Archive for the ‘खेळ’ Category

खेळ खेळुया… – डब्बा आईस-पैस

माझ्या बाल मित्रांनो, लगोरी, लंगडी, असे मोकळ्या मैदनातील खेळ खेळुन झाले. यावेळी आपण एक असा खेळ शिकुया की जो जागा मोकळी नसली तरी खेळता येइल. या खेळाचे नाव आहे “डब्बा आईस-पैस”. हे कसले नाव, हा काय पैसे देउन डब्ब्यात ice cream विकत घ्यायचा खेळ आहे का… डब्बा आईस-पैस? नाही-नाही या खेळात ice-cream वगैरे काही नाही (L!) पण या खेळात एक डब्बा मात्र नक्की आहे. आणि या डब्ब्याची “ऐशी-का-तैशी” करायची आहे… कसे?…. चला तर मग पुढे बघुया कसे खेळायचे “डब्बा आईस-पैस”.

सहित्य:

आधीच सांगतो, या खेळाचे साहित्य बरोबर ओळखणार्‍याला कोणते ही बक्षिस नाही. कारण “डब्बा आईस-पैस” चे साहित्य आहे: एक रिकामा डब्बा! गंमत म्हणुन सांगतो, मी लहान असताना हा डब्बा म्हणजे खरोखरचा पत्र्याचा डब्बा असे. घरी रंग लाउन झाल्यावर रिकामे रंगाचे डबे असतात, डालडा नावाचे वनस्पती तेल मिळत असे त्याचे रिकामे डबे, काहीच नाही मिळाले तर चक्क नारळाची करवंटी…. असे विविध प्रकारचे डबे … जो वेळेला हाती लागेल तो! आता तुम्ही विचाराल, आज मला घरी कोणता रिकामा डब्बा मिळणार? बर तुमचा हा प्रश्न बरोबर आहे कारण आज काल ना पत्र्याचे डब्बे असतात ना नारळाच्या करवंट्या. असे बघा – घरी आई दही आणते – Nestle, Amul किंवा इतर चीनी-जपानी brand चे त्याचे Plastic चे डब्बे असतात ते रिकामे झाल्यावर वापरु शकता तुम्ही.

चित्र १:- जुनी कुंडी चित्र २:-रिकामा डबा

खेळची जागा:

चला तर डब्बा झाला, आता खेळायची जागा. जागा अशी पाहिजे जिथे लपायला आडोसा असेल. जसे HDB चे Stilt जिथे खांबाच्या मागे लपता येइल, Condominium ची झाडी असलेली Play Area जिथे Benches किंवा झुडुपांचे आडोसे आहेत. एकंदर खेळाचा परिसर ठरवुन घ्यायचा, जसे या झाडाच्या पलिकडे नाही, त्या गवतावर गेलेतर चालेल, Compound च्या बाहेर जायचे नाही. याप्रकारे सर्वानुमते ठरवुन घेतलेला परिसर हा प्रत्येक गड्यावर बांधिल राहिल. आता या परिसरात एका मोक्याच्या ठिकाणी २ फुटचे वर्तुळ आखावे. ही डब्बा ठेवण्याची जागा झाली. तसेच हा डब्बा या परिसराच्या थोडेसे बाहेर फेकण्याची जागा ठरवुन घ्यावी. डब्बा फेकण्याची जागा मोकळी असावी आणि डब्ब्याच्या वर्तुळापासुन साधारणपणे २०-२५ फुटावर असावी.

चित्र ३:- खेळायची जागा

खेळायची वेळ ६-८ च्या मधे असावी, थोडासा अंधार व्हायच्या वेळची, म्हणजे जास्त मज्जा येते. आणि खेळायला ८-१० मुले-मुली असावेत. वेगवेगळ्या वयाची मुले एकत्र खेळु शकतात.

आता बघुया खेळाचे नियम:

(१) या खेळात एका गड्यावर “राज्य” येते. कोण राज्य घेणार यासाठी “सुटावे” लागते. ही सुटण्याची पद्धत खाली दिली आहे. त्याप्रमाणे सुटुन, एक गडी राज्य घेतो.

