माझ्या आठवणींची सुरुवात एका छोट्या घरातून होते. लोकमान्य आळी, चरई, ठाणे — आपटे वाडा. बाबांनी नुकतेच घेतलेले छोटेसे नवीन घर. मी तीन-चार वर्षांचा असेन. त्या घराच्या भिंतीत माझ्या बालपणीच्या असंख्य आठवणी आहे. आणि त्या सर्वमध्ये एक ठळक आठवण आहे — ऑगस्ट महिन्यातल्या सत्यनारायण पूजेची.
दर ऑगस्ट, वीस-पंचवीस वर्षे
आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा हा वार्षिक कार्यक्रम होता. दर ऑगस्ट महिन्यात. सलग वीस-पंचवीस वर्षे. आदल्या दिवसापासून घरात लगबग सुरू व्हायची. आई पहाटे लवकर उठून सर्व तयारी करीत असे मुख्य पदार्थ – सव्वा मापाने रवा, तूप, साखर, दूध यांचा शिरा – जो प्रसाद म्हणून केलेल्याची चव दिव्य पदार्थ खालल्यासारखी कायमची जिभेवर राहते. बाबा चौरंग मांडायचे, तांब्यावर आंब्याचा डहाळा ठेवायचे.
आणि मी बाजूला बसून बघत असे.
काय बोलले जाते आहे ते कळत नव्हते. “श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया…” — हे शब्द माझ्यासाठी नुसता नाद होता. अर्थ नव्हता.
पण त्या नादात काहीतरी होते. आई-बाबांचा आवाज त्या दिवशी वेगळा वाटायचा — जास्त शांत, जास्त खोल. जणू ते कोणाशी तरी बोलत आहेत, आणि ते कोणीतरी खरोखर ऐकते आहे. गुरुजी येऊन पूजा करवून घेत असत. कथा वाचली जायची. साधुवाणी, कलावती, अंगध्वज राजा. मला ती परिकथेसारखी वाटायची.
आणि शेवटी प्रसाद — तो शिरा. आजही त्याचा वास आठवला की आपटे वाड्यातले ते संपूर्ण दृश्य जसेच्या तसे समोर उभे राहते.
त्या वयात मला एकच गोष्ट पक्की कळली होती — या दिवशी आपल्या घरात काहीतरी पवित्र घडते आहे.
मुंज, आणि हातात आलेली पळी
मी दहा वर्षांचा असताना माझी मुंज झाली. आणि त्यानंतरच्या पूजेत बाबांनी माझ्या हातात पळी, भांडे आणि ताम्हण दिले. तो क्षण किती मोठा होता, हे तेव्हा कळले नव्हते. आज कळते. कारण त्या क्षणी नुसती भांडी हातात आली नव्हती — एक जबाबदारी हस्तांतरित झाली होती. आणि सोबत एक भीतीही आली: आपण चुकलो तर?
आई बाजूला बसून सांगत राहायचे.
“आता गंध लाव.”
“आता तुळशीपत्र.”
“अरे, ते डाव्या हाताने नाही.”
चुका व्हायच्या. दुरुस्त व्हायच्या. आणि वर्षानुवर्षे ते सर्व हळूहळू अंगात मुरत गेले. ही आपली शिकवण्याची पद्धत होती — पाहून, चुकून, पुन्हा करून. पुस्तक नव्हते. YouTube नव्हते. फक्त आधीच्या पिढीची उपस्थिती होती.
सिंगापूर — आणि धागा तुटण्याची भीती
वयाच्या तिशी-पस्तिशीत सिंगापूरला स्थलांतर झाले. जन्मभूमी ठाणे. कर्मभूमी सिंगापूर. इथे आल्यावर पहिल्या वर्षीच लक्षात आले की एक गोष्ट मागे राहिली आहे — ती उपस्थिती. पूजा करायची तर कोणाला विचारायचे? आई-बाबा फोनवर आहेत, पण दर मिनिटाला फोन करता येत नाही. पण इथे एक गोष्ट सांगायलाच हवी — आई-बाबांनी हा धागा तुटू दिला नाही.
त्यांचे प्रोत्साहन, त्यांची मदत, आणि दरवर्षी “पूजा केलीस ना?” हा प्रेमळ आग्रह — यामुळेच परदेशातही ही परंपरा अखंड राहिली.
