वयाचा साहसी खेळ आणि नव्याने मैत्री!

स्पॉटईफीवर ऐका | Listen on Spotify

[एपिसोड ९ लवकरच येत आहे]

सोशल मीडियावर फिरणारा हा एक निखळ विनोदी लेख. मूळ लेखक अज्ञात असले तरी, वाढत्या वयातील रोजच्या गमतीजमती त्यांनी ज्या खुमासदार शैलीत मांडल्या आहेत, त्या वाचकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवतील.

@विभासा

आता माझं वय अशा टप्प्यावर आलं आहे की, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हा एक प्रकारचा साहसी खेळच झाला आहे! साखर खाल्ली की रक्तातील साखर वाढते. मीठ खाल्लं की रक्तदाब वाढतो. आणि औषधांच्या किमती पाहिल्या की दोन्ही वाढतात! पाणी प्यायलं की दर पाच मिनिटांनी बाथरूमला धावावं लागतं आणि पाणी प्यायलं नाही तर शरीरात पाण्याची कमतरता होते. आता तर बाथरूममध्येच टीव्ही लावून त्याला माझा दिवाणखानाच म्हणावं, असा विचार चालू आहे!

जेवलं की वजन वाढतं, जेवलं नाही तर अशक्तपणा येतो. फक्त सॅलड खाल्लं तर मन उदास होतं आणि मन उदास झालं की पुन्हा खायला सुरुवात! डॉक्टरांनी सांगितलं, “तुमच्या शरीराचं ऐका.” मी ऐकलं… पण शरीराच्या तक्रारी काही संपतच नाहीत! अगदी सोसायटीच्या वार्षिक सभेसारखं वाटतंय, जिथे प्रत्येकाची काही ना काही तक्रार असतेच!

व्यायाम केला तर दुसऱ्या दिवशी बसण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि व्यायाम केला नाही तर उठण्यासाठी मदत लागते! त्यामुळे जिमची फी फक्त कोणत्या प्रकारे त्रास सहन करायचा, हे ठरवण्यासाठीच भरतोय की काय असं वाटतं. जास्त झोपलो तर पाठ दुखते, कमी झोपलो तर झॉम्बी झाल्यासारखं वाटतं. आणि झोपताना चुकीच्या स्थितीत झोपलो तर पुढचे तीन दिवस मान डावीकडेच वळलेली राहते! आणखी एक नवा शोध लागला आहे—झोपेतसुद्धा दुखापत होऊ शकते! पूर्वी दुखापत होण्यासाठी सायकलवरून पडावं लागायचं, आता फक्त चुकीची उशी निवडली तरी पुरेसं ठरतं!

कॉफी प्यायली तर झोप येत नाही आणि कॉफी प्यायली नाही तर कामच होत नाही. माझं शरीर आता जुन्या गाडीसारखं झालंय; सुरू व्हायला खूप वेळ लागतो आणि सुरू झाल्यावर नेमका कसला आवाज येतोय, हे कोणालाच कळत नाही! सकाळी आता मी झोपेतून उठत नाही, तर जणू पुनर्जन्मच घेतो! सुरुवातीला डोळे उघडतो, मग शरीराचे कोणकोणते अवयव व्यवस्थित काम करतायत याची तपासणी करतो आणि पलंगाच्या कडेला बसून गुडघ्यांना जाग येण्याची वाट पाहतो!

माझी स्मरणशक्ती तर एकदम उत्तम आहे! फक्त ती कुठे ठेवली आहे, हेच नेमकं आठवत नाही! परवा एका खोलीत गेलो आणि तिथे कशासाठी आलो होतो तेच विसरलो. आठवण्यासाठी परत मागे गेलो, तर कुठून आलो होतो तेही विसरलो! शेवटी म्हटलं, आता उभाच आहे तर बाथरूमला जाऊन येतो!

पण आयुष्याकडे थोडं हलक्याफुलक्या नजरेने पाहिलंच पाहिजे. एकटं राहणं आणि कोणाशीच न बोलणं आरोग्यासाठी चांगलं नाही. म्हणून एके दिवशी कॉफी पिताना मी मायक्रोवेव्ह आणि टोस्टरशी गप्पा मारल्या. दोघांनीही माझ्या मताला सहमती दिली. टोस्टर तर इतका भावूक झाला की त्याने ब्रेडचे तुकडेच बाहेर उडवले! वॉशिंग मशीनशी मात्र आता मी बोलत नाही; ती प्रत्येक गोष्ट इतकी फिरवून सांगते आणि त्याच विषयावर पुन्हा पुन्हा गोल गोल फिरत राहते! फ्रिज जरा थंड स्वभावाचा आहे, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल—मला पाहिल्यावर दिवा लावणारा तो एकटाच आहे! इस्त्रीचा स्वभाव फारच तापट आहे, ओव्हनसुद्धा तसाच! आणि व्हॅक्यूम क्लीनर तर माझ्यातली उरलीसुरली शक्ती शोषून घ्यायलाच येतो! आता माझा सर्वांत जवळचा मित्र म्हणजे सोफा! तो कोणतेही प्रश्न न विचारता माझं स्वागत करतो. फक्त एकच अडचण आहे… एकदा बसवलं की परत उठूच देत नाही!

म्हणून जोपर्यंत विनोद आठवत आहेत, तोपर्यंत मनमुराद हसून घ्या! आता आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं मी अगदी सोपं वर्गीकरण केलं आहे:

 ५० वर्षांपर्यंत: आपण आयुष्याचे बेत आखतो.

 ५० वर्षांनंतर: आपण नियमित तपासण्या करून घेतो.

 ७० वर्षांनंतर: आपल्या तपासण्यांचे रिपोर्ट मित्रांबरोबर तुलना करून पाहतो!

 ९० वर्षांनंतर: मग अख्खा केक खायलाही हरकत नाही! कारण तक्रार करायची असेल, तर आधी तक्रार करणाऱ्याने ९० वर्षांपर्यंत पोहोचून दाखवावं! 🎂

आता इथेच थांबतो… कारण मी काहीतरी काम करायला म्हणून उठलो होतो. पण आता ते काम नेमकं काय होतं, हेच आठवत नाहीये! कोणाला आठवलं तर कृपया मला नक्की सांगा!

लेखक: अज्ञात


संकलन व साभार: सोशल मीडिया 
मूळ लेखक: अज्ञात. या लेखाच्या मूळ लेखकाची माहिती मिळाल्यास कृपया कळवावे, त्यांना योग्य ते श्रेय दिले जाईल.

3 responses to this post.

  1. tenaciousmindfully9a9631d1f8's avatar

    Posted by tenaciousmindfully9a9631d1f8 on नोव्हेंबर 5, 2026 at 9:04 pm

    ह्या लेखाचा लेखक सापडेलही आणि त्याला योग्य श्रेय मिळेलही पण ह्या वाढत्या वयातल्या कुरबुरी चा जन्मादाता लेखक कधीच सापडत नाही, मग आपणच म्हणतो चालायचंच 😜

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  2. अज्ञात's avatar

    […] सकारात्मक, विनोदी दृष्टिकोन ‘वयाचा साहसी खेळ आणि नव्याने मैत्री!‘ या अज्ञात लेखकाच्या खुमासदार […]

    Like

    उत्तर द्या

प्रतिक्रिया व्यक्त करा