
चित्र संदर्भ: बूक माय शो, चित्रपट: हेरा फेरी
चित्र संदर्भ: पंगत मराठी जेवण
तर मंडळी, दोन गोष्टी आपल्या लई म्हणजे लई आवडत्या बघा! मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती (शुद्ध मराठीत- खा दा डी). दोन लाडक्या गोष्टी एकत्र आणाव्या असा विचार आला. खाणं आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांवरच्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार आठवायला सुरुवात केली. पण कसलं काय, मनात मांडे आणि पदरात धोंडे! कामांच्या व्यापातून वेळ मिळेना.
चार तरी म्हणी लेकाला सांगता येतात का पाहूया म्हणून त्याला विचारलं. पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट. म्हणतो कसा, “आई, तू लिही आणि मला वाचून दाखव. एखादी राहिली तर मी सांगतोच.” म्हटलं वा! हे म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा! हा आपला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार. शेवटी मीच सुरु केलं. तसंही म्हणतात ना, सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी ! बघू तरी किती आठवतात…

- अचाट खाणे, मसणात जाणे
- अर्ध्या हळकुंडाने पिवळी
- असतील शिते, तर जमतील भुते
- आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते
- चवलीची (२ आणे) कोंबडी आणि पावलीचा (४ आणे) मसाला
- आधी पोटोबा, मग विठोबा
- आधी शिदोरी, मग जेजुरी
- आपल्याच पोळीवर तूप ओढणे
- आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे
- आवळा देऊन कोहळा काढणे
- ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
- एकादशी दुप्पट खाशी
- एखाद्याचा खिमा करणे
- कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच
- कानामागून आली आणि तिखट झाली
- कामापुरता मामा, ताकापुरती आजी
- कोल्हा काकडीला राजी
- कोल्ह्याला द्राक्षे आंबट
- कोंड्याचा मांडा करणे
- खांडोळी करणे
- खाई त्याला खवखवे
- खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
- खाऊ जाणे तोच पचवू जाणे
- खाऊन माजावे, टाकून माजू नये
- खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे
- खायला काळ आणि भुईला भार
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली
- गाढवाला गुळाची चव काय
- गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य
- घरात नाही दाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा
- घरोघरी मातीच्या चुली
- जिलबीसारखा सरळ माणूस
- ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी
- ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी
- ज्याचे खावे, त्याचे भरावे
- डोक्यावर मिऱ्या वाटणे
- तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणीक करून आला
- तळे राखील तो पाणी चाखील
- ताकापुरते रामायण
- ताकाला जाऊन भांडे लपवणे
- ताकास तूर लागू न देणे
- तिखटमीठ लावून सांगणे
- तेल गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं
- दात आहेत पण चणे नाहीत
- दुधाने पोळल्यावर ताक फुंकून प्यावे
- धनगर बसला जेवाया, ताकाबरोबर शेवया
- धन्याला धातूर, चोराला मलिदा
- नाकाने कांदे सोलणे
- नाकाला मिरच्या झोंबणे
- नावडतीचे मीठ अळणी
- पडत्या फळाची आज्ञा
- पाणी पाजणे
- पी हळद आणि हो गोरी
- पेराल ते उगवेल
- बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी
- बोलाची कढी आणि बोलाचाच भात
- भांड्याला भांडं लागणे
- मनात मांडे, पदरात धोंडे
- मला ना तुला, खीर घाल कुत्र्याला
- मुंगी होऊन साखर खाणे
- मूग गिळून गप्प बसणे
- लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
- वड्याचं तेल वांग्यावर
- शितावरून भाताची परीक्षा
- शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड
- सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी
- साखरेचं खाणार त्याला देव देणार
- देखला वडा उपास मोडा (नवीन जोडली आहे)
अबब, आपण मराठी माणसं अजून काय काय खातो बघा…
अपमान गिळतो, मार खातो, बोलणी खातो, शिव्या खातो, शेण खातो, पड खातो, वेळ खातो, हार खातो, खार खातो, पैसा खातो, अक्षरं खातो… #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी
Tweet
आज फार डोकं खाल्लं का तुमचं
बर तुम्हाला येणाऱ्या म्हणी यात नसतील तर जरूर खाली कमेन्ट मध्ये लिहा .. नक्की जोडून ठेवीन
लेखक: अज्ञात (WhatsApp वरून)
Posted by manasi godbole on सप्टेंबर 30, 2020 at 10:46 pm
वा फारच मज्जा आली राव
LikeLike
Posted by vivsa on ऑक्टोबर 1, 2020 at 12:04 सकाळी
आहे ना मज्जा .. मला राहून राहून हेरा फेरी मधला परेश रावळ आठवत होता .. प्रत्येक म्हण वाचताना
LikeLike
Posted by Suvarna Rajesh Gore on ऑक्टोबर 5, 2020 at 9:43 pm
देखला वडा उपास मोडा
LikeLiked by 2 people
Posted by manasi godbole on ऑक्टोबर 6, 2020 at 11:00 सकाळी
धन्यवाद सुवर्णा
LikeLike