Posts Tagged ‘मराठी भाषा’

स एषा गणेशविद्या

देवनागरी लिपीलाच गणेशविद्या असेही म्हणतात.

गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.

यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.

या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.

५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !

भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.

गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हित रूपाला देवनागरी लिपी म्हणतात.

या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !

महर्षी व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !

गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.

त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.

श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !

गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !

कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपी यातील साम्य दाखवून दिले आहे !

ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..

सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.

कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.

शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.

रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.

डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.

सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.

देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!

ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !

देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.

कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.

ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.

दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.

झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.

घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.

मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.

मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.

वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.

कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे.

मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.

कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.

लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.

देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !

लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.

लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.

भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.

ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.

अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.

देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.

अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.

१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.

जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.

थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !

देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.

देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.

घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !

ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !

आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.

जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !

बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.

जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल. निवेदक :- प्रा. अनिल गोरे.

सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;

सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.

सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;

आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;

आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;

आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.

आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ

आजीव सदस्य : अक्षर मानव

सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.

निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!

हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती !
अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )

वी–पत्ता [email protected]

रजनीकांत – एक सुप्रसिद्ध वादळ

खालिल लेख मला माझ्या भावाकडुन अाला. मी रजनीकांतचा खुप मोठा चाहता नाही, पण एक मराठी भाषिक असल्याकारणाने, रजनीकांत (शिवाजी राव गायकवाड) यांच्या प्रसिद्धीचे वादळ, मराठी मनावर कसा परिणाम करते अाहे याचे सुंदर वर्णन करणारा हा लेख मला खुप जवळचा वाटला.

हा लेख सुरुवातीला रजनीकांत (रजनी) यांच्या पडद्यावरच्या अभिनेत्याचे जनसामान्याच्या मनातील प्रतिमेचे सुंदर चित्रण करुन मग, मुख्य मुद्याकडे वळतो. मराठी चित्रपटांचा उंचावणारा दर्जा, सामान्य मराठी माणसाचे चित्रपटाकडे अौदासीन्य अाणि यातुन मराठी चित्रपटाला अाकर्षक व झगमगीत करण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न पुढील संभाषणातुन अतिशय प्रंजळपणे व्यक्त होते. रजनीच्या व्यक्तीचित्राची उंची दाखवताना लेखकाले वापरलेली Phantom च्या Old Jungle Saying’s ची लकब या लेखात अतिशय चपखलपणे बसली अाहे. संपुर्ण लेखभर New Rajni Sayings पेरताना “इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड”, “घोड्यावर रागवून मारलेला पंच”, “(+ / -) वेव्जच्या टक्कर”, “परतीचा पाऊस”, “आईन्स्टाईन सोबतची अार्ग्युमेंट” इत्यादी कल्पना चोखंदळपणे वापरताना एकंदरीत लेखकाचा बहुश्रुततेतुन अालेला अनुभव दिसतो अाहे.

हा लेख वाचताना, तुम्हाला माझ्या वरील विवरणाचा प्रत्यय नक्की येइल.

टीप: खालिल लेख माझा नाही.


रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!


काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.


तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.

“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”


“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो”
“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला”


“ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती”


“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”


“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर”


“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”


“बरं”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”


“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?


“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”


“कमाल झाली तुमची..”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”


“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना, पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”


“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी”


“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब”


“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब”



एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)


फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला.(…आणि हवामान खात्याच्या मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)


मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)


मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल…


…की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)


त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.


(वरील माहिती आमच्या मते शंभर टक्के खरी आहे. जिज्ञासूंनी खुद्द रजनीदेवाला मेल करून खात्री करून घ्यावी. त्याचा ईमेल आयडी- [email protected])