हरविलेली हिंदु साम्राज्य अर्थात आमची इतीहासाबद्दलची बेदरकारी——–लेखांक ४
चंपा हया नावाचे हिंदु साम्राज्य सध्याच्या दक्षीण व्हिएट्नाममध्ये होते हे साधारण आपल्या देशातल्या फ़ार फार कमी लोकांना माहीती असते,ते कुठे होते हे माहीत असणे दूरची गोष्ट. हे राज्य अथवा हा राज्यसमूह हा हिंदु साम्राज्याचे पूर्वेचे जवळ जवळ टोक होते.जिज्ञासूसाठी मी या राज्याच्या नकाशाची लिंक खाली देत आहे.

या राज्याचे नाव इतीहासात चिनी कागदपत्रात [भारतात आम्ही इतीहास हा कागदपत्रांवर नाही भ्रामक आणि खूळचट समजुतींवर आधारतो.] साधारण इ.स. १९२ च्या आसपास येते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात खू लिएन नावाच्या एका स्थानीक राजाने चीनी सम्राटांविरुध्द बंड करुन हिंदु धर्म स्विकारला आणि चंपा राजवटीची घोषणा केली.
उत्तर व्हिएट्नाम हा चीनच्या अधीपत्याखाली होता त्यामुळे या राज्याच्या चीनी सम्राटांशी सतत लढाया चालू होत्या. दूसरया ते सातव्या शतकात या राज्याबद्दल फार माहिती नाही. यांची राजधानी सुरवातीला सिंहपुर येथे होती.या राजवटीच्या ४ थ्या शतकापर्यंत च्या राजांची संस्कृत नावे इतिहासाला माहित नाहीत, चिनी नावे आहेत.
या काळात यांनी बरेच बांधकाम केले आणि विष्णूची मंदीरे बांधली.हे लोक मलाई-पालिनेशियन वंशसमुहाचे होते.यांना “चाम,चम अथवा त्सयाम ” वंशसमूह म्हणत आणि त्यांची भाषाही चम भाषा होती.
इ.स.चवथ्या शतकातल्या चम भाषेतल्या शिलालेखात लिहीले आहे की महर्षी भृगुच्या कूळातल्या ब्राह्मणांनी समुद्र मार्गाने येउन या लोकांना वेदिक धर्माची दिक्षा दिली.
चिनी दरबारातल्या कागदपत्रात हे राज्य आपल्या सीमा सतत वाढवत असल्याचा उल्लेख आहे.हा गणराज्यांचा समुह होता आणि यातली नावारुपाला आलेली शहरे होती १] इंद्रपुरी २] अमरावती ३] विजया ४] कुठार ५] अतीशय आश्चर्यजनक नाव म्हणजे ” पांडूरंग ” .या पांडूरंग गावाचे आजचे व्हिएट्नामी भाषेतले नाव आहे “पान रंग “.
इ.स. ३/४ शतकात वैष्णव पंथाचा त्याग करुन हे लोक शैवपंथी झाले.इ.स. ४ थ्या शतकात यांचा प्रसिध्द राजा भद्रवर्मन होउन गेला.याच्या कारकीर्दीतले बरेच चम शिलालेख आहेत.शिव-ऊमा यांची उपासना होती. लोक विटांच्या घरात रहात ,कान टोचत, राजे लोक हत्तीवर जात आणि त्यांच्या डोक्यावर छ्त्र असे. लग्न हे दर महिन्याच्या अष्टमीला होत असे.मनुष्य मेल्यावर त्याचे दहन आणि अस्थीविसर्जन होते असे. जातिभेदाचा उल्लेख नाही. हे चम लोक फार चांगले नौका बांधणी कारीगर होते.या राज्यात बांधलेल्या नौका या चीन, दक्षीण भारत,लन्का, बर्मा, थायलंड, इंडोनेशिया इ. ठिकाणी निर्यात होत.
इ.स.४ थ्या शतकात संस्कृत शिलालेखही आढळायला सुरवात होते.भगदत्त नावाच्या राजाचा उल्लेख इ.स.५१६ मध्ये आहे.या राजाची राजधानी इंद्रपुरी होती,आणि त्याच्या दरबारी भारतातून आलेले असंख्य ब्राह्मण होते असा उल्लेख आहे.
इ.स. ८७५ मध्ये इंद्रवर्मन (२) या राजाने हिंदु धर्माचा त्याग करुन बौध्द धर्म स्विकारला.
इ.सनाच्या ९/१० शतकात ही राज्ये वैभवाच्या शिखराला होती. व्हिएटनाम मधल्या माई सोन या गावापाशी या राजवटीने बांधलेला देउळ समुह आहे हा कंबोडियातल्या अंगकोर वाट पेक्षा लहान आहे पण शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. इंटरनेट्वर याचे फोटो बघा,फार सुंदर आहेत.