संपूर्ण चातुर्मास, आणि फोनवरचे पंचांग
सिंगापूरमधल्या पूजेची सिद्धता दोन गोष्टींवर उभी असायची: पहिली — “संपूर्ण चातुर्मास” हे पुस्तक. त्यातले सर्व मंत्र, सर्व विधी. ते पुस्तक म्हणजे माझा आधार. दुसरी — आईचा फोन. आई पंचांग पाहायची. तिथी, नक्षत्र, मुहूर्त काढून द्यायची. फोनवरून सांगायची — “यंदा या तारखेला कर, त्या दिवशी योग चांगला आहे.”
हजारो किलोमीटर दूर असूनही, आईच पूजेचा मुहूर्त ठरवायची.
आणि आजही — २०२६ मध्ये, सर्व तंत्रज्ञान हाताशी असूनही — मुहूर्तासाठी मी आईलाच विचारतो. पंचांग वाचण्याची तिची पद्धत, तिचा अनुभव — याला पर्याय नाही.
२०२२ — Excel आणि रेकॉर्डिंग
२०२२ मध्ये मला एक विचार सुचला. आपल्याकडे जे आहे ते फार मौल्यवान आहे. पण ते फक्त स्मरणात आहे. आणि स्मरण नाजूक असते. म्हणून मी लिहायला बसलो. एका Excel फाईलमध्ये. पायरी क्रमांक, कोणता मंत्र, काय कृती. हळूहळू ती यादी वाढत गेली — शेवटी १४१ पायऱ्या झाल्या. मग वाटले, नुसते लिहून काय उपयोग? मंत्र ऐकायला हवेत. म्हणून स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग सुरू केले. १२८ ऑडिओ फाईल्स.
म्हणून स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग सुरू केले. १२८ ऑडिओ फाईल्स.
ते रेकॉर्ड करताना एक विचित्र, हलवून टाकणारी जाणीव झाली —
मला जे आई-बाबांच्या आवाजातून शिकायला मिळाले, ते मी माझ्या आवाजात पुढच्या पिढीसाठी ठेवतो आहे.
आणि आता, वैदेह
चि. वैदेह लहानपणापासून हे सर्व पाहत आला आहे. अगदी तसेच जसे मी आपटे वाड्यात पाहत होतो. आणि गेली पाच-सहा वर्षे त्याच्या हातून पूजा होते आहे. या महिन्यातही त्यानेच केली. मी बाजूला होतो — जसे माझे बाबा माझ्या बाजूला होते. पण मला जे सर्वात जास्त समाधान देते ते हे नाही की तो पूजा करतो.
समाधान हे आहे की त्याच्या मनाची तयारी आहे.
तो हे कर्तव्य म्हणून करत नाही. त्याला ते करावेसे वाटते. आणि हीच खरी परंपरा — जिथे हस्तांतरण सक्तीने नाही, तर आपुलकीने होते.
चार पिढ्यांचा धागा
आजोबा-आजी → आई-बाबा → नीता-मी → वैदेह.
आपटे वाड्यातल्या त्या छोट्या घरापासून सिंगापूरपर्यंत.
मध्ये कुठेही हात सुटला नाही.
आणि हे सहज घडलेले नाही. यामागे आई-बाबांचे सातत्य आहे, त्यांचे प्रोत्साहन आहे, आणि आईच्या पंचांग-वाचनाचे मार्गदर्शन आहे.
शेवटी
मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो.
कुठलेही पुस्तक, कुठलेही रेकॉर्डिंग, कुठलेही तंत्रज्ञान — आपटे वाड्यातल्या त्या सकाळची जागा घेऊ शकत नाही. आई-बाबांच्या बदललेल्या आवाजाची, आईच्या स्वयंपाकघरातल्या लगबगीची, त्या शिऱ्याच्या वासाची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
पण जे मला मिळाले — ते पुढे जावे, एवढेच.
आपली परंपरा एका पिढीकडून दुसरीकडे हातात हात देऊन चालत आली आहे. आज जगभर पसरलेल्या आपल्या कुटुंबांमध्ये तो हात सुटण्याचा धोका खरा आहे.
आणि म्हणूनच पुढचा प्रश्न उभा राहिला —
जे आपल्या कुटुंबात घडते आहे, ते इतर कुटुंबांपर्यंत कसे पोहोचेल?
