काय मग, लंगडी खेळलात कि नाही? … मला माहिती आहे तुम्हासगळ्यांना जमले नसेल पण ज्यांनी लंगडी खेळायचा प्रयत्न केला असेल त्यांना नक्कीच खुप मज्जा आली असेल. यावेळी लंगडी सारखाच सोपा आणि मजेदार खेळ सांगणार आहे मी तुम्हाला.
या खेळाचे नाव आहे “लगोरी”. हो लंगडी सारखीच हा खेळ खेळण्यासाठी फार तयारी लागत नाही. एक सपाट, मोकळी जागा – जसे HDB चे stilt किंवा Rubber mat चा Play area, Open grass area अशी कोणती ही मोकळी जागा चालते. पण Swimming pool च्या जवळ, Parking lot च्या जवळ नको कारण या खेळात एक चेंडु आणि लाकडी चकत्यांचा एक मनोरा – तुम्ही कुतुबमिनार पाहिला आहे का? दिल्ली – भारताची राजधानी येथे आहे तसा लगोरीचा मनोरा, पण छोटा, हे साहीत्य लागते.
चित्र १:- लगोरी
हा लाकडी चकत्यांचा मनोरा ज्याला लगोरी म्हणतात, त्यात ७ लाकडी तुकडे घ्यावे. सगळे तुकडे सारख्या आकाराचे नाहीतर काही लहान आणि काही मोठे असे कोणतेही लाकडी तुकडे वापरुन एक लगोरीचा ६ तुकड्यंचा एक संच तयार करु शकता. लगोरी रचायची – म्हणजे सर्वात खाली मोठा तुकडा, त्यावर नंतरचा मोठा अश्या उतरत्या क्रमाने एकावर एक लावावे, म्हणजे सगळ्यात वरती छोटा तुकडा लागेल. फार खटपट करणे शक्य नसेल तर लगोरीचा तयार संच विकतही घेउ शकता.
मग काय, एक लगोरीचा मनोरा तयार असला की मग तुमची खेळायची जागा नक्की करायची की मग सुटायचे. दोन Captain आपापला गट मागुन घेतात. प्रत्येक गटात साधारणपणे ४-५ खेळाडु-गडी असावे, म्हणजे मज्जा येते. लगोरी खेळण्यासाठी मैदान आखायचे खुप सोपे आहे. मोकळ्या जागेच्या मधोमध एक छोटे वर्तुळ, साधारण २ फुट व्यासाचे आखुन घ्यावे. यात लगोरीचा मनोरा मांडावा आणि १० ते १२ फुटावर एक रेघ मारुन घ्यावी. ही झाली लगोरी फोडण्याची जागा. एकंदरीत खाली दिलेल्या चित्राप्रमाणे तयारी झाली पाहिजे.
चित्र २:- मैदान
खेळुया आता…
- कोणता गट लगोरी फोडणार आणि कोणता गट पकडणार हे ठरवण्यासाठी नाणेफेक करावी
- पकडणारा गट (Defending Team) फोडण्याच्या विरुद्ध बाजुला चेंडु पकडण्याच्या तयारीत आपापली जागा घेतात.
- फोडणारा गट (Breaking Team) फोडण्याच्या रेषे पलिकडे उभे राहतात.
- फोडणार्या गटातील पहिला खेळाडु चेंडु हातात घेउन लगोरीच्या मनोर्यावर चेंडुफेक करतो. जर लगोरीचा मनोरा फुटला तर:-
- पकडणार्या खेळाडुंनी चेंडु हस्तगत करुन फोडणार्या गटातील खेळाडुंना चेंडुफेक करुन मारायचा प्रयत्न करावा.
- चेंडु ज्या खेळाडुला लागेल तो फोडणार्या गटाचा खेळाडु बाद होतो.
- बाद झालेला खेळाडु लगोरीचा मनोरा लावु शकत नाही.