(२) मग राज्य नसलेला एक गडी तो डब्बा आधी ठरवलेल्या जागी लांब फेकुन देतो.

(३) डब्बा फेकल्याबरोबर राज्य घेणारा गडी डब्बा आणायला धावतो, या वेळात बाकीचे गडी ठरलेल्या परिसरात लपुन बसतात.

(४) राज्य घेणारा गडी डब्बा परत आणुन त्याच्या वर्तुळात उपडा (तोंडखाली) बसवतो. आता या डब्ब्याचे रक्षण करणे हे राज्य घेणार्‍याचे काम आहे आणि त्याबरोबर लपलेल्या गड्यांना शोधणे हे ही राज्य घेणार्‍याचे काम आहे.

(५) त्यासाठी राज्य घेणारा, हळुहळु काळजीपुर्वक ठरलेल्या परिसरात फिरुन लपलेल्या गड्यांना शोधायचा प्रयत्न करतो.

(६) लपलेला गडी दिसताच, राज्य घेणारा गडी परत येउन त्या डब्ब्यावर एक पाय ठेउन त्या दिसलेल्या गड्याचे (सुधीर) नाव ओरडुन सांगतो “सुधीरचा डब्बा आईस-पैस!” त्याच बरोबर तो गडी कुठे दिसला हे पण ओरडुन सांगु शकतो. आता तो लपलेला गडी बाद झाला. त्याने लपलेल्या जागेवरुन बाहेर येउन डब्ब्यापाशी जमावे.

(७) असे एक-एक करत राज्य घेणारा सर्व लपलेल्या गड्यांना शोधुन त्यांचा डब्बा आईस-पैस करण्याचा प्रयत्न करतो.

(८) जर सर्व लपलेले गडी शोधुन बाद झाले तर, पहिले बाद होणार गडी राज्य घेतो. त्याचे राज्य वर सांगितल्या प्रमाणे डब्बा फेकुन चालु होते.

(९) पण, या दरम्यान, जर कोणत्याही एका लपलेल्या गड्याने राज्य घेणार्‍याच्या नकळत हळुहळु डब्ब्यावर चाल करुन जाउन तो पायाने उडवुन दिला तर राज्य घेणारा गडी परत नव्याने राज्य घेतो आणि सर्व बाद झालेले गडी परत लपु शकतात. हे राज्य वर सांगितल्या प्रमाणे डब्बा फेकुन चालु होते.

चित्र ४:- लपलेल्या सुधीरचा डब्बा आईस-पैस चित्र ५:- राज्य घेतलेल्या वैदेहचा डब्बा आईस-पैस

सुटण्याची पद्धत (१):

सर्व गडी एक वर्तुळ करुन उभे राहतात. मग एक गडी क्रमानुसार स्वतःला धरुन प्रत्येक गड्याला एकदा शिवत १०, २० ३०, …. १०० मोजु लागतो. ज्याच्यावर १०० येइल तो गडी सुटला. तो वर्तुळाच्या बाहेर जातो. मग परत उरलेल्या गड्यांना शिवत १०, २०, ३०… करत १०० ला दुसरा गडी सुटतो. असे करत जो गडी सुटला नाही त्यावर राज्य येते.

सुटण्याची पद्धत (२):

एकावेळेस ३ गडी एकत्र येउन आपला उजवा हात एकावर एक ठेउन उभे राहतात. १, २, ३ म्हणाल्यावर एकाच वेळी तिन्ही गडी आपापला हात उपडा किंवा पालथा करतात. जो प्रकार दोन गड्यांनी केला आहे तो जिंकतो. म्हणजे दोघांनी आपला हात पालथा केला आणि एकाने उपडा केला, तर पालथा हात केलेले दोन्ही गडी सुटले. आता पुढचे न सुटलेले दोन गडी त्या न सुटलेल्या गड्यासोबत पुन्हा १, २, ३ म्हणुन सुटायचा प्रयत्न करतात. असे करत शेवटी न सुटणारा गडी राज्य घेतो.