त्याबद्दल पुढच्या भागात.
जय जय रघुवीर समर्थ
🕉️ श्री सत्यनारायणार्पणमस्तु 🕉️
— विवेक भास्कर साठे (VivSa)
सिंगापूर
पुढील भाग: “पूजेसाठी — म्हणजे पूजा करण्यासाठी नाही, पूजेला साथ देण्यासाठी”.
लहानणापासून दिवाळीच्या आगमनाची चाहूल बालमनात किल्ला करण्याच्या विचाराने येत असे. दर वर्षी नव्याने किल्ला करणे, त्यावर तटबंदी, बुरूज, तलाव करणे हिरवळ लावणे, रंगकाम करून देखणा किल्ला करणे यासारखी मोठी पर्वणी लहानमनापुढे दुसरी नाही. कॉलेजची काही वर्षवगळता नंतरही किल्ला बनवणे चालू होते.
सिंगापूरात आल्यानंतर पहिली ६-७ वर्ष न चुकता किल्ला बनवीत असे. ८ वर्षांपूर्वीच्या या आठवणी पुन्हा आज ताज्या झाल्या हा मस्त विडीओ पाहून
किल्ला स्वच्छ करायला मी मदत करीन
हा विडिओ माझा नाही. हा बनवणाऱ्याच्या टीमचा हेतू मात्र मला १००% पटतो.
आपण सर्वांनी किल्ला पहायला आवर्जून जावे. आणि तिथे फिरताना ते आपले घर मंदीर किंवा जपून वापरायची जागा हा भाव मनांत ठेऊन त्या भव्य वास्तूची काळजी घ्यावी
बाकी काय करावे करू नये ह्या सुचना आपल्या आपण ठरवाव्यात
सुरेख मेसेज, का कुणास ठाऊक, पण व. पु. यांचाच असावा असे वाटते. थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर? दिवसांखेरी, ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या मस्त लागलेल्या दह्याचा?
मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं … नाही का ? दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य, नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसंच set राहिलं, तर त्यातली गोडी निघून जाईल. सपक होईल. …. वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून, तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत, तर कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून ! मला ना, ह्या ताकाचा … हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठचाही अतिरेक झाला, तर आयुष्य पांचटच होतं ! हरेक दिवसाच्या पदार्थ क्रियेची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी, रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं ! ‘उद्याचं’ दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या उबदार क्षणांनी,परत नव्यानं दही विरजायचं. #मा_आ_वि #दही #आयुष्य
तर मंडळी, दोन गोष्टी आपल्या लई म्हणजे लई आवडत्या बघा! मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती (शुद्ध मराठीत- खा दा डी). दोन लाडक्या गोष्टी एकत्र आणाव्या असा विचार आला. खाणं आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांवरच्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार आठवायला सुरुवात केली. पण कसलं काय, मनात मांडे आणि पदरात धोंडे! कामांच्या व्यापातून वेळ मिळेना.
चार तरी म्हणी लेकाला सांगता येतात का पाहूया म्हणून त्याला विचारलं. पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट. म्हणतो कसा, “आई, तू लिही आणि मला वाचून दाखव. एखादी राहिली तर मी सांगतोच.” म्हटलं वा! हे म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा! हा आपला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार. शेवटी मीच सुरु केलं. तसंही म्हणतात ना, सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी ! बघू तरी किती आठवतात…
सकाळी सकाळी चहापाणी आवरून जोशी काकू आपल्या तिसऱ्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीत खुर्ची टाकून बसल्या होत्या. सकाळची वेळ असून देखील बाहेर चांगले कडाक्याचे ऊन पडलेले होते. सोसायटीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. फेरीवाले रस्त्यावरून जाता जाता संपूर्ण बिल्डिंगला ऐकू जाईल अशा आवाजात मोठमोठ्याने ओरडून आपल्या मालाची जाहिरात करीत होते. सोसायटीच्या आवारात काही लहान मुले खेळत होती. माळी झाडांना पाणी देत होता. जोशी काकू बाल्कनीत बसल्या बसल्या बाहेरच्या सर्व हालचाली बघत होत्या. अधून-मधून खाली खेळणाऱ्या मुलांना आवाज करू नका असा दम देत होत्या.