- बाद न झालेल्या फोडणर्या गटाच्या खेळाडुंनी चेंडु चुकवत लगोरीचा मनोरा उभारायचा प्रयत्न करावा.
- शेवटचा खेळाडु बाद होण्या आधी लगोरीचा मनोरा पुर्ण केला तर फोडणार्या गटाला १ गुण मिळतो
- लगोरी पुर्ण उभी रहायच्या आधी फोडणार्या गटाचे सर्व खेळाडु बाद झाल्यास पकडणार्या गटाला १ गुण मिळतो.
- पहिल्या खेळाडुच्या कोणत्याही संधीने लगोरी फुटली तर त्यानंतर फोडणार्या गटाच्या दुसर्या खेळाडुला फोडण्याची संधी मिळते.
चित्र ३:- लगोरी फोडताना
चित्र ४:- फुटलेली लगोरी
चित्र ५:- लगोरी लावताना
- जर लगोरीचा मनोरा नाही फुटला तर:-
- फोडणार्या खेळाडुला अजुन दोन वेळा फोडण्याची संधी मिळते.
- पहिल्या खेळाडुच्या ३ संधी फुकट गेल्यावर दुसरा खेळाडु प्रयत्न करु शकतो.
- अशा प्रकरे फोडणार्या गटाच्या सर्व खेळाडुंनी प्रयत्न केल्यावर एक बाजु संपते.
- बाजु बदल म्हणजे फोडणारा गट लगोरीच्या विरुद्ध बाजुला जाउन उभा राहतो आणि पकडणारा गट फोडण्याच्या रेषे मागे चेंडु घेउन फोडण्याच्या तयारीने उभा राहतो.
- डाव पुन्हा वर सांगितल्या प्रमाणे चालु करावा.
काही नियम:
- पकडणार्या गटातील खेळाडु चेंडु हातात आल्यावर पळु शकत नाही. त्याने चेंडुफेक करुन फोडणार्या खेळाडुला बाद करण्याचा प्रयत्न करावा नाहीतर दुसर्या पकडणार्या खेळाडुला चेंडु द्यावा.
- चेंडु हातात घेउन ५ सेकंदापेक्षा जास्तवेळ उभे राहु शकत नाही
- फोडणार्या गटाच्या खेळाडुने चेंडु लगोरीवर मारल्यावर आणि चेंडु लगोरीला लागुन उडाल्यावर चेंडुचा टप्पा जमिनीवर पडण्याआधी जर पकडणार्या खेळाडुने चेंडु पकडला तर फोडणारा सर्व गट बाद होतो आणि बाजु बदल केला जातो
- फोडणारा खेळाडु स्वतःला वाचवण्यासाठी हाताची मुठ करुन चेंडु दूर ढकलु शकतो.
खास करामती:
- लगोरी फोडताना कमीतकमी फोडण्याचा प्रयत्न करावा. वरची एखादी लगोरीच उडवावी, सगळ्या लगोर्या उडवल्यातर पुन्हा लावताना पंचाइत होइल.
- फोडणार्या खेळाडुला बाद करताना चेंडु जोरात फेकु नाही. नेम चुकला तर चेंडु खुप लांब जाईल आणि दुसर्या गटाची लगोरी पुर्ण होईल.
कोण जिंकले:
- जो गट जास्त वेळा लगोरी लावुन पुर्ण करतो तो गट विजयी होतो
विशेष सुचना:
- हा खेळ वय वर्षे ५ च्या पुढील मुलां-मुलींसाठी आहे.
- मउ चेंडु (soft squeeze) खेळायला घ्यावा.





Posted by ptdeepa on जुलै 4, 2016 at 4:27 सकाळी
Excellent efforts you have take to document this! Keep up the good work!
Did you know that the children of Mohenjo Daro and Harappa played ‘lagori’? This game is being played by Indian children for at least 7,000 years!
LikeLike