांगलेच लागले होते. बाबांनी वेदला उचलले आणि बेडवर आणून ठेवले. पायाला काय झाले याचे वेदला भान नव्हते. आता पार्कला कसे जाणार या विचारानेच वेद रडत होता.

आई बाबा त्याची खूप समजूत घालत होते, पण वेद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला आज कसेही करून पार्क मध्ये जायचेच होते.

“अरे बाळा, आपण तुझा पाय बारा झाल्यावर जाऊ, काळजी करू नकोस, जे होते ते चांगल्यासाठीच होते”. बाबा

हे ऐकून वेदला काही दिवसापूर्वी आजी आणि त्याने वाचलेली अकबर बिरबलाची गोष्ट आठवली. त्यामध्ये अकबराने बिरबलाला छोटयाश्या गोष्टीसाठी तुरुंगात टाकले होते. तेव्हा सुद्धा बिरबल अकबराला असेच काहीसे म्हंणाला होता. “महाराज जे होते ते चांगल्यासाठीच होते!”

“मग बाबा मला असे का म्हणाले? माझा पाय मुरगळला यात काय चांगले झाले?” वेदला प्रश्न पडला. रडत रडत आणि विचार करत वेद झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी बाबा बातम्या बघत होते आणि त्यामध्ये पार्क मधल्या दुर्घटनेची बातमी आली होती. अम्युझमेंट पार्कमध्ये एक मोठी राईड कोसळली होती. सुदैवाने कोणाला जास्त दुखापत झाली नव्हती.

पण बातमी ऐकताना त्याच्या मनात विचार आला कि जर काल मी पार्क मध्ये गेलो असतो तर कदाचित मी पण अपघातात सापडलो असतो. बरेच झाले काल माझा पाय दुखावला आणि आम्ही घरी होतो.

“जे होते ते चांगल्यासाठीच होते !!!” वेदला बाबांचे कालचे शब्द आठवले

काही वेळेला काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात त्यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही तरी धीर सोडू नका. #मा_आ_वि #बिरबल #अकबर

मनसंवाद | १, २ श्लोक

मनाचे श्लोक हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी स्पर्धेसाठी पाठांतर म्हणून शिकलेच आहेत. आता शिकूया जगण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी,नव्या पिढीला मनाने खंबीर बनवण्यासाठी.

तुमच्यापैकी अनेक जणांनी कदाचित श्री.समीर लिमये हे नाव ऐकले असेल. त्यांचा “कॉर्पोरेट कीर्तन” हा कार्यक्रम फारच सुंदर आहे. नवीन पिढीच्या भाषेत ते खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्री समर्थ रामदासांचे विचार – कार्य आणि दासबोध आणि मनाचे श्लोक ह्याचे माहात्म्य खुलवून सांगतात. त्यातून त्यांनी मनाच्या श्लोकांचा अर्थ फारच सुंदर आणि सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यांचा YouTube चॅनल आहे.

मी त्यांच्याच ‘ मनकीर्तन ‘ ह्या युट्यूब सिरीजचा लॉक डाउनच्या काळात अनुभव घेतला. त्यानंतर त्यावर थोडासा वाचन, मनन, चिंतन करून मला उमगलेला अर्थ मी इकडे मांडणार आहे.

श्लोक १ ला

गणाधीश जो ईश सर्व गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ अनंत या राघवाचा ।। १ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक १
मनाचे श्लोक १

गणपती म्हणजे बुद्धीची देवता आणि शारदा म्हणजे वाचा. सर्व गुणांचा अधिष्ठाता गणपती आणि आपली वाणी म्हणजे शारदा देवी ह्या दोघांमुळे आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट जेव्हा समोरच्याला सांगतो तेव्हा त्याला ती grasp होते म्हणजेच समजते ती बुद्धीची देवता गणपतीमुळे आणि आपण बोलू शकतो म्हणजे आपली वाचा ती आहे शारदा देवीमुळे.

अश्या ह्या गणेशाला आणि शारदेला श्री समर्थांनी पहिल्या श्लोकातून वंदन केले आहे. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #१

श्लोक २ रा

मना सज्जना भक्ती पंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।। २ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक २
मनाचे श्लोक २

ह्या श्लोकात समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की ” हे मना, तू सज्जन हो.” म्हणजे केवळ चांगले आणि चांगलेच विचार कर. जेणेकरून मनातील negativity म्हणजेच नकारात्मकता दूर होऊन सतत positivity म्हणजेच सकारात्मकता राहील.
तुझी वागणूक नेहेमी अशी ठेव की जी जगाकडून नावाजली जाईल, कोणतेही कार्य प्रसन्न मनानेच आणि प्रामाणिकपणे कर. कधीही निंदनीय किंवा अयोग्य असे आचरण करू नकोस.

निर्मळ मनाने ईश्वरभक्ती करत राहा म्हणजे ‘श्रीहरी’ तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होईल. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #२

क्रमशः

दही

आयुष्य दह्यासारखे
दही

सुरेख मेसेज, का कुणास ठाऊक, पण व. पु. यांचाच असावा असे वाटते.
थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.

शुभ्र दही
पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो.
पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं!
पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर?
दिवसांखेरी, ते आंबट होऊन जाईल.
अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या मस्त लागलेल्या दह्याचा?

मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं … नाही का ?
दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य, नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं, तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल. …. वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !

दिवसभर ते दही वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून, तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा …
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला, तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या पदार्थ क्रियेची नजाकत वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !
‘उद्याचं’ दही लावायला !

मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या उबदार क्षणांनी,परत नव्यानं दही विरजायचं. #मा_आ_वि #दही #आयुष्य

मला ठाऊक आहे … रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली … तरी त्यात कमीपणा नसतो.
पण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !
आयुष्य कसं ‘चवीनं ‘ जगायचं !!!

लेखक: अज्ञात (WhatsApp वरून)