लेखकाचे संग्रह-दफ्तर

टर्निंग पॉईंट

म्हणजे निर्णायक टप्पा जेथून नवे वळण मिळते असा महत्त्वपूर्ण क्षण, कलाटणी देणार क्षण म्हणू आपण हवं तर…
थांबा थांबा घाबरून जाऊ नका आणि असं तर अजिबात वाटून घेऊ नका की आज अचानक एवढे जड शब्द वापरून ही काय ज्ञानाचे डोस पाजणार आहे…

निर्णायक टप्पा म्हणजे टर्निंग पॉईंट हा झाला शब्दशः अर्थ.
पण असे टप्पे आपल्या आयुष्यात अनेकदा येतातच ना,
प्रत्येक वेळी काही अगदी कलाटणी देणारा क्षण किंवा फार मोठी घटनाच असते असं काही जरुरी नाही, की ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणू.
ती एखादी छोटीशी पण विलक्षण बदल घडवणारी घटना असू शकते, जी आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकते किंवा एखादं वाचनात आलेलं पुस्तक असू शकतं जे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं किंवा कोणी व्यक्ती असू शकते जी जणू सकारात्मकतेने भरलेला झरा असते आणि तिच्या नुसत्या भेटल्याने आपण खूप बदलून जातो, स्वतःला नव्याने उमगतो…
असेच काही स्वतःला बदलायला लावणारे, विचार करायला लावणारे प्रसंग, घटना, पुस्तके, व्यक्ती अलीकडेच आयुष्यात आल्या की ज्यामुळे अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यात खूप चूक करतो rather अतिशय चुकीच्या व्यक्तीजवळ मनमोकळ करतो, त्यांना आपलं मानतो आणि मग एकदम जोराचा झटका बसून डोळे उघडतात…
सुरुवातीला खूप त्रास होतो अयोग्य व्यक्तीवर विश्वास टाकल्याचा, पण हा अनुभव खूप काही देऊन जातो.

पण अशातच काही नवीन चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. त्यातल्या दोघींनी तर मनात खूप खास अशी जागा निर्माण केली.
मुळातच मैत्रीप्रिय स्वभाव असल्याने तशा खास जवळच्या खूप मैत्रिणी आहेतच आयुष्यात, प्रत्येकीची मनात वेगळी जागा, वेगळा कप्पा आणि तो तसा ठेवताच यायला हवा. त्यातच खरी गंमत आहे.
पण या दोन नवीन मैत्रिणीं सोबत खूप वेगळ्याच level चे सूर जुळले,
रोज भेटतात बोलतात असं काही नाही पण जेव्हा समोर येतात तेव्हा full of positive vibes….
त्यामुळे मन एकदम शांत, प्रसन्न आणि आनंदी होतं,
no gossiping just निखळ आनंद.
आधी मी अनेक लोकांच्या वागण्या-बोलण्याचा विनाकारण त्रास करून घेत असे, पण अशा काही मैत्रिणी आयुष्यात आल्यावर लक्षात आलं की आता आपणच आपलं brain boosting करून स्वतःला बदलायला हवं.
मग मन त्रस्त करणारे विचार, व्यक्ती आणि विषय यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू जमायला लागलं की हो.
आवडायला लागलं कारण आपला आनंद हा आपल्यावरच अवलंबून असतो आणि तो आपला आपणच शोधायचा असतो.

सुखी तर अनेक जण असतात पण सुख म्हटलं की त्या पाठोपाठ दुःख आलंच. त्यापेक्षा आनंदी राहणं केव्हाही चांगलं, कारण आनंदाला विरुद्ध शब्द नाही

तशी मला काही पुस्तक वाचण्याची खूप अशी आवड नाही, पण ठराविक विषयांची ओढ मात्र खूप आहे, जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
अशातच दादाने सुचवलेले एक पुस्तक वाचनात आले डॉ. प वि वर्तक यांचे पुनर्जन्म हे पुस्तक.
प्रचंड गूढ आणि क्लिष्ट असं वाटणाऱ्या या विषयावर त्यांनी scientific reasoning and examples देऊन पुनर्जन्म, आत्मा-परमात्मा, कर्म-पूर्व कर्म व त्यांचे फळ या अनेक गोष्टी खूप सोप्या करून सांगितले आहे.
खरंच हे पुस्तक परत परत वाचावेसे आहे, प्रत्येक वेळी नवनवीन आणि विलक्षण अर्थ उलगडत गेला,
त्याच्याच जोडीला हिराबाई ठक्कर यांचे कर्माचा सिद्धांत हे देखील वाचले आणि डोक्यात नवीन विचारांचे चक्र सुरू झाले.

ठराविक विषय आणि विचार मनापर्यंत कानापर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत अशी सवय केली आणि खूप छान वाटायला लागलं.
Detached attachment ठेवायला सुरुवात केली.

