
ठिणगीचा प्रवास ज्योतीकडे – नात्यातील बदलतं प्रेम आणि जबाबदाऱ्या | मराठी ऑडिओ पॉडकास्ट
तो आणि ती एकमेकांना वयाच्या २० शीत भेटले. तिचे रूप चेहऱ्यावरची चमक चालीतील अदा पाहून विरघळला. त्याचा आत्मविश्वास नोकरीत पदार्पण करून पुढे परदेशी जाण्यास मिळणारी संधी यावर मुग्ध झाली. दोघांनी घरून परवानगी व परिवाराची बोलणी करवून संसार चालू झाला.
पहिले काही महीने स्वप्नवत गेले. मग संसार म्हणजे काय ते दिसू लागले. तिच्या अपेक्षेच्या ओझ्या खाली तो तर त्याच्या वागण्याच्या तऱ्हा मागे ती असे दोघे एकमेकांना समजून घेत घेत गृह कर्तव्य पार पाडीत होते. संसारात कमी असे काही नाही. घर गाडी सासूची कटकट नाही नणंद प्रेमळ, दीर स्वतःच्या पायावर उभा आहे. वर्षातून एक परदेशी प्रवास. सर्व काही जसे चालावे तसे.
पूर्वीचे बाहेर जाऊन भेटणे हळूच तू मला आवडतेस किंवा आवडतोस म्हणणे व ते म्हणताना नजरेची नजरे सोबत होणारी दाहक भेट त्याचवेळी मनात ठिणगी नाही स्पुल्लिंग उडवणारे क्षण कमी नाही जवळ जवळ नाहीसे झाले होते. तिला मनात येई हा माझ्यावर प्रेम करतो की नाही, कसे कसे कळावे? या विचाराने हळू हळू एक अदृश्य फुग्याचे रूप घेतले. कामाच्या संसाराच्या ओघात तो वाढेल तसा मानसिक दुरावा आहे की काय असे वाटू लागले.
दुरावा अचानक नाहीसा झाल्यासारखे वाटले. योग्य वेळी मुलगी झाली. दोघांच्या संसारातून ते आता तिघे झाले. आणि आता केवळ अपेक्षांची ओझी किंवा वागण्याची तऱ्हा एवढीच नव्हे तर नवीन जीवाला कसे जपायचे यात दोघे बुडून गेले होते. एकमेकांची सवय ही एकमेकांना गृहीत धरण्यात बदली होती. आता तर प्रेम आहे का याचे माझ्यावर हा विचारही तिच्या मनात चोरा सारखा डोकावू पाही, पण त्या चोराला काही संधी मिळाला नाही. पण तो चोर दबा धरून कोपऱ्यात बसलेला होता.
आता लग्नाला १० वर्षे होऊन गेली. मुलगी शाळेत जाऊ लागली. आता तिला घरी वेळ मिळत असे. स्वतः साठी करायला. तिने ठरवले की या वर्षी त्याला वाढदिवसाला काही छान भेट देऊ. मग बघू त्याचे किती प्रेम आहे. त्या फुग्याचा आकार किती आहे, कोपऱ्यात दबा धरून बसलेल्या चोरला किती हुशारी आहे चोरी करायची हे पाहू. बऱ्याच विचारांती एक छोटे फुलाचे रोप त्याला द्यावे असे तिने ठरवले.
वाढदिवसाच्या दिवशी तिने ते छोटे रोप त्याच्या हातात दिले. त्याला कदाचित घड्याळ किंवा परफ्यूमची अपेक्षा असावी. त्याने क्षणभर रोपाकडे पाहिले, एक मंद स्मित केले आणि फक्त “छान आहे” म्हणत ते बाल्कनीत नेऊन ठेवले.
तिचा भ्रमनिरास झाला. मनातला तो अदृश्य फुगा आता चांगलाच फुगला आणि कोपऱ्यातला चोर हळूच हसून म्हणाला, “पाहिलंस? सवयीपलीकडे आता काहीच उरलेलं नाही.” तिनेही मग हट्टाने ठरवले—मी या रोपाला अजिबात पाणी घालणार नाही. बघूया हा किती दिवस या रोपाची आणि पर्यायाने माझ्या भावनांची दखल घेतो.
दोन आठवडे गेले. तिने एकदाही बाल्कनीत पाहिले नाही. एके दिवशी सकाळी ती लवकर उठली. पाहते तर काय—ऑफिसला जाण्याच्या घाईत असलेला तो, हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत उभा होता. अत्यंत हळुवार हाताने तो त्या रोपावरची सुकलेली पाने काढत होता, मातीला पाणी घालत होता. आणि आश्चर्य म्हणजे, त्या रोपावर एक छोटीशी कळी आली होती.
तिच्या नकळत तो रोज सकाळी त्या रोपाची काळजी घेत होता. त्या एका क्षणात तिच्या मनातला तो अजस्त्र फुगा कुठल्याही आवाजाशिवाय फुटून गेला आणि कोपऱ्यात दबा धरलेला चोर कायमचा पळून गेला. तिला समजले—विशीतली ती ‘ठिणगी’ विझली नव्हती, तर तिचे रूपांतर आता एका शांत, उबदार ‘ज्योतीत’ झाले होते. गृहीत धरण्यातही एक गाढ विश्वास दडलेला होता.