काही विषेश करामती:

(१) वेळ संध्याकाळची ठेवावी, म्हणजे राज्य घेणार्‍या गड्याला लपलेले गडी ओळखणे सोपे जाणार नाही

(२) लपलेल्या गड्याने आपण पहिले बाद होत नाही याचा प्रयत्न करावा म्हणजे राज्य घ्यावे लागत नाही

(३) डब्बा फेकणार्‍या गड्याने नीट काम करावे नाही तर लपण्यास वेळ मिळत नाही

(४) राज्य घेणारा गडी डब्बा आणयला जाताना मागे वळुन कोण-कोण कुठे लपले आहे ते बघु शकतो

(५) असे बघता येउ नये म्हणुन डब्बा थोडा तिरका किंवा बाजुला फेकावा

(६) लपण्याचा परिसर ठरवला असल्याने राज्य घेणारा गडी खात्रीलायक रित्या शोध मोहिम ठरवु शकतो, तसेच लपलेला गडी डब्ब्यावर चाल करुन जाण्याचा मार्ग ठरवु शकतो

(७) पण कोणीही जर ठरलेल्या परिसराच्या बाहेर जाउन काही करण्याचा प्रयत्न केला आणि तो सापडला तर मात्र राज्य घेण्याची शिक्षा होते

(८) गोंद्या आला रे – बाद झालेले गडी जेव्हा राज्य घेणार्‍याच्या शोध मोहिमेची खबर लपलेल्या गड्यांना पोहोचवायची असते तेव्हा ते “गोंद्या आला रे” अशी आरोळी देउन सांगतात

(९) बुच लावणे – जर एखादा लपलेला गडी खुप अवघड जागी जाउन लपुन बसला आणि राज्य घेणार्‍याला खुप वेळ तंगवुन ठेवले तर त्याला बुच लावणे म्हणतात

(१०) बाटली फुटली – जर कोणत्याही कारणाने राज्य घेणारा गडी चुकीच्या नावने डब्बा आईस-पैस करतो या प्रकारला – राज्य घेणार्‍याची बाटली फुटली असे म्हणतात. या मध्ये, सगळे लपलेले गडी व बाद झालेले गडी पुन्हा लपु शकतात व राज्य घेणार्‍यावर राज्य परत येते. लपलेल्या गड्याने आपापसात शर्ट बदलणे आणि फक्त शर्ट दाखवुन चुकीच्या नावाने बाद होण्याचा प्रयत्न करणे जेणे करुन राज्य घेणार्‍याची बाटली फोडायची हा प्रकार खुप गंमतीशीर होतो.

खेळ खेळुया… – दिवाळीचे किल्ले

माझ्या बाल मित्रांनो, लगोरी, लंगडी, डब्बा आईस-पैस असे विविध पळापळीचे खेळ खेळुन झाले. नेहमीचे हे खेळतर आपण दरवेळी खेळतो. पण काही खेळ असे असतात की ते काही विशेष सणामध्ये खेळले जातात. जसे श्रावणात भोंडला, गणपतीमध्ये करमणुकीचे कार्यक्रम आणि मिरवणुक, आता नवरात्रीला गरबा खेळतो तसाच एक खेळ दिवाळीत खेळला जातो. या दिवाळी विशेष खेळाचे नाव आहे – “किल्ला करणे”. किल्ला हो… हो…, शिवाजी महाराजांच्या वेळी होता तसा, खरोखरचा… डोंगरावर असतो ना, तसाच, पण आपापल्या घरी. कसा? तर मग, चला किल्ला करुया…!

सहित्य (पुर्व तयारी):

विशेष सणासाठी आपण कशी आधी तयारी करतो, तशी किल्ला करायला आधीपासुन तयारी करावी लागते. साधारणपणे एक महिना आधी पासुन तयारीला सुरुवात करावी.