वॉचमन नेहमी प्रमाणे गेट उघडा ठेऊन पाणी बघण्यासाठी गेला. गेट उघडाच असल्यामुळे एक मास्क विकणारी बाई सोसायटीच्या आवारात शिरली. एका हातात मास्कने भरलेली पिशवी आणि दुसऱ्या हाताने कटीवर बसलेल्या तान्ह्या मुलाला सांभाळीत जोरजोरात आवाज देऊ लागली.
“मास्क घ्या मास्क …”
जोशी काकूंनी तिला बघितले आणि हाक मारली.
“ये मास्कवाले…वरती ये”
मास्क विकणारी बाई मान वळवून इकडे तिकडे बघू लागली.
“अगं…इकडं इकडं…वरती ये”
मास्कवालीने आवाजाच्या दिशेने वर पाहिले. कडाक्याच्या उन्हामुळे ती घामाघूम झाली होती. कपाळावरून घाम ओघळत होता. वरती मान केल्यामुळे घामाचा थेंब तिच्या डोळ्यात गेला. तिने पटकन मान खाली केली आणि खालच्या मानेनेच उत्तर दिले.
“येते येते…बाईसाहेब”
बिल्डिंगला लिफ्टची सोय नव्हती, त्यामुळे ती मास्कवाली जिना चढून तिसऱ्या माळ्यावर गेली. हातामध्ये मास्कने गच्चं भरलेली पिशवी आणि कटीवर असलेल्या मुलाच्या वजनामुळे तिला धाप लागली. जरासं सावरल्यावर तिने दारावरची बेल वाजवली. जोशी काकूंच्या मुलाने दरवाजा उघडला आणि त्या मास्कवालीला पाहताक्षणी तिचे ऐकून न घेताच “नही चाहिये” असे म्हणुन दरवाजा बंद करून घेतला.
ती मास्कवालीबाई बिचारी रडकुंडीलाच आली. असा पटकन तोंडावर दरवाजा बंद केलेला बघून तिला फार वाईट वाटले. ती फार दुखावली. परंतु नाईलाजाने तिने परत बेल वाजविली. परत मुलाने दरवाजा उघडला आणि तिच्यावर डाफरला.
“अरे नही चाहिये बोला ना”
“पण दादा बाईसाहेबांनी हाक मारून वर बोलावलंय”, त्या मास्कवालीने दरवाजा बंद करायच्या आत सांगून टाकले.
“ठीक आहे…थांब जरा” असे बोलून त्याने दारातूनच विचारले, “आई, तू कोणाला बोलावलं आहेस का?’
“हो हो…आले थांब”, जोशी काकूंनी बाल्कनीतून होकार दिला.
“कशाला कोणाला बोलावतेस? तुला माहित आहे ना सध्याची काय परिस्थिती आहे”, मुलगा त्यांच्यावर जवळजवळ रागवलाच.
“अरे मास्कवाली आहे ती…म्हटले घेते एखादा”, काकू दारात येत म्हणाल्या
“अगं तुला मास्क पाहिजे तर मला सांगायचं ना, आमच्या ऑफिस मध्ये कित्येक पडलेत, आणला असता मी तुझ्यासाठी तिथून”
“अरे तसं नाही, पण म्हटले दारापर्यंत आलीच आहे तर घेते एखादा”.
“ठीक आहे… घे मग”, असे बोलून मुलगा घरात निघून गेला.
“हां, बोल… कसे दिले मास्क?”, पिशवीतील एक मास्क उचलीत काकूंनी विचारले.
“वीस रुपये”
“वीस रुपये? बापरे !! काय मस्करी करतेस कि काय? इतके महाग असतात होय मास्क?”
“नाही नाही, वीस रुपये खूप जास्त आहेत. काहीतरी कमी कर”
“नाही बाईसाहेब, वीस रुपये बरोबर आहे”
“काय नाही? वीस रुपये खूप जास्त आहेत. पंधरा लाव”
“नाही बाईसाहेब, पंधराला नाही परवडत, दिवसभर फिरल्यावर दहा पंधरा रुपये मिळतात कसेतरी”
“नाही नाही, वीस रुपये नाही देणार”
“नका बाईसाहेब असं नका करू…बरं अठरा द्या”
“अगं आई मी तुला सांगितलं ना नको घेऊ म्हणून”, मुलगा बेडरूम मधून बाहेर येत म्हणाला.
