
श्लोक ५ वा
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा l
मना सत्यसंकल्प जीवि धरावा l
मना कल्पना ते नको विषयांची l
विकारे घडे हो जनी सर्व ची ची l l ५ l l
ह्या श्लोकात समर्थ मनाला सांगताहेत की तू वाईट किंवा पापी विचारांचा त्याग कर आणि केवळ चांगल्या विचारांना आपल्या हृदयात स्थान दे.
कारण समर्थ सांगतात की जर विचारांचे बीजच वाईट असेल तर कृतीही आपोआप वाईटच घडणार. म्हणूनच पापविचारांचा त्याग करून सत्याची कास धरणे चांगले. त्यासाठी उगीच भौतिक सुखाच्या विषयांमगे न लागणे चांगले , कारण मनातील विकारांमुळे आपल्याहातून कधीतरी समाजाला अमान्य असं काही घडलं तर आपली निंदा होईल. म्हणून मन निर्मळ ठेवावे. म्हणजेच आयुष्यात चुकीचा मार्ग धरला तर समाजात निंदा होते आणि सत्याचा मार्ग धरला की लोक आपले होतात, मनाला आणखीन काय हवे असते हो, आपल्याला समाधान देणारे आणि आपले मानणारे आपले लोक, बरोबर ना !

नको रे मना क्रोध हा खेदकारी l
नको रे मना काम नानाविकारी l
नको रे मना लोभ हा अंगिकरू l
नको रे मना मत्सरू दंभ भारू l l ६ l l
ह्या श्लोकात आपल्याला समर्थ षड् रिपूंपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला देत आहेत. अधःपतन घडवणाऱ्या ह्या गोष्टींमगे आपण जाऊ नये असे समर्थ सांगताहेत . राग, वासना, लालच, हेवा, खोटेपणा आणि मोठेपणा ह्या गोष्टी आपल्या सुख शांतीचा नाश करतात तेव्हा मनाला त्या सर्वांपसून दूर राहायला समर्थ सांगत आहेत.
बघा ना एखादी गोष्ट जरी आपल्या मनाविरुद्ध झाली की आपल्याला राग येतो किंवा हवी हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर वाईट वाटतेच पण दुसऱ्याला मिळाली तर असूया निर्माण होते मग त्या व्यक्ति विषयी द्वेष निर्माण होतो. आणि आपण उगीच मोठेपणा मिरवायच्या नादात खोटेपणा करू लागतो, परंतु ह्या साऱ्यामुळे नुकसान आपलेच होते , मन दुःखी होते आणि साध्य काहीच होत नाही.
Posted by vivsa on नोव्हेंबर 5, 2026 at 9:27 pm
चित्ररूपात पाहून वाचायला चांगले वाटते
LikeLiked by 1 person