* किल्ला :- सर्वप्रथम, कोणता किल्ला करावा हे ठरवुन घ्यावे. प्रतापगड, राजगड, सिंहगड हे माहितीतले किल्ले करायला सोपे जातात कारण त्यांच्याबद्दल चित्र, माहिती सहज मिळते. किल्ला ठरवल्यावर देखावा कोणता करावा याचा विचार करावा. पन्हाळ गडहुन सुटका – बाजीप्रभु, गड आला पण सिंह गेला – तानाजी असे प्रसिद्ध देखावे करु शकतो. काहीच सुचले नाही तर नुसताच किल्ला करुन खाली सुंदर गावाचा देखावा करावा.

* किल्ला करायची जागा :- घराच्या जवळ १० x १० फुटाची मोकळी जागा. वर छत असावे, पण चारी बाजुने पुर्ण बंद नसावी. खाली जमीन मातीची असल्यास उत्तम.

* किल्ला बांधायचे सामान:- दगड, विटा, लाल मुरुमाची माती, पाण्यासाठी एक मोठे पातेले किंवा छोटे पिंप, माती आणण्यासाठी पोते, इत्यादी.

* सजावटीचे सामान:- सजावटीचे सामान आपापल्या हौशी प्रमाणे – कोणी फक्त किल्ल्यावर झाडे लावुन थांबतात, काहीजण किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, झेंडे उभारतात, तर अजुन काहीजण किल्ल्याखाली विहिर, कारंज, शेत, गाव इत्यादी सुरेख देखावा उभारतात. प्रत्येकाने आपापल्या आवडी प्रमाणे सजावटीचे सामान गोळा करावे. आणि हो, एक महत्वाचे राहिले ना… सजावटीसाठी शिवाजी महाराज, त्यांचे सोबती मावळे आणि शत्रु यांचे मातीचे पुतळे. तीच तर खरी गंमत आहे!

सिंगापुरात कोठे किल्ला कराल :-

हे सर्व साहित्य आणि लागणारी तयारी इथे सिंगापुर मध्ये कुठे करणार? प्रश्न नेमका आणि वेळीच विचारलात म्हणुन बरे झाले. इकडे HDB किंवा Condo च्या आवारात असा चिखल-मातीचा किल्ला करायला कोणी परवानगी देणार नाही. मग काय झाले, नाराज होऊ नका. ECP चा समुद्रकिनारा आहे ना! तिथे वाळुत किल्ला करायला कोणाची परवानगी लागत नाही. ठिक आहे ना आता… चला तर बघु या किल्ल्याचे पुढले काम.

किल्ल्याचे बांधकाम :-

मी पन्हाळ गडाहुन सुटका हा देखावा बनवायचे ठरवले आहे. तरी पुढे चलचित्रात बघुया कसा बनवला किल्ला ते…

काही दृष्य नमुने :-

चित्र १ लढाईचे दृश्य चित्र २ गावकरी
चित्र ३ उभा शिवाजी चित्र ४ बसलेला शिवाजी

मग आता, तुम्ही नक्की किल्ला करणार ना, यंदाच्या दिवाळीत? मला सांगा कोणता देखावा उभारता आहात तो. आणि हो शिवाजी, मावळे यांचे पुतळे कोठे मिळतील याची माहिती हवी असेल तरी मला Email करा ..

खेळ खेळुया – लगोरी

काय मग, लंगडी खेळलात कि नाही? … मला माहिती आहे तुम्हासगळ्यांना जमले नसेल पण ज्यांनी लंगडी खेळायचा प्रयत्न केला असेल त्यांना नक्कीच खुप मज्जा आली असेल. यावेळी लंगडी सारखाच सोपा आणि मजेदार खेळ सांगणार आहे मी तुम्हाला.

या खेळाचे नाव आहे “लगोरी”. हो लंगडी सारखीच हा खेळ खेळण्यासाठी फार तयारी लागत नाही. एक सपाट, मोकळी जागा – जसे HDB चे stilt किंवा Rubber mat चा Play area, Open grass area अशी कोणती ही मोकळी जागा चालते. पण Swimming pool च्या जवळ, Parking lot च्या जवळ नको कारण या खेळात एक चेंडु आणि लाकडी चकत्यांचा एक मनोरा – तुम्ही कुतुबमिनार पाहिला आहे का? दिल्ली – भारताची राजधानी येथे आहे तसा लगोरीचा मनोरा, पण छोटा, हे साहीत्य लागते.

