खेळ खेळुया… – दिवाळीचे किल्ले

माझ्या बाल मित्रांनो, लगोरी, लंगडी, डब्बा आईस-पैस असे विविध पळापळीचे खेळ खेळुन झाले. नेहमीचे हे खेळतर आपण दरवेळी खेळतो. पण काही खेळ असे असतात की ते काही विशेष सणामध्ये खेळले जातात. जसे श्रावणात भोंडला, गणपतीमध्ये करमणुकीचे कार्यक्रम आणि मिरवणुक, आता नवरात्रीला गरबा खेळतो तसाच एक खेळ दिवाळीत खेळला जातो. या दिवाळी विशेष खेळाचे नाव आहे – “किल्ला करणे”. किल्ला हो… हो…, शिवाजी महाराजांच्या वेळी होता तसा, खरोखरचा… डोंगरावर असतो ना, तसाच, पण आपापल्या घरी. कसा? तर मग, चला किल्ला करुया…!

सहित्य (पुर्व तयारी):

विशेष सणासाठी आपण कशी आधी तयारी करतो, तशी किल्ला करायला आधीपासुन तयारी करावी लागते. साधारणपणे एक महिना आधी पासुन तयारीला सुरुवात करावी.

* किल्ला :- सर्वप्रथम, कोणता किल्ला करावा हे ठरवुन घ्यावे. प्रतापगड, राजगड, सिंहगड हे माहितीतले किल्ले करायला सोपे जातात कारण त्यांच्याबद्दल चित्र, माहिती सहज मिळते. किल्ला ठरवल्यावर देखावा कोणता करावा याचा विचार करावा. पन्हाळ गडहुन सुटका – बाजीप्रभु, गड आला पण सिंह गेला – तानाजी असे प्रसिद्ध देखावे करु शकतो. काहीच सुचले नाही तर नुसताच किल्ला करुन खाली सुंदर गावाचा देखावा करावा.

* किल्ला करायची जागा :- घराच्या जवळ १० x १० फुटाची मोकळी जागा. वर छत असावे, पण चारी बाजुने पुर्ण बंद नसावी. खाली जमीन मातीची असल्यास उत्तम.

* किल्ला बांधायचे सामान:- दगड, विटा, लाल मुरुमाची माती, पाण्यासाठी एक मोठे पातेले किंवा छोटे पिंप, माती आणण्यासाठी पोते, इत्यादी.

* सजावटीचे सामान:- सजावटीचे सामान आपापल्या हौशी प्रमाणे – कोणी फक्त किल्ल्यावर झाडे लावुन थांबतात, काहीजण किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, झेंडे उभारतात, तर अजुन काहीजण किल्ल्याखाली विहिर, कारंज, शेत, गाव इत्यादी सुरेख देखावा उभारतात. प्रत्येकाने आपापल्या आवडी प्रमाणे सजावटीचे सामान गोळा करावे. आणि हो, एक महत्वाचे राहिले ना… सजावटीसाठी शिवाजी महाराज, त्यांचे सोबती मावळे आणि शत्रु यांचे मातीचे पुतळे. तीच तर खरी गंमत आहे!

सिंगापुरात कोठे किल्ला कराल :-

हे सर्व साहित्य आणि लागणारी तयारी इथे सिंगापुर मध्ये कुठे करणार? प्रश्न नेमका आणि वेळीच विचारलात म्हणुन बरे झाले. इकडे HDB किंवा Condo च्या आवारात असा चिखल-मातीचा किल्ला करायला कोणी परवानगी देणार नाही. मग काय झाले, नाराज होऊ नका. ECP चा समुद्रकिनारा आहे ना! तिथे वाळुत किल्ला करायला कोणाची परवानगी लागत नाही. ठिक आहे ना आता… चला तर बघु या किल्ल्याचे पुढले काम.

किल्ल्याचे बांधकाम :-

मी पन्हाळ गडाहुन सुटका हा देखावा बनवायचे ठरवले आहे. तरी पुढे चलचित्रात बघुया कसा बनवला किल्ला ते…

काही दृष्य नमुने :-

चित्र १ लढाईचे दृश्य चित्र २ गावकरी
चित्र ३ उभा शिवाजी चित्र ४ बसलेला शिवाजी

मग आता, तुम्ही नक्की किल्ला करणार ना, यंदाच्या दिवाळीत? मला सांगा कोणता देखावा उभारता आहात तो. आणि हो शिवाजी, मावळे यांचे पुतळे कोठे मिळतील याची माहिती हवी असेल तरी मला Email करा ..

5 responses to this post.

  1. सुधीर कदम's avatar

    Posted by सुधीर कदम on ऑक्टोबर 11, 2017 at 4:16 सकाळी

    मला किल्ला बनवायचा आहे,
    तर हे मावळे,गावकरी, प्राणी सर्व काही मातीच्या वस्तू कुठे मिळतील…..
    सुधीर कदम….. मुंबई.

    Like

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      सुधीरजी, ह्या मातीच्या वस्तु मी ठाण्याहुन घेऊन आलो होतो.

      तुम्ही सिंगापुरात आहात का?

      तुम्हाला मुंबईहुन आणुन देऊ शकतो रविवारी सिंगापुरला माझ्याकडून घेऊ शकता…

      Like

      उत्तर द्या

  2. प्रशांत खिवसरा's avatar

    Posted by प्रशांत खिवसरा on नोव्हेंबर 3, 2018 at 11:42 सकाळी

    किल्ला बनवन्याची कृती कधी अपलोड करणार?

    Like

    उत्तर द्या

  3. अज्ञात's avatar

    […] सिंगापूरात आल्यानंतर पहिली ६-७ वर्ष न चुकता किल्ला बनवीत असे. ८ वर्षांपूर्वीच्या या आठवणी पुन्हा आज ताज्या झाल्या हा मस्त विडीओ पाहून […]

    Like

    उत्तर द्या

यावर आपले मत नोंदवा