कारण इथे आपण कोणालाच बदलू शकत नाही, जो तो आपापला विधीलिखित घेऊन जन्माला येतो, तो जे वागतो जगतो ते त्याच्या पूर्वकर्मानुसारच,
त्यासाठी दुसरे कोणीच जबाबदार नसते, आपण त्यांना बदलूही शकत नाही आणि कुणाच्या वाट्याचं जगूही शकत नाही, मग त्रास तरी का करून घ्यायचा…
आयुष्यात करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करूया, त्याच्यासाठी वेळ देऊ या…

हा असा साधा सोपा बदल मी जर करू शकते तर तुम्ही करू शकता…
बघा एकदा विचार करून ….
तुमच्या पण आयुष्यात असा टर्निंग पॉईंट आला असेलच ना, एखाद्या घटनेच्या, पुस्तकाच्या किंवा व्यक्तीच्या रूपात…
नक्कीच तो उलगडून बघा स्वतःला बदलून बघा

सौ. मानसी गोडबोले.
https://amzn.in/d/56gO9v9 – कर्माचा सिद्धांत

पुण्यसंचय – एक विलक्षण अनुभव

श्रीमद भगवत गीतेचे महात्म्य काय वर्णावे, आपल्या भारतवर्षाच्या हिंदू संस्कृतीत भगवद्गीता हा पवित्र धर्मग्रंथ,
जो मानवी जीवनाचे सार सांगतो, जीवनाच्या अथांग सागरातील दीपस्तंभ जणू !!

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ही गीता सांगितली यात १८ अध्याय – ७०० श्लोक आहेत.
आज जगातील अनेक देशातील अनेक धर्मातील विचारवंतांनी देखील गीतेचे महात्म्य जाणले आहे.

आज आत्ता मी माझ्या आयुष्यातील नुकत्याच घडलेल्या एका अद्भुत अशा अनुभवाविषयी सांगणार आहे.
त्याआधी थोडं आमच्या बाईन बद्दल सांगते, सौ.वंदनाताई कुनकीकर म्हणजे आमच्या बाई, गीता धर्म मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘वेदवाणी गीता संथा वर्ग’ याच्या अध्यापिका. त्यांच्या वर्गात त्या फार सुंदर शब्दात गोष्टी रुपात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे निरूपण करून सांगतात आणि संथा देतात, त्यांच्या ओघवत्या वाणीतून हे सर्व ऐकणे म्हणजे एक विलक्षण अनुभवच आहे. सतत त्यांच्या बोलण्यात असे असते की हे देवाचे कार्य आहे, आपण काहीच करत नसतो, कर्ता करविता जर कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु साक्षात परमेश्वर, तेच आपल्याकडून सर्व काही करवून घेतात, आपण फक्त निमित्त मात्र असतो.
किती हा मनाचा मोठेपणा, याला म्हणतात देवाच्या चरणी मुल होऊन राहणं 🙏🏻🙏🏻🙏🏻

साधारण चार एक वर्षांपूर्वी माझ्या आईने सौ वंदना ताईंचा गीता वर्ग जॉईन केला आणि वर्षभरातच तिची सातशे शलोकांची संपूर्ण संस्कृत गीता कंठस्थ करून झाली. खरंतर वयाच्या साधारण १२-१३व्या वर्षापासून तिची गीता पाठ होतीच परंतु तिने लहानपणीच तोंडात बसलेले सर्व उच्चार पुसून टाकून पाणिनी व्याकरणाप्रमाणे शिकवलेले उच्चार करून पुन्हा गीता नव्याने पूर्ण पाठ केली. तेव्हापासून तिच्या मनात होतच की तिच्या तीनही नातवंडांनी देखील गीता पाठ करावी आणि म्हटल्याप्रमाणे ती कामाला लागली देखील, तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आणि मुलींच्या चिकाटीमुळे उत्साहामुळे माझ्या दोन्ही मुलींची आज संपूर्ण ७०० श्लोकांची संस्कृत मधील गीता पाठ झाली आहे.

22 मार्च 2020 च्या लॉकडाऊन पासून त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली आणि साधारण 23 महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची संपूर्ण गीता पाठ झाली.
एप्रिलमध्ये बाईंनी दोघींचा शृंगेरी येथे जाण्यासाठी फॉर्म भरला आणि आजी सोबत त्यांचा नियमित सराव सुरूच राहिला.
अचानक वीस नोव्हेंबरला बाईंचा मेसेज आला की आपल्या क्लासच्या १८ विद्यार्थ्यांचे शृंगेरी येथे शंकराचार्यांसमोर परीक्षा देण्यासाठी नंबर लागले आहेत.
त्यापैकी भैरवी, वेदश्री, लिमये काका, केळकर काका, मिहीर आणि त्याचे आजोबा म्हणजे पित्रे काका या सहा जणांना २९ जानेवारी २०२३ हा रविवार मिळाला आणि एकच धूम उडाली.
सगळ्यात पहिले लिमये काकांनी आम्हा सर्वांचे शृंगेरी येथे जाण्याचे बुकिंग केले, त्यानंतर सतत नऊ आठवडे दर बुधवारी आमच्या ग्रुपची प्रॅक्टिस सुरू झाली.
पहिले आठ बुधवार Shenoy काकूंनी आणि शेवटचा बुधवार बाईंनी प्रॅक्टिस घेतली.
शृंगेरी पोहोचल्यापासून परीक्षेच्या निकालापर्यंत कसं कसं काय काय करायचं, कोणत्या पद्धतीचा पारंपारिक पोशाख घालायचा, शंकराचार्यांसमोर कशा पद्धतीने नमस्कार करायचा, काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे हे सर्व सांगितले.
27 जानेवारीला आम्ही निघालो आणि 28 जानेवारीला उडूपी येथे पोहोचलो, तिथून ट्रॅव्हलर बसने शृंगेरी मठात गेलो.
तिथे त्यांच्याच भक्तनिवास मध्ये परीक्षेला आलेल्या सहा विद्यार्थ्यांना सहा रूम्स मठातर्फेस मिळतात, दोन रात्रीचे वास्तव्य त्यांच्यातर्फे मिळते.
गेलो त्या दिवशी सर्वात पहिले शारदा मंदिरात शारदामातेचे दर्शन घेतले, प्रसादाचे सात्विक भोजन केले.
ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसमध्ये परीक्षेचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट सबमिशन झाले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जानेवारीला दुपारी दोनची परीक्षेसाठी वेळ मिळाली, तसतसं सगळ्यांच्याच मनावरचं दडपण वाढू लागलं,
28 तारीख ला दुपारी आणि 29 ला सकाळी last day revision जशी करतात तसा ग्रुप सराव झाला आणि सगळे परीक्षेला सज्ज झाले.