चित्र १:- लगोरी

हा लाकडी चकत्यांचा मनोरा ज्याला लगोरी म्हणतात, त्यात ७ लाकडी तुकडे घ्यावे. सगळे तुकडे सारख्या आकाराचे नाहीतर काही लहान आणि काही मोठे असे कोणतेही लाकडी तुकडे वापरुन एक लगोरीचा ६ तुकड्यंचा एक संच तयार करु शकता. लगोरी रचायची – म्हणजे सर्वात खाली मोठा तुकडा, त्यावर नंतरचा मोठा अश्या उतरत्या क्रमाने एकावर एक लावावे, म्हणजे सगळ्यात वरती छोटा तुकडा लागेल. फार खटपट करणे शक्य नसेल तर लगोरीचा तयार संच विकतही घेउ शकता.

मग काय, एक लगोरीचा मनोरा तयार असला की मग तुमची खेळायची जागा नक्की करायची की मग सुटायचे. दोन Captain आपापला गट मागुन घेतात. प्रत्येक गटात साधारणपणे ४-५ खेळाडु-गडी असावे, म्हणजे मज्जा येते. लगोरी खेळण्यासाठी मैदान आखायचे खुप सोपे आहे. मोकळ्या जागेच्या मधोमध एक छोटे वर्तुळ, साधारण २ फुट व्यासाचे आखुन घ्यावे. यात लगोरीचा मनोरा मांडावा आणि १० ते १२ फुटावर एक रेघ मारुन घ्यावी. ही झाली लगोरी फोडण्याची जागा. एकंदरीत खाली दिलेल्या चित्राप्रमाणे तयारी झाली पाहिजे.

चित्र २:- मैदान

खेळुया आता…

  • कोणता गट लगोरी फोडणार आणि कोणता गट पकडणार हे ठरवण्यासाठी नाणेफेक करावी
  • पकडणारा गट (Defending Team) फोडण्याच्या विरुद्ध बाजुला चेंडु पकडण्याच्या तयारीत आपापली जागा घेतात.
  • फोडणारा गट (Breaking Team) फोडण्याच्या रेषे पलिकडे उभे राहतात.
  • फोडणार्‍या गटातील पहिला खेळाडु चेंडु हातात घेउन लगोरीच्या मनोर्‍यावर चेंडुफेक करतो. जर लगोरीचा मनोरा फुटला तर:-
    • पकडणार्‍या खेळाडुंनी चेंडु हस्तगत करुन फोडणार्‍या गटातील खेळाडुंना चेंडुफेक करुन मारायचा प्रयत्न करावा.
    • चेंडु ज्या खेळाडुला लागेल तो फोडणार्‍या गटाचा खेळाडु बाद होतो.
    • बाद झालेला खेळाडु लगोरीचा मनोरा लावु शकत नाही.
    • बाद न झालेल्या फोडणर्‍या गटाच्या खेळाडुंनी चेंडु चुकवत लगोरीचा मनोरा उभारायचा प्रयत्न करावा.
    • शेवटचा खेळाडु बाद होण्या आधी लगोरीचा मनोरा पुर्ण केला तर फोडणार्‍या गटाला १ गुण मिळतो
    • लगोरी पुर्ण उभी रहायच्या आधी फोडणार्‍या गटाचे सर्व खेळाडु बाद झाल्यास पकडणार्‍या गटाला १ गुण मिळतो.
    • पहिल्या खेळाडुच्या कोणत्याही संधीने लगोरी फुटली तर त्यानंतर फोडणार्‍या गटाच्या दुसर्‍या खेळाडुला फोडण्याची संधी मिळते.