इ.स. ९७५ मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या अनेक युध्दात पराभव झाल्यावर या राजांनी इंद्रपुरी सोडून आपली राजधानी दक्षीणेला विजया इथे हलविली. १०२१,१०२६ आणि १०४४ मध्ये उत्तरेशी युध्दे झाली त्यात पराभव झाल्याने हे राज्य अजुन संकोच पावले आणि यानी आपली राजधानी “पांडूरंग” इथे हलविली.या काळात राजा रुद्रवर्मन होता. या सर्व कालखंडात आपल्या रीतीप्रमाणे हे राज्य शेजारच्या हिंदु कंबोडियाशी लढण्यात धन्यता मानत होते.
इ.स.च्या १० शतकात शैव पंथ पुन्हा या राज्याचा धर्म झाला. यांचा भारताशी संबध आणि संपर्क साधारण ७ व्या शतकातच तूट्ला होता १३०७ मध्ये जय सिंहवर्मन राजाने आणखी मुलुख गमावला. १४०६ मध्ये चंपाधिराय या राजाचा व्हिएट्नामने पराभव करुन ३ प्रांत जिंकून घेतले. चंपा राज्याचा शेवटचा मोठा राजा हा ” चे बुंगा” होता. आपला संपर्क तूटल्याने याचे खरे नाव इतिहासाला अज्ञात आहे. याने चंपा आपल्या अधिअपत्याखाली इ.स. १३६० ते १३९० मध्ये एकत्र केला आणि व्हिएट्नामचा पराभव करत थेट सध्याच्या हनोई पर्यंत धडक मारली.
१४४६ पासुन व्हिएट्नामच्या फौजांनी या राज्याला पराभुत करायला सुरुवात केली.१४७० मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या युध्दात या राज्याचा पूर्ण पराभव झाला.विजयानगरी नष्ट झाली आणि व्हिएटनामी लोकांनी ६०,००० चम लोकांची कत्तल केली. यानतंर रडत खडत व्हिएट्नामच्या ताब्यातले एक संस्थान म्हणून हे राज्य पांडूरंग या गावी इ.स. १८३२ पर्यंत अस्तित्वात होते.
इ.स. च्या १५ व्या शतकात या राज्यातले बहुसंख्य लोक शातंतापूर्वक मुस्लिम झाले. या मुस्लिम झालेल्या राजांची पदवी तरीही ” शक्तीराय ” होती. मला नाही वाट्त या १८३२ पर्यंत अस्तीत्वात असलेल्या राज्याशी कोणी भारतियांनी संपर्क साधला असेल.
अर्थात जो समाज अमाप कर्तुत्वाच्या पहिल्या बाजीरावासारख्या पुरुषाचा मस्तानीपासुन झालेल्या समशेर बहाद्दरचे उपनयन करायला नकार देउन त्या वंशाला बांद्याचे नवाब बनवतो आणि एका कर्तुत्ववान पुरुषाचा वंश परधर्मात जाउ देतो त्या समाजाकडून काय अपेक्षा ठेवणार.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजुनही या चम लोकांमध्ये थोडे हिंदु लोक आहेत. विश्व हिंदु परीषदेच्या विश्वपणामध्ये ह्या हरवलेल्या आणि उरलेल्या थोड्या काही चम हिंदु बांधवाशी संपर्क साधणे आले तर किती बरे कारण या राजवटीची दप्तरे पांडुरंग या गावामध्ये म्युझीयममध्ये आहेत त्याचा अभ्यासही जरुरी आहे. मला राहुन राहुन एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की हा असा वैभवशाली इतिहास अभ्यासायचे सोडून आपला समाज स्वामींच्या चरीत्राची पारायणे करण्यात धन्यता का मानतो.
आमच्या समाजाला स्वतःचा नाश होतांना दिसत नाही का? का आमची बुध्दी,आमची प्रज्ञा,आमचे भविष्याचे ज्ञान या सगळ्याला धर्म आणि देश संरक्षण यासाठी विज्ञाननिष्ठ तल्लख बुध्दी लागते हे का दिसत नाही अथवा ती बुध्दी सध्याच्या काळात आर्थीक तलवार असते हे सत्य का दिसत नाही!!
रस्ते स्वच्छ ठेवा,जागोजागी थुंकु नका,झाडे लावा, वाह्तुकीचे नियम पाळा या साध्यासाध्या गोष्टींऎवजी शनीवारी मारुतीला तेल कुठल्या पळीने वाहावे, सिध्दीविनायकाच्या उंदराच्या कानात नवस का बोलावा इ. गोष्टी या समाजाला चर्चा करायला कशा आवडतात हे माझ्या अल्पमतीला खरोखरच कळत नाही.
खर्या हिंदु धर्माने आपल्या प्रज्वलित बुध्दीच्या उजेडाने शेकडो वर्षे हा भारत देश आणि आजुबाजुच्या देशांचा आसमंत उजळून टाकला होता हे चिरतंन सत्य कधी आपण ओळखणार आहोत.
(श्री अजित पिंपळखरे यांच्या परवानगीने)