शारदा मंदिर परिसराच्या पलीकडे तुंगा नदीवरील पूल ओलांडून शंकराचार्यांच्या निवासस्थान परिसरात परीक्षेसाठी नेले जाते आणि सोबत गेलेल्यांना संध्याकाळी पाच वाजल्यानंतर दर्शनासाठी एंट्री मिळते.
जसजसा घड्याळाचा काटा पुढे जाऊ लागला तसतशी हुरहुर वाढत होती, कधी परीक्षा होणार, कशी झाली असेल परीक्षा, आपण आत कधी जाणार, खुद्द शंकराचार्यांसमोर कशी परीक्षा होणार, ती बघायला मिळणार का, त्याचा निकाल काय लागणार असे असंख्य प्रश्न मनात येत होते.
अखेरीस पाच सव्वा पाच च्या सुमारास आम्ही आत गेलो, अतिशय निसर्गरम्य अशा सकारात्मक आणि प्रसन्न ऊर्जा देणाऱ्या त्या परिसरात जाऊन पोहोचलो.
एका वेगळ्याच विश्वात पोहोचण्याचा आस्वाद घेत होतो, सहज फिरताना दिसणारे हत्ती हरणे बघून आनंदून गेलो आणि जगद्गुरु शंकराचार्य यांच्या दर्शन सभागृहात जाऊन बसलो.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका जगन्नाथ पुरी, शृंगेरी आणि बद्रिकेदार अशी चार पिठे निर्माण केली आहेत. त्यातील शृंगेरी पिठाचे आत्ताचे पिठासीन जगद्गुरु शंकराचार्य यांच्यासमोर आमच्या ह्या सहा विद्यार्थ्यांची क्रमाक्रमाने बोलावून शेवटची परीक्षा झाली.
७०० श्लोकांपैकी कोणत्याही एका श्लोकापासून ते सुरुवात करण्यास सांगतात आणि ते थांब म्हणेपर्यंत विद्यार्थ्याने श्लोक म्हणत राहायचे.
ते बघणे हा एक भन्नाट अनुभव होता, खुद्द शंकराचार्य खूप तल्लीन होऊन मान डोलावून अतिशय आस्वाद घेत गीता म्हणून घेत होते.
या सहाही जणांनी अगदी कॉन्फिडंटली, स्पष्ट, खणखणीत आवाजात, न चुकता गीता म्हणून दाखवली. सर्वांना आशीर्वाद मिळाला.
फायनल एक्झाम पार पडली, सगळेजण उत्तमरित्या उत्तीर्ण झाले.
याची देही याची डोळा साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांना बघणे, त्यांच्यासमोर होणारी ही परीक्षा अनुभवणे हा सगळा अनुभव काहीतरी अद्भूतच होता.
आम्ही सगळे एकीकडे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा, अंगावर आलेला काटा आणि होणारा आनंद अशा वेगळ्याच मानसिक अवस्थेतून जात होतो.
काहीतरी गेल्या जन्मीची जबरदस्त पुण्याई असेल की ह्या सगळ्याचा योग या जन्मी जुळून आला.

मुलींची दोन वर्षाची मेहनत, आजीची प्रचंड इच्छाशक्ती, बाईंचे मार्गदर्शन, सर्व मित्र परिवाराच्या सदिच्छा या सगळ्यांमुळे हा अमृतानुभव मिळाला. वंदनाताई, लिमये काका काकू, केळकर काका काकू, पित्रे फॅमिली, Shenoy काकू, चारुशीला काकू असा हा एक नवा परिवारच आम्हाला मिळाला.
या सर्वांचा आयुष्यात सहवास लाभणं हा एक पुण्यसंचयच आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा हा वारसा असाच पुढे नेण्याचे कार्य आपल्या हातून होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
सौ. मानसी निखिलेश गोडबोले.

संस्कारांचा खजिना | आमचा मोदगी वाडा

मोदगी वाडा

आमच्या मोदगी वाड्याबद्दल किती आणि काय काय सांगू!

माझे पणजोबा म्हणजे विष्णु सदाशिव मोदगी (नाना) यांनी १९१९ साली मूळ मालक चौबळ यांच्याकडून ठाणे येथील मध्यवस्तीत जुना मुंबई रस्ता, आत्ताचा वीर सावरकर पथ येथे हा वाडा विकत घेतला. नाना स्वतः वकील. उत्तम शिक्षण, कर्तबगारी, मेहनत आणि प्रामाणिकपणा या गोष्टी अंगी असल्या की आयुष्य संपन्न होत जातं बघा. नाना आणि वहिनी (त्यांची पत्नी म्हणजे माझी पणजी आजी लक्ष्मी मोदगी) यांच्या छत्रछायेत वसंत, वासुदेव, दिगंबर, दिनकर आणि विश्वनाथ ही पाच मुले आणि विमल, कुसुम या दोन मुली पुढे त्यांच्या मावळणकर, उपाध्ये, पिटकर,गाडगीळ आणि वाविकर घरातून आलेल्या सूना आणि जोशी आणि कुलकर्णी हे जावई असे पुढील पिढीतील संसार फुलत गेले. ही सगळी झाली माझ्या आजोबा आणि आजी यांची पिढी.