“ठीक आहे घ्या पंधराला”, मास्कवाली नाईलाजाने म्हणाली.
“मी तर तुला आधीच म्हटले होते, पण तुम्हा लोकांना किटकिट केल्या शिवाय होत नाही, बरं दे एक चांगला काढून”, जोशी काकूंनी इलॅस्टिक आणि शिलाई जोरजोरात खेचून बघितलेला मास्क परत तिच्या पिशवीत टाकीत म्हटले.
मास्कवालीने कटीवरच्या मुलाला सांभाळीत दुसऱ्या हाताने पिशवीतून एक नवा मास्क काढून दिला. जोशी काकूंनी त्याची पण शिलाई आणि इलॅस्टिक तपासून पाहिली.
“चांगला आहे बाईसाहेब, अजून पर्यंत कोणाची काही तक्रार नाही आली”, मास्कवालीने आपल्या मालाची हम्मी दिली.
“ठीक आहे, ठीक आहे. सगळे धंद्यावाले असेच बोलतात. हे घे पैसे आणि पाच रुपये परत दे”, काकूंचा मुलगा तिला वीस रुपयांची नोट देत म्हणाला.
“दादा, पाच रुपये सुट्टे नाहीत. तुमच्या हातची बोहनी आहे”, मास्कवालीने दिलगिरी व्यक्त केली.
“हे तुमच्या लोकांचे नाटकंच असतात, पैसे सुट्टे नाहीत, मग दोन वस्तू घ्या नाहीतर बाकीचे पैसे सोडा”
“दादा असं नका बोलू, खरंच नाही हो सुट्टे”
“ठीक आहे मग सुट्टे झाल्यावर ये”, असे बोलून मुलाने काकूंच्या हातून मास्क घेऊन पिशवीत टाकला आणि वीस रुपयांची नोट परत घेतली.
मास्कवाली स्तब्ध झाली. तिला काय बोलावे हे कळेना. ती त्या मायलेकांकडे बघतच राहिली.
“आई तू असं कुणाला पण नको बोलवत जाऊस. लोकडाऊनचा फायदा घेऊन ह्या लोकांनी लूट माजवली आहे”, मुलगा काकुंवर रागावला.
“दादा मी कुणी चोर भामटी नाहीये, लोकडाऊन मुळे नवऱ्याची नोकरी गेली म्हणून घर चालवण्यासाठी नाईलाजाने हा धंदा करतेय”, मास्कवालीने आपली व्यथा मांडली.
त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून समोरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू अनिल चव्हाणच्या बायकोने दरवाजा उघडला. मास्कवाली जवळ येऊन विचारले,
“कसे दिले मास्क?”
“वीस रुपयाला एक”
“वीस रुपये? खूप महाग आहे. दुकानात पंधरा रुपयाला आहे. काही कमी कर”
“अगं मला पण अगोदर वीसच म्हणाली होती. भाव केल्यावर पंधराला द्यायला तयार झाली. पण पैसे सुट्टे नाही म्हणून नाही घेतला”, जोशी काकूंनी मधेच बोलून आपली हुशारी दाखवली.
“काय गं, मग माझ्याकडून का वीस मागतेस? मी पण पंधराच देईल”, अनिलच्या बायकोने पण संधीचा फायदा घेतला. अनिल चव्हाण दारात उभा राहून सर्व ऐकत होता. तो पुढे येऊन त्याच्या बायकोला म्हणाला,
“काय मिळेल तुला पाच रुपये वाचवून? काय होईल त्याने?”
“अहो पण भाव तर करायलाच पाहिजे ना, मागितली ती किंमत देऊन कसं चालेल?”
“तुझं म्हणणं मला पटत, पण कुठे भाव करायचा आणि कुठे नाही हे तुला समजायला पाहिजे, त्या बाईकडे बघ, एका हातात इतकी जड पिशवी, दुसऱ्या हातात लहान बाळ आणि ती पाच रुपयांसाठी तीन माळे चढून आली आहे. त्याचा तरी विचार कर…असे कितीच रुपये आपण रोज व्यर्थ खर्च करतो, कधी त्याचा विचार केलास का? मी एक सफाई कामगार आहे. रोज दारू पिल्या शिवाय नाल्यात गटारात उतरू शकत नाही. दारूवर रोज शंभर दीडशे रुपये खर्च होतात.आणि इतक्या घाणीत काम केल्यामुळे मला कधी ही काही ही होऊ शकते. समज मला काही झाले आणि तुझ्यावर अशी वेळ आली तर?”