चित्र ३:- लगोरी फोडताना

चित्र ४:- फुटलेली लगोरी

चित्र ५:- लगोरी लावताना

  • जर लगोरीचा मनोरा नाही फुटला तर:-
    • फोडणार्‍या खेळाडुला अजुन दोन वेळा फोडण्याची संधी मिळते.
    • पहिल्या खेळाडुच्या ३ संधी फुकट गेल्यावर दुसरा खेळाडु प्रयत्न करु शकतो.
    • अशा प्रकरे फोडणार्‍या गटाच्या सर्व खेळाडुंनी प्रयत्न केल्यावर एक बाजु संपते.
  • बाजु बदल म्हणजे फोडणारा गट लगोरीच्या विरुद्ध बाजुला जाउन उभा राहतो आणि पकडणारा गट फोडण्याच्या रेषे मागे चेंडु घेउन फोडण्याच्या तयारीने उभा राहतो.
  • डाव पुन्हा वर सांगितल्या प्रमाणे चालु करावा.

काही नियम:

  • पकडणार्‍या गटातील खेळाडु चेंडु हातात आल्यावर पळु शकत नाही. त्याने चेंडुफेक करुन फोडणार्‍या खेळाडुला बाद करण्याचा प्रयत्न करावा नाहीतर दुसर्‍या पकडणार्‍या खेळाडुला चेंडु द्यावा.
  • चेंडु हातात घेउन ५ सेकंदापेक्षा जास्तवेळ उभे राहु शकत नाही
  • फोडणार्‍या गटाच्या खेळाडुने चेंडु लगोरीवर मारल्यावर आणि चेंडु लगोरीला लागुन उडाल्यावर चेंडुचा टप्पा जमिनीवर पडण्याआधी जर पकडणार्‍या खेळाडुने चेंडु पकडला तर फोडणारा सर्व गट बाद होतो आणि बाजु बदल केला जातो
  • फोडणारा खेळाडु स्वतःला वाचवण्यासाठी हाताची मुठ करुन चेंडु दूर ढकलु शकतो.

खास करामती:

  • लगोरी फोडताना कमीतकमी फोडण्याचा प्रयत्न करावा. वरची एखादी लगोरीच उडवावी, सगळ्या लगोर्‍या उडवल्यातर पुन्हा लावताना पंचाइत होइल.
  • फोडणार्‍या खेळाडुला बाद करताना चेंडु जोरात फेकु नाही. नेम चुकला तर चेंडु खुप लांब जाईल आणि दुसर्‍या गटाची लगोरी पुर्ण होईल.

कोण जिंकले:

  • जो गट जास्त वेळा लगोरी लावुन पुर्ण करतो तो गट विजयी होतो

विशेष सुचना:

  • हा खेळ वय वर्षे ५ च्या पुढील मुलां-मुलींसाठी आहे.
  • मउ चेंडु (soft squeeze) खेळायला घ्यावा.

खेळ खेळु या… – लंगडी

माझ्या बाल सवंगड्यांनो, … (ओ!) घरी बसुन TV / Video Games बघुन जेव्हा फार Bore होते, पण खेळायला खुप लांब जायला वेळ नसतो आणि काहीतरी कंटाळा घालवणारा Game खेळावासा वाटतो अशावेळी मला एक खेळ खेळावासा वाटतो. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. या खेळाचे नाव आहे – लंगडी! … हो जेव्हा एखाद्याचा पाय दुखावला तर तो/ती जरा लंगडत चालतो/ते तसेच लंगडत पकडणे. पण खरे पायाला लागले असताना नाही बर! तर लंगडी हा खेळ खुप सोपा आणि रंगतदार आहे. हा खेळ खेळण्यासाठी फार तयारी लागत नाही. एक सपाट, मोकळी जागा – जसे HDB चे stilt किंवा Rubber mat चा Play area, Open grass area अशी कोणती ही मोकळी जागा चालते. पण Swimming pool च्या जवळ, Parking lot च्या जवळ नको. एकदा तुमची जागा नक्की झाली की मग सुटायचे. दोन Captain आपापला गट मागुन घेतो. प्रत्येक गटात साधारणपणे ६-७ खेळाडु-गडी असावे, म्हणजे मज्जा येते.

जागा ठरली, गडी जमले की मैदान आखायचे. खालील दिलेल्या चित्राप्रमाणे अ” आणि “ब” हे विरुद्ध बाजुला आखुन घ्यावे. आखण्यासाठी काही मिळाले नाही तर, चक्क चपला / बुट ठेउन “अ” आणि “ब’ जागा ठरवुन घ्यावी.

एखादा गडी जो पंचाचे काम करु शकतो, म्हणजे कोण Out – बाद झाला, कोणी पाय टेकला, वेळ संपला का, इत्यादी काम करणे याची जबाबदारी आणि सोबत एक शिट्टी त्याला द्यावी.

लंगडी घालत पकडणे:-

  • डाव सुरु झाल्यावर पकडणारा गडी एका पायावर तोल सांभाळत दुसरा पाय गुढग्यात दुमडुन अर्थात वर उचलुन, पुन्हा जमिनीला न टेकता दुस~या पायावर उडी मारत मारत पळणा~या खेळाडुंना शिवण्याचा प्रयत्न करतो.
  • लंगडी घालत पळणा~या गड्याला शिवल्यास पळणारा गडी बाद होतो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो. बाद झालेला खेळाडु लगेच मैदानाबाहेर जातो.
  • पळणारा गडी पळता पळता मैदानाबाहेर गेल्यास बाद घोषित केला जातो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो. बाद झालेला खेळाडु लगेच मैदानाबाहेर जातो.
  • पळणारा प्रत्येक एक गडी बाद झाल्यावर पकडणा~या गटास एक गुण मिळतो.
  • पहिल्या ततीत पळण्यास आलेले ३ गडी बाद झाल्यावर पुढील ३ गडी एकत्रपणे पळण्यास मैदानात उतरतात.
  • लंगडी घालणा~या खेळाडुने सुरुवातीला जो पाय गढग्यात दुमडुन अर्थात वर उचलुन लंगडी घालायला सुरुवात केली तो पाय किंवा एक अथवा दोन्ही हात जमिनीवर टेकवले किंवा स्वत: जमिनीवर पडला तर लंगडी घालणारा खेळाडु बाद घोषित केला जातो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो.
  • लंगडी घालणारा खेळाडु बाद झाल्यास लगेच मैदानाबाहेर जातो. तो बाहेर गेल्यानंतर पुढील खेळाडु “अ” या ठिकाणाहुन पकडण्यासाठी लंगडी घालत मैदानात येतो.
  • अशाप्रकारे १० मिनिटे पकडणारा गट लंगडी घालत पळणा~या गटाचे खेळाडु बाद करुन गुण मिळवतो. १० मिनिटे संपल्यावर पंच लांब-शिट्टी वाजवुन वेळ संपल्याची घोषणा करतो.

मध्यंतर आणि पुढे:-

  • पळणारा गट पकडण्याच्या जागी (“अ”) जाउन विश्रांती घेतो.
  • पकडणारा गट पळण्याच्या जागी (“ब”) जाउन विश्रांती घेतो.
  • पंच मध्यंतर संपल्याची आणि डाव बदलल्याची शिट्टी वाजवुन घोषणा करतो.
  • वर “डाव सुरु करण्यासाठी” आणि “लंगडी घालत पकडणे” मध्ये लिहिल्याप्रमाणे खेळ सुरु होतो.

निर्णय:-

  • दोन्ही गटांचे लंगडी घालुन झाल्यावर पंच आणि गुण नोंदणी करणारे पंच मिळुन निर्णय देतात.
  • जो गट अधिक गुण मिळावतो तो गट विजयी घोषित केला जातो.
  • दोन्ही गटांचे गुण समान असल्यास, ज्या गटाने कमी पकडणारे खेळाडु वापरले तो गट विजयी घोषित केला जातो.

खेळ खेळतानाचे छायाचित्र:-

लंगडीचा खेळ