सासू आणि पाच सुना या १३ खोल्यांच्या आमच्या वाड्यात एकाच घरात आनंदाने नांदल्या, एका चुलीवर प्रसन्न मनाने रांधल्या. आमच्या या वाड्यावर जणू अन्नपूर्णेचा वरदहस्त होता. माजघराच्या बाजूला धान्य साठवण्याच्या दोन खोल्या,स्वयंपाक घरात दूध दही लोणी यांचे भिंतीमध्ये जाळीचा दरवाजा असलेले फडताळ, वरच्या माळ्यावर लोणची मुरांबे हे साठवणीचे पदार्थ ठेवलेल्या बरण्या, माडीवर चढून गेले की डाव्या बाजूला साठवणीचे हळद तिखट इतर मसाले पापड असं सर्व धनधान्यांनी परिपूर्ण असं मोदग्यांच घर. घर नुसतच धनधान्यांनी भरलेलं आणि संपन्न असून चालत नाही, तर मनाचा मोठेपणा, आल्यागेल्या पै-पाहुण्यांचे अगत्य, वडीलधाऱ्यांनी विषयी आदर, त्यांच्या शब्दाला मान, घरातल्या घरातच नव्हे तर कोणातच कधीही आप-पर भावाने न वागणे, सगळ्यांना सामावून घेऊन मिसळून राहणे हे या वाड्यातील संस्कार! त्यामुळेच तर कुरबुरी न होता आणि भांड्यांचा आवाजही न येता पाचही जावा मायेने एकत्र राहिल्या.

त्यानंतर माझ्या आईची पिढी म्हणजे ह्या मोदगी वाड्याच्या वास्तूत फुललेली तिसरी पिढी. पाच जावांची मिळून एकूण बारा मुलं. सहा बहिणी-सहा भाऊ. खरतर एकमेकांची चुलत भावंडं पण सख्ख्याहूनही सख्खी, जीवाला जीव देणारी. पुढे त्यात दुधात जशी साखर मिसळून जावी तशा आल्या सहा सुना (वाघ,शेवडे, राहतेकर, दिघे, आगाशे, नवरे) आणि सहा जावई (साठे, महाजन, साने,वैद्य, धर्म, देशपांडे). सगळेच मोदगी मुळातच हुशार, सुस्वभावी, माणूस म्हणून उत्तम घडलेले आणि प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक. त्यामुळे अर्थातच उच्चशिक्षित, आपल्या आपल्या क्षेत्रात छान प्रगती केलेली ही पिढी.

सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणतात ना तर सुख म्हणजे मोदगी नावाचा, मोदगी वाड्याचा, पूर्व पिढ्यांच्या संस्कारांच्या वारस्याचा आपण स्वतः एक अंश असणं. तसं पाहिलं तर हा मोदगी वाडा म्हणजे माझं आजोळ आणि त्यामुळेच मनाचा अजून जवळचा आणि अगदी हळुवार कोपरा!

वाड्याचा दिंडी दरवाजा म्हणजे साठे चौबळ आणि मोदगी या तिन्ही वाड्यांमध्ये शिरायचा मुख्य दरवाजा. इथून सरळ आत आले की मागील दारी आणि विहिरीवर जाता येत असे. मागील दारी स्वयंपाक घरातून दार उघडत असे, पण बाहेरून येण्या-जाण्यासाठी मेन रोडवर उघडणारा ओटी वरचा दरवाजा जास्त वापरला जाई. ओटीवरून आत गेले की दारावर चौकटीत कोरलेला गणपती हे सगळ्यांचे श्रद्धास्थान, माजघरात झोपाळा, आजोबांची कामाला बसायची जागा, हिशोबाची पेटी, एका बाजूला बाळंतिणीची खोली आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर. स्वयंपाक घर म्हणजे आजीच्या मायेचं आणि खाऊचं साम्राज्य. माजघरातून मधोमध वरती जाण्यासाठी जिना. तिकडे दिवाणखाना आणि इतर खोल्या यामध्ये सर्व आजोबांचे आणि पुढे जाऊन मामांचे फुललेले संसार आणि सगळ्यात वरती माळा अशीही तेरा खोल्यांची ही वास्तु. स्वयंपाक घरातून उघडलेल्या मागील दारी भांडी घासायची जागा, परसदारी असलेली दगडी उखळ, मोठा पाण्याचा बंब (तो कधीही रिकामा ठेवायचा नाही) विहिरीवरून पाणी काढले (की ते कधीही बादली रिकामी ठेवायची नाही असे अलिखित नियमच जणू) पुरुषांची आंघोळीची जागा, बायकांसाठी वेगळे न्हाणीघर, पलीकडे म्हशीचा गोठा, त्याच्या मागेच टोपलीचा संडास (नंतर पक्का बांधून घेतला). असा हा आमचा आखीव-रेखीव मोदगी वाडा!

ह्या वाड्यात राहणारी आमची १७ भावंडांची चौथी पिढी. बालपणाची काही वर्ष या वाड्यात आम्ही मनसोक्त जगलो. एखादी सुसंस्कारित वास्तू आपल्या आयुष्यात आपल्याला किती आणि काय काय देऊन जाते हे खरे तर शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तो अनुभव ज्यांना भरभरून जगायला मिळाला असे आम्ही सर्वजण नक्कीच खूपच नशीबवान आहोत!

असा हा सर्वार्थाने परिपूर्ण असा आमचा मोदगी वाडा!

सौ मानसी निखिलेश गोडबोले

मन संवाद | ३, ४ श्लोक

मनाचे श्लोक ३

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

जगात जे जे चांगलं आहे ते राम तत्त्व आहे
संकल्प चांगला विचार चांगला तर आयुष्य चांगलं

आपण रात्री झोपतो तेव्हा ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी carry केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विचारापासून नवीन दिवसाला सुरुवात होते असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा कुठच्याही प्रहरी वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
रात्री झोपताना राम नाम घेतले तर दिवसा आपसूकच रामनामाने सुरुवात होईल.

‘पुढे वैखरी राम आधी वदावा’
म्हणजे काय?
तर वैखरी म्हणजे जिभेचे टोक,
ह्या जिभेच्या टोकावर सतत जर राम नाम म्हणजेच राम तत्त्व म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगले विचार, चांगली भाषा असेल तर प्रत्येक आचरण हे कायम सदाचरणच होईल.

मनाचे श्लोक ४

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे |
मना धर्मता नीति सोडू नको हो |
मना अंतरी सार विचार राहो || ४ ||

आता याचा अर्थ बघताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
एक बाजू राम आहे
तर दुसरी बाजू रावण,
संकल्प म्हणजे राम
विकल्प म्हणजे रावण,
सद्बुद्धी म्हणजे राम
कुबुद्धी म्हणजे रावण.

आजूबाजूला जेव्हा कोणतीही घटना घडते, चांगली अथवा वाईट
त्याचा पहिला आघात हा मनावर होतो. त्यामुळे त्या मनाला स्थिर करा.

अशांत मन काय करते,
वाईट विचार करते, त्यामुळे कर्म देखील वाईट होते.
परंतू मन शांत असेल तर चांगला विचार करेल आणि कृतीदेखील योग्य म्हणजे चांगलीच होईल.

मनामध्ये पापबुद्धी जागृत होऊ नये, त्याने ethics सोडून म्हणजे नीतिमत्ता सोडून वागू नये आणि सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावा हे मनाला सतत सांगावे.
आणि आपल्या अंतरात राम-तत्त्वानेसारासार विचार करावा.

पालकत्व

पालकत्व

आई-बाबा होणे हे एक वेळ सोपे आहे मुलांचे पालक होणे हे तितकेच कठीण आणि आव्हानात्मक आहे. #मा_आ_वि #पालकत्व #नाते #मैत्री

चांगले पालक होण्यासाठी कोणतीही शाळा नाही, नियमावली नाही, कोणीही आदर्श नाही, कारण प्रत्येक पालक आणि त्यांचे मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. बाळाच्या जन्मापासूनच आई-वडील उत्तम पालक होण्याचा प्रयत्न सुरू करतात. घरातल्या वडीलधाऱ्यांचा अनुभव, आपल्या वयाच्या मित्र-मैत्रिणींचे अनुभव, इंटरनेटवर उपलब्ध माहिती यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. एवढी सगळी तयारी करून प्रत्यक्ष मुलाचा स्वभाव, विचार करणे, त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत याचा अंदाज घेत घेत तेही मुलांकडून शिकत शिकत त्यांना चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी झटत असतात आणि आपली भूमिका निभावत असतात.

आई-वडील किंवा पालक म्हणून काय करणे अपेक्षित आहे हो?

तर मुलांचे शारीरिक, मानसिक भावनिक संरक्षण संवर्धन आणि वाढ यावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अचानक येणाऱ्या संकटांसाठी आणि समृद्ध भविष्यासाठी तरतूद हे सर्वच ह्यात येते. पण तेवढेच पुरेसे नसतं. त्या त्या वयात किंवा वाढीच्या टप्प्यावर म्हणजे अर्भक शिशु बाल्य बालक विद्यार्थी पौगंडावस्थेतून मग तारुण्य या सगळ्या वाळणांवर पालकांची भूमिका ही बदलती असली पाहिजे. त्या त्या अवस्थेच्या गरजा ओळखून त्यांनी वागले पाहिजे.

अगदी सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये मुलांचं मन इंद्रिय मेंदू हे प्रचंड संस्कारक्षम असतात. आजूबाजूला घडणाऱ्या लहानसहान गोष्टी ते अचूक टिपत असतात, त्यातूनच ते खूप काही नकळत शिकत असतात. घरच्या मोठ्या माणसांचे एकमेकांशी वागणे बोलणे ते पाहतात तेव्हा घरात जे वातावरण त्यांना मिळते त्यावर त्यांच्या जडणघडणीचा पाया रचला जातो. एकाच घरात मुलगा-मुलगी यात भेद न करणे, लाडका-दोडका ही वागणूक न देणे, मुलगा आहे म्हणून विशेष वागणूक न देणे, मुलगा असला तरी घर कामात प्रवृत्त करणे, घरातील महिलांना मग ती घरीच असो किंवा कमावणारी, तिला आदराने, सारखे पणाने, सन्मानाने वागवणे या सर्व गोष्टी घरातल्या इतर मंडळींनी पाळल्या तर ते मूलही आपोआपच शिकेल तसं वागायला. कारण ते वयच आहे तसं, मुलं प्रचंड निरीक्षण करून आणि बारकाईने आपल्या गोष्टी न्याहाळत असतात. तेव्हा पर्यायाने आपली जबाबदारी वाढते. आपली प्रत्येक कृती त्यांच्या मनावर संस्कार घडवत असते. चांगलं वागणं, नीट बोलणं, पावित्र्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, स्नेह, बुद्धीचा योग्य वापर असे एक ना अनेक सद्गुण वाढीस लागण्यासाठी आधी पालकांनी तसे वर्तन केले पाहिजे. या सगळ्यातून एक चांगली व्यक्ती तर घडेलच पण त्याच बरोबर समाजाच्या प्रति जागरूकता, पर्यावरणाविषयी प्रेम आणि देशासाठी प्रचंड अभिमान हेदेखील त्यांच्या मनात रूजले पाहिजे.

पैशांची, वस्तूंची आणि मुख्य म्हणजे माणसांची किंमत कळली पाहिजे. कधी मुलांच्या हातून एखादी चूक घडली तरी प्रेमापोटी विसरून जावं, पण कटाक्षाने ती चूक परत होणार नाही यावर लक्ष द्यावं आणि तशी समज देखील द्यावी. एका टप्प्यावर आई-वडील हे मुलांचे जणू मित्र होतात, त्यांच्यात वेगळेच नाते निर्माण होते. ह्या आदरयुक्त मैत्रीत थोडा धाक आणि काही लिमिट मात्र हवेत. या काळात नातं मैत्रीचं असावं, पण पालकांचे वागणे पारदर्शी असावं. त्यामुळे मुलं आपोआप शहाणी होतात. मुलांच्या चुकीची जाणीव करून द्यायचा आणि त्यांच्या चांगल्या कामाबद्दल शाबासकी द्यायचा हा काळ. मुलांना आई-वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे असा हा काळ आणि मग ह्या आदरयुक्त प्रेमातून मुलं आपल्या पालकांना आदर्श मानून लागतात.

हळूहळू उच्च शिक्षणाचे महत्त्व, योग्य करिअरची निवड, त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी, धडपड करण्याची तयारी, अपयश पचवण्याचे धैर्य आणि फायनल गोल साध्य करण्याचे बळ यातूनच नवी पिढी घडते. सुजाण पालक नक्कीच सुजाण नागरिक घडवतात.

तेव्हा नव-पालकांनो – सजग राहा, सतर्क राहा.
नवीन पिढीसमोर सोशल मीडिया, इंटरनेट ऍक्सॅसिबिलिटी, फ्रीडम, following, followers अशी खूप प्रलोभनं आहेत. खूप लहान वयात गरजेपेक्षा जास्त पुढे जाऊन वागणारी ही पिढी आहे. शारीरिक आकर्षण, व्यसनांची चटक, चुकीची संगत, करियर इंसेक्युरिटी, अपयश पचवण्याची क्षमता कदाचित नसणे असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आहेत. या सगळ्यातून सावरण्यासाठी भावनिक मैत्रीपूर्ण नाते संबंध असावेत. फॅमिली लाईफ, फ्रेंड सर्कल असावे, नात्यांचे मोल जाणलेच पाहिजे, प्रत्येकातलं चांगलं घेता आलं पाहिजे, आनंदी-सुखी जीवन जगता आलं पाहिजे, चारित्र्य जपून नीतिमत्तांचं काटेकोर पालन करून समृद्ध होता पाहिजे.

यासाठी पालक निर्व्यसनी, निर्लोभी, निष्कलंक असावेत. तरच निकोप संतती निपजली जाईल. #मा_आ_वि #पालकत्व #नाते

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ॥

सुभाषित

वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलाचे लाड करावे. पुढची दहा वर्षे तिला/त्याला (शिस्त लागावी म्हणून) मारावे (शाब्दिक चालेल, चाबकाने फोडायची गरज नाही). मुल सोळा वर्षांचे झाल्यावर (म्हणजे वयात आल्यावर, कर्तासवरता झाल्यावर, बापाचं पायताण मुलाला यायला लागल्यावर व. व.) त्यांच्याशी मैत्री करावी (त्याला बरोबरीने वागवावे)

मनसंवाद | १, २ श्लोक

मनाचे श्लोक हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी स्पर्धेसाठी पाठांतर म्हणून शिकलेच आहेत. आता शिकूया जगण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी,नव्या पिढीला मनाने खंबीर बनवण्यासाठी.

तुमच्यापैकी अनेक जणांनी कदाचित श्री.समीर लिमये हे नाव ऐकले असेल. त्यांचा “कॉर्पोरेट कीर्तन” हा कार्यक्रम फारच सुंदर आहे. नवीन पिढीच्या भाषेत ते खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्री समर्थ रामदासांचे विचार – कार्य आणि दासबोध आणि मनाचे श्लोक ह्याचे माहात्म्य खुलवून सांगतात. त्यातून त्यांनी मनाच्या श्लोकांचा अर्थ फारच सुंदर आणि सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यांचा YouTube चॅनल आहे.

मी त्यांच्याच ‘ मनकीर्तन ‘ ह्या युट्यूब सिरीजचा लॉक डाउनच्या काळात अनुभव घेतला. त्यानंतर त्यावर थोडासा वाचन, मनन, चिंतन करून मला उमगलेला अर्थ मी इकडे मांडणार आहे.

श्लोक १ ला

गणाधीश जो ईश सर्व गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ अनंत या राघवाचा ।। १ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक १
मनाचे श्लोक १

गणपती म्हणजे बुद्धीची देवता आणि शारदा म्हणजे वाचा. सर्व गुणांचा अधिष्ठाता गणपती आणि आपली वाणी म्हणजे शारदा देवी ह्या दोघांमुळे आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट जेव्हा समोरच्याला सांगतो तेव्हा त्याला ती grasp होते म्हणजेच समजते ती बुद्धीची देवता गणपतीमुळे आणि आपण बोलू शकतो म्हणजे आपली वाचा ती आहे शारदा देवीमुळे.

अश्या ह्या गणेशाला आणि शारदेला श्री समर्थांनी पहिल्या श्लोकातून वंदन केले आहे. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #१

श्लोक २ रा

मना सज्जना भक्ती पंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।। २ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक २
मनाचे श्लोक २

ह्या श्लोकात समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की ” हे मना, तू सज्जन हो.” म्हणजे केवळ चांगले आणि चांगलेच विचार कर. जेणेकरून मनातील negativity म्हणजेच नकारात्मकता दूर होऊन सतत positivity म्हणजेच सकारात्मकता राहील.
तुझी वागणूक नेहेमी अशी ठेव की जी जगाकडून नावाजली जाईल, कोणतेही कार्य प्रसन्न मनानेच आणि प्रामाणिकपणे कर. कधीही निंदनीय किंवा अयोग्य असे आचरण करू नकोस.

निर्मळ मनाने ईश्वरभक्ती करत राहा म्हणजे ‘श्रीहरी’ तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होईल. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #२

क्रमशः

मनसंवाद | प्रस्तावना

मनाचे श्लोक याद्वारे मनाशी संवाद
मन संवाद

आपण ज्या युगात आज जगत आहोत, त्यात येणाऱ्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी जर आपल्याला कशाची आवश्यकता असेल तर ती खंबीर मनाची आणि मन संवादाची. आपल्या या अत्यंत चंचल अशा मनावर संस्कार घडवून त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आणि कणखर बनवून आपल्या तसेच पुढील पिढीला सक्षम बनवण्यासाठी श्रीसमर्थ रामदासांनी २०५ मनाचे श्लोक रचले आहेत.

हे मनाचे श्लोक दुसऱ्यांना उद्देशून सांगावयाचें नसून स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहेत. #मा_आ_वि, #मनाचे_श्लोक

हे लक्षात घेऊन आणि त्याचा अर्थ समजून जेव्हा वाचतो तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. समर्थांनी या सुंदर अशा मनाच्या श्लोकांतून भिरभिरणाऱ्या मनाला वरचेवर जागेवर आणण्यासाठी राम नाम हा सर्वार्थाने एकच उपाय असे सांगितले आहे.

जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःसोबत भय, भ्रम आणि संशय घेऊन जन्माला येतो आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण बनते. आपण कमवलेले नावलौकिक, संपत्ती तसेच आपल्या अंगी असलेले कर्तृत्व, बुद्धिमता, सौंदर्य ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मानतो किंवा आपण कमावलेल्या आहेत असा आपल्याला भ्रम असतो. कधी कधी तर ह्या गोष्टींचा गर्व होतो, जो आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो. हे सर्व माझे आहे या भ्रमातून मग भय निर्माण होते. भर्तृहरि यांनी नीती शतकं मध्ये सांगितले आहे:

भोग रोगभयं कुले च्यूतिभयं वित्ते नृपालाद् भयं
माने दैन्यभयं बले रिपुभर्य रूपे जरायाः भयम्
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद् भयं
सर्व वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम्

भर्तृहरि, नीति शतक

प्रत्येक गोष्टीला कशाचे तरी भय असते, जसे श्रीमंताला संपत्ती नाशाचे, बुद्धिवानाला आपल्यापेक्षा विद्वांनांसमोर हरण्याचे, सुंदर स्त्रीला वृद्धत्वाचे. मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात पण यातले काहीच आपले नसते. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा कर्ताकरविता असतो तो फक्त राम, आपण फक्त निमित्तमात्र असतो.

याचे मला सुचलेले उदाहरण: न्यूटनने सफरचंद पडतांना पाहिले तेव्हा त्याला कळले की गुरुत्वाकर्षण या पृथ्वीच्या शक्तीमुळे ते घडते परंतु यापूर्वी सफरचंद झाडावरून पडत नव्हते का हो? परंतु या घटनेमागचे कारण समजावण्याची दृष्टी होती न्यूटनकडे. ही दृष्टी त्याला कोणी दिली? तर भगवंताने. त्या रामानेच. तो स्वतः माणसांना सिलेक्ट करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम करवून घेत असतो.

आपलं मन, भय आणि भ्रम यांच्यापाठोपाठ आपल्याला घेऊन जातं ते संशय या अजून एका प्रवृत्तीकडे. आणि मनात एकदा कोणत्याही गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी संशय भरला की मग वाट चुकतेच विचारांची. हे जे भय, भ्रम आणि संशय यांच्यात गुरफटलेलं आपलं मन आहे त्याला योग्य दिशा देणारे असे हे समर्थ रामदासांनी रचलेले मनाचे श्लोक. ह्या २०५ श्लोकांमधून त्यांनी मनासोबत संवाद साधला आहे.

आपण पहिल्या दहा श्लोकांचा थोड्या-थोड्या टप्प्याने अर्थ पाहणार आहोत.
(क्रमशः)

रामरक्षा

रामरक्षा

रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु “स्वानुभव” ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

– रामरक्षा स्तोत्र

हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. (पूर्ण रामरक्षा येथे मांडली आहे किंवा विकिपीडियावर ही सापडेल)

घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा,
कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,
प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा,
रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा,
पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा…

कुठल्याही संकटात असाल,
फारच निगेटिव वाटतंय,
आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,
रडायला येतंय,
एकटं वाटतंय,

रामरक्षा म्हणा…

कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणार नाहीत..आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण विज्ञानवर असेल तोच रामरक्षेवर ठेवा.

मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही.

पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.

तुम्हाला रामरक्षा म्हणून काही अनुभव आला आहे का?

प्रत्येकाला अनुभव येईलच असे नाही आणि आला तरी तो पूर्ण जाणवेल असे नाही. पण जेव्हा अनुभव येतो आणि जाणवतो तो आंतरिक शक्ति देऊन जातो. असा अनुभव खाली कमेन्ट मध्ये नक्की लिहा

।। श्रीराम जय राम जय जय राम।।

@सौ मानसी निखिलेश गोडबोले

आयुष्याची शाळा

प्रश्न: शिक्षण म्हणजे काय?
शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, जी माणसाच्या जन्मापासून सुरू होते, ती अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते.खरंतर जन्मापासून म्हणजे आईच्या उदरात असताना पासूनच बर का. आईच्या उदरात जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हापासून आई जे अन्नसेवन करते त्यावर तो वाढायला लागतो. तिचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती, तिची मनस्थिती, तिचं वागणं, बोलणं, विचार करणं ह्या सगळ्याचे नकळतपणे त्याच्यावर संस्कार होत असतात.

पुढे जसजसे बाहेरच्या जगात आपण जातो अनुवंशिकतेने आलेले स्वभावगुण, आईची शिकवण, गुरूंकडून लाभलेले शालेय शिक्षण, व्यवहारज्ञान, सामाजिक बांधिलकीची जाणीव, देशाविषयी प्रेम, एक सुजाण नागरिक म्हणून असलेली जबाबदारी हे हळूहळू आपण आत्मसात करत जातो. शिकत जातो. 

त्याचप्रमाणे कुटुंबाचा एक घटक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता आणि कोणत्याही कामाविषयी कमीपणा न वाटून घेता, संसाराची जबाबदारी पार पाडायला शिकतो. 
हे सर्व आपण आपल्या आईवडिलांकडून आणि घरातील इतर वडीलधाऱ्यांकडून शिकत असतो,कसं वागावं हे जसं समजणं गरजेचं आहे, त्याच प्रमाणे कसं वागू नये हे देखील समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. 

आपल्याला येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवातून आपण शिकत असतो. कधीकधी अपयश येतं, ते तर खूप काही शिकवून जातं, कधी मानसिक तणाव तर कधी शारीरिक दुखणे, ह्यातूनही बाहेर पडता आलं पाहिजे.

कधी आर्थिक संकट येतं, त्यातही खचून नाही गेलं पाहिजे.हे सगळे प्रसंग खूप काही देउन जातात. त्यातलं चांगलं ते घ्यावं. (आर्थिक संकट खूप लोकांचे खरे चेहरे दाखवून जातात बर का!)  ह्या सर्व घडामोडींना तोंड देण्यासाठी गरज असते ती मनाच्या खंबीरपणाची. त्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे देवावर असलेली श्रद्धा. 

या परमेश्वराच्या चरणी सतत मूल होऊन राहावं. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानावेत, आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवापाशी कृतज्ञता राखावी, कारण तो ‘ सर्वदा कर्ता ‘ आहे आणि ही भावना एकदा मनात घट्ट रुजली की अहंकार जडत नाही.मग तो रूप, शिक्षण, पैसा, बुद्धी कशाचाही असो.

हीच तर खरी आयुष्य नावाची शाळा, जिथे माणूस सतत शिकत असतो आणि शिकताशिकता घडत असतो.

@Mrs. Manasi Nikhilesh Godbole. (Ku. Bharati Bhaskar Sathe)

गीता सार

प्रत्येक हिंदूला “श्रीमद् भगवतगीते”च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.

ॐ . कुणी कुणाला सांगितली..???
उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

ॐ . कधी सांगितली ???
उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
उ.- रविवार च्या दिवशी…

ॐ. कोणत्या तिथि ला ???
उ.- एकादशी

ॐ. कुठे सांगितली…???
उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर…

ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..???
उ.- ४५ मिनीटे..

ॐ. का सांगितली…???
उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

ॐ. किती अध्याय आहेत?
उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

ॐ. किती श्लोक आहेत?
उ.- ७०० श्लोक

ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???
उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
उ.- भगवान सूर्यदेवला..

ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
उ.- उपनिषदां मध्ये..

ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे…

ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे…???
उ.- गीतोपनिषद

ॐ. गीतेचे सार काय आहे.. ???
उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
अर्जुना ने- ८५
धृतराष्ट्र ने- १
संजय ने- ४०
एकूण = ७००

एक हिंदू या नात्याने आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी भगवतगीता वाचावी.

collected by — Mrs. Aparnaa Paranjape