अनिलचे असे बोलणे ऐकून त्याची बायको काहीच बोलली नाही. तिला त्याचे म्हणणे पटले. पण जोशी काकूंना त्याचा फार राग आला. त्या पटकन म्हणाल्या,
“अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे कि नाही? असे अभद्र बोलणे तुम्हाला शोभते का?”
“आई तू चल घरात, अशा लोकांच्या तोंडी नको लागायला”, असे बोलून काकूंच्या मुलाने दरवाजा बंद करून घेतला.
“ओ ताई, केवढ्याला आहे ते मास्क वीस रुपयाला ना? द्या दहा, हे घ्या दोनशे रुपये”, अनिलने दोनशे रुपयांची नोट काढून दिली.
“दहा? आणि एवढ्या मास्कच काय करणार?” अनिलच्या बायकोने आश्चर्याने विचारले.
“माझ्या मित्रांना वाटणार…रोज दारू सिगरेट शेअर करतो, आज मास्क करू”
मास्कवालीने दोनशे रुपये घेतले, मास्कच्या पिशवीला आणि आपल्या कपाळी लावले. दहा मास्क काढून अनिलला दिले आणि त्याचे आभार मानले. मास्कची पिशवी उचलून पायऱ्या उतरू लागली. तशी अनिलने तिला हाक मारली,
“ओ ताई, काही पाणी बिनी देऊ का?”
पाण्याचं नाव ऐकून ती बाई थांबली, तिचा गळा सुकला होता, तिला खरोखर पाण्याची गरज होती. उतरलेल्या दोन पायऱ्या परत चढून ती वरती आली. अनिलने तिला बसायला चटई दिली. मास्कवालीने पिशवी आणि बाळाला खाली ठेवले आणि चटईवर बसली. अनिल घरात गेला. त्याचा भरलेला टिफिन एका थाळीत टाकून घेऊन आला. मास्कवालीच्या समोर थाळी ठेऊन म्हणाला,
“घे ताई, भावाच्या घरची चटणी मिरची गोड मानून घे”
अनिलची माणुसकी बघून मास्कवालीचे डोळे भरून आले. तिने डोळ्यांना पदर लावला. तिचे रडणे बघून अनिलच्या बायकोचे देखील डोळे भरून आले. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान वाटला. मास्कवालीचे रडणे बघून अनिल पुढे येऊन म्हणाला,
“ये ताई, रडायला काय झालं? मी तर माझं कर्तव्यच केलं. खा ते… आणि हो भावोजींना जो पर्यंत नोकरी नाही लागत तो पर्यंत काही लागलं तर हक्काने या भावाच्या घरी ये”
मास्कवालीने मानेने होकार दिला. आणि अनिलच्या माणुसकीला सलाम केला.
काल दिवस भर पाऊस पडून गेल्याने ही रविवार सकाळ, नुकतीच आंघोळ होऊन स्वच्छ झालेली, रात्रभर धुक्याची हलकी चादर पांघरून पडलेली झाडे, त्या चिंब भिजून गेलेल्या रस्त्यावरुन गार गार वाऱ्याचा कानाला आणि अंगाला स्पर्श घेत एखादे सुरेख गाणे गुणगुणत शीळ घालीत मनसोक्त सायकल चालवण्याचा सुखद अनुभव घेण्याची सकाळ
… हा अनुभव कसा सोडून चालेल चला तर मग आमच्या या रम्य सायकल सफरीवर
घरून निघाल्यावर
ठिकाण आहे मंडई तळे आजूबाजूला आहे केवळ घनदाट झाडी मोकळे रस्ते शहरापासून फार दूर नाही पण शांत वातावरण
दुतर्फा घनदाट झाडी, आखून ठेवलेले रस्ते, वर निळे आकाश आणि अदबीने चालवणारे गाडीवाले
सायकलवाले मध्ये आले म्हणून त्यांना काही भोंगा वाजवून घाबरवत नाहीत हलकेच गाडी बाजूने नेतील
अश्या रविवारी सकाळी लांबवर पळणारी मंडळी ही या ठिकाणी येतात व कदाचित सायकली चालवणाऱ्यांचे थवे ही जाताना दिसतील
एकंदरीत मंडई तळ्यावर जाण्याचा रस्ता सायकल चालवण्यासाठी खूप रम्य आहे
सोबत आहेत सायकलस्वार नीता आणि तपस्विनी आणि जितेंद्र उर्फ जेके
रस्ता आहे १३-१४ किमी पण अशी गार हवेशीर सकाळ गर्द झाडी निळे आकाश अनुभवत किती किलोमीटर गेले हे कळत नाही तरी मंडई तळ्यावर पोहोचले की काय मांडून ठेवले आहे? कशासाठी केला हा अट्टहास?
मंडई तळ्यावर पोहोचल्यावर
चहु बाजूने नटलेल्या हिरव्यागार झाडांच्या अनुभवाने, तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांनी, त्यांना हलकेच बाजूला सारून डोकावून बघणाऱ्या सूर्य किरणांनी खुले आकाश व निळे पाणी पाहून सारे श्रम क्षणार्धात नाहीसे होतात
आता एक तरी solo pic बनता है ना !! बनता है तो मेरा भी निकलो या उत्साही वातावरणाची कमाल काही औरच आहे मग थकलेलली सायकलवाली मंडळी उड्या मारायला ही कमी करत नाही स्वचित्र (सेल्फी) काढल्या शिवाय पाय निघत नाही या आठवणी हीच या सफरीची खरी कमाई
जोडीदारासोबत या रम्य वातावरणात काही क्षण निवांत घालवून पुनः परतीची वाट धरली मागे वळून पाहिल्याशिवाय सायकलीला वेग धरता येत नाही
परतीचा प्रवास
आता वाहनांची रहदारी वाढली आहे या जोरात जाणाऱ्या वाहनांनी वाहत्या रस्त्यावर ही सायकलवाली मंडळी आली तरी मोठ्या गाड्या काळजी पूर्वक आपापली वाट धरून जातात
आता उन्ह जाणवू लागतात तसेच मगाशी जे पक्षी किलबिल करत होते तसेच काहीसे पोटात “काव काव” होत असल्याचे जाणवते मग आपोआप वेग वाढतो, उताराचा रस्ता आपला मित्र आहे असे वाटू लागते चला चला कोण पुढे चालतो तो शहर दिसू लागते तसे निळे आकाश आणि हिरवी झाडे मागे राहू लागती वेग मंदावला असला तरी चेहऱ्यावर तजेला आणि मनात भरपूर समाधान साठवलेले असते
गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.
यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.
या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !
भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.
गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हित रूपाला देवनागरी लिपी म्हणतात.
या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !
महर्षी व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !
गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.
त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.
श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !
गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !
कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपी यातील साम्य दाखवून दिले आहे !
ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..
सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.
कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.
रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.
डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.
सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!
ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !
देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.
कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.
ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.
दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.
झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.
घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.
मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.
वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे.
मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.
लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.
देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.
लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.
भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.
ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.
अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.
देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.
अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.
१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.
जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.
थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !
देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.
देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.
घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !
ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !
आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.
जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !
बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.
जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल. निवेदक :- प्रा. अनिल गोरे.
सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;
सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.
सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;
आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;
आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;
आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.
आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ
आजीव सदस्य : अक्षर मानव
सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.
निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!
हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती ! अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )
प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब यात काही फरक आहे का? असेल तर काय?
थोडक्यात उत्तर
प्रारब्ध आणि प्राक्तन ह्या संज्ञा आहेत ज्या कर्मफळाच्या अवस्था दर्शवतात. दैव आणि नशिब हे भावना वाचक उद्गार आहेत जे मनाच्या अवस्था दर्शवतात. #मा_आ_वि #हिंदू #गूढ_ज्ञान #ज्ञान
जसे मानवी गुणसुत्र हे दोन प्रथिन मालिकांच्या धाग्याप्रमाणे एकमेकांत गुंतले आहे, तसे कर्म व जन्म हे एकमेकांसोबत अतिशय शास्त्रीय सफाईने गुंतले आहे.
त्यात दोन मुख्य संज्ञा लक्षात घेणे आवश्यक आहे.
निरुपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ लगेच परिणाम दाखवत नाही व ते विलम्बाने भविष्यात येतात.
सोपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ अवतीर्ण होऊ लागले आहे किंवा वर्तमान कालात घडत आहे.
आता याच्या जोडीला चार उपसंज्ञा लक्षात घेऊ या.
संचित कर्मफळ: एका आत्मन च्या ब्रह्मापासुन वेगळे झाल्यानंतर सर्व कर्मफलांचा एकुण आशय किंवा साठा.
क्रियमाण कर्मफळ: जे आत्म्याने प्रकृती सोबत केलेल्या दररोजच्या कर्मातुन जन्म घेते. यातील काही कर्म ताबडतोब फळ देऊन संपते. उरलेले कर्मफळ संचितात जमा होते.
प्रारब्ध कर्मफळ: हे त्या संचितापैकीत असे कर्मफळ आहे, जे त्या आत्म्याच्या वर्तमान शरीरावर परिणाम करते किंवा करणार असते, जवळच्या भविष्यात, म्हणजेच वर्तमान देहाचा लय किंवा मृत्यु होण्या आधी.
प्राक्तन कर्मफळ: हे त्या संचितापैकी असे कर्म आहे जे त्या आत्म्याच्या पुढल्या म्हणजेच भविष्यातील शरीरावर परिणाम करणार आहे. म्हणजेच त्याआत्म्याला पुन्हा शरीर धारण करायला हे कर्म कारणीभुत आहे.
आता या संज्ञा कशा चालतात ते बघू
एक आत्मन पहिले नवे शरीर घेतो तेव्हा संचित (प्राक्तन + प्रारब्ध) कर्मफ्ळ “शुन्य” घेऊन जन्मतो.
त्या शरीराने प्रकृती सोबतच्या केलेल्या कर्मापोटी क्रियमाण कर्म (लगेच फळ देणारी) भोगतो तसेच संचित कर्मफळे म्हणजेच “निरुपक्रम” कर्मफळे स्वतःवर जोडुन घेतो. त्याच्या नुसार दुसरे नवे शरीर धारण करतो.
आता हे दुसरे नवे शरीर ही संचितापैकी काही प्राक्तन कर्मफळे घेउन जन्म घेते झाले आहे.
या दुसऱ्या नव्या शरीरात आत्मन क्रियमाण कर्म करुन व त्याचे फळ लगेच भोगुन राहतो. त्यावेळेस प्राक्तनातील काही कर्म “सोपक्रम” अवस्थेस पोहोचतात व प्रारब्ध म्हणुन समोर येतात. तो आत्मा ती भोगुन संपवतो, तसेच क्रियमाण कर्म भोगतो. न भोगलेली नविन कर्मफळे संचितात जोडली जातात.
त्यातील काही प्राक्तन म्हणुन पुन्हा सोबत घेऊन तोआत्मान पुढला जन्म व तिसरे नवीन शरीर धारण करतो आणि हे जन्म कर्म चक्र चालु राहते.
आता पुढल्या दोन शब्दांकडे वळु
या सर्व चक्रा मध्ये आत्म्याला शरीर धारण केल्याच्या आनंदात मी पणा येतो व त्यामुळे त्याचे पुर्व जन्म स्मृतीत राहात नाही. त्यामुळे संचित (प्रारब्ध व प्राक्तन) कर्मफळे याची जाण नसते.
त्यामुळे अपेक्षा असताना (जी करणे हेच दुःखाचे कारण सांगितले आहे) फळ मिळाले नाही तर ती अपेक्षा भंगाची भावना “दैव” (समोर असलेले पण भोगता नाही आले असे फळ) म्हणतो.
त्याच प्रमाणे प्रारब्धाच्या परिणामामुळे अपेक्षा नसताना (जे पुर्वीच्या कर्माचे फळ आहे) ते फळ (भोग) वाट्यास आले तर त्याला “नशिब” म्हणतो.
दैव आणि नशिब हे बोली भाषेच्या बदलामुळे आलटुन पालटुन ही वापरले जातात.
मला वेगवेगळ्या पुस्तकातुन वाचुन समजलेला हा सारांश आहे. शास्त्रीय की अजुन काही आहे यावर मला वाद करणे अपेक्